पावणेसात कोटीच्या फसवणुकीप्रकरणी आरोपी पती-पत्नीला अटक

इंपोर्ट-एक्सपोर्टच्या नावाने घेतलेली रक्कम ड्रग्जमध्ये गुंतविल्याचा संशय

0

अरुण सावरटकर
8 एप्रिल 2026
मुंबई, – इंपोर्ट-एक्सपोर्ट लायसन्स सर्व्हिस व्यवसायात प्रचंड फायदा असल्याची बतावणी करुन कंपनीत गुंतवणुक केल्यास चांगल्या परताव्याचे गाजर दाखवून एका पती-पत्नीने कापड व्यापार्‍यासह त्यांच्याच सोसायटीच्या आठ सदस्यांची सुमारे पावणेसात कोटीची फसवणुक केल्याचा प्रकार बोरिवली परिसरात उघडकीस आला होता. याप्रकरणी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच आरोपी पती-पत्नीला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. सिद्धार्थ खुशाल पोलाडिया आणि तेजल सिद्धार्थ पोलाडिया अशी या दोघांची नावे असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहे. इंपोर्ट-एक्सपोर्टच्या नावाने घेतलेली रक्कम त्यांनी ड्रग्जमध्ये गुंतवणुक केल्याचे सांगत आहे. त्यामुळे त्यांच्या जबानीची पोलिसांकडून शहानिशा सुरु आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचे नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हिरेन भुपेंद्र शाह हे बोरिवलीतील एका पॉश सोसायटीमध्ये राहत असून त्यांचा लहान मुलांचा कपडे विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या व्यवसायात त्यांच्यासोबत त्यांचे काका चिराग महेंद्र शाह, सचिन भोगीलाल शाह, मिनेश भोगीलाल शाह हे तिघेही पार्टनर आहेत. याच व्यवसायात कापड व्यापारी संतोष आसाराम शुक्ला, निलेश हरिहरनाथ पांडे, हार्दिक दिपक लपासिया आणि कार्तिक दिपक लपासिया हे त्यांच्या परिचित असून त्यांच्यात कपड्याचा व्यवहार चालतो. सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तेजल हे त्यांच्याच सोसायटीमध्ये राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. त्यांची प्लबिता इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक खाजगी कंपनी आहे. ही कंपनी इंपोर्ट-एक्सपोर्ट लायसन्स सर्व्हिस पुरविण्याचे काम करते. अनेकदा सिद्धार्थ आणि तेजल हे त्यांच्या व्यवसायाबाबत हिरेश शाह यांच्यासह सोसायटीच्या सदस्यांशी चर्चा करायचा.

या चर्चेदरम्यान तो त्याच्या व्यवसायात त्याला प्रचंड फायदा झाल्याचे सांगत होता. त्याच्या व्यवसायात गुंतवणुक केल्यास त्यांना त्यांच्या व्यवसायापेक्षा अधिक फायदा होईल असे सांगून त्यांना व्यवसायात गुंतवणुक करण्याचा सल्ला देत होता. त्यांनी अनेकांना गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आश्वासन देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर विश्वास ठेवून हिरेन शाह यांच्या पत्नीने त्यांच्या व्यवसायात पाच लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांनी तिला दरमहा परतावा रक्कम दिला होता. त्यामुळे त्यांच्यावर त्यांना विश्वास बसला होता. त्यामुळे त्यांच्यासह त्यांच्या पत्नीने सिद्धार्थ आणि तेजल यांच्या व्यवसायात एप्रिल 2021 ते मे 2025 या कालावधीत चाळीस लाख आरटीजीएस व एक कोटी कॅश स्वरुपात 1 कोटी 40 लाख रुपयांची गुंतवणुक केली होती.

या गुंतवणुकीबाबत हिरेन शाह यांना त्यांच्या नातेवाईकासह परिचित कापड व्यापार्‍यांना सांगितले होते, त्यांनाही त्यांच्या कंपनीत गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. त्यामुळे हिरेन शाह यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचे काका चिराग शाह यांनी आरटीजीएसद्वारे 73 लाख, सचिन शाह यांनी 85 लाख, मिनेश शाह यांनी 76 लाख रुपये, त्यांच्या सोसायटीचे सदस्य कार्तिक लपासिया यांनी 6 लाख, संतोष शुक्ला व निलेश पांडे यांनी 50 लाख तसेच कॅश स्वरुपात 1 कोटी 20 लाख असे 5 कोटी 6 लाखांची गुंतवणुक केली होती. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांना काही महिने दरमाह परताव्याची रक्कम दिली. मात्र ऑगस्ट 2025 नंतर त्यांनी परताव्याची रक्कम देणे बंद केले होते.

याबाबत विचारणा केल्यानंतर सिद्धार्थ आणि तेजल हे दोघेही लवकरच त्यांचे पैसे परत करण्याचे आश्वसन देत होते, मात्र प्रत्यक्षात त्यांनी मूळ रक्कमेसह परताव्याची रक्कम दिली नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या घरी जाऊन पैशांची मागणी सुरु केली होती. यावेळी या दोघांनी त्यांनी गुंतवणुक केलेली रक्कम ड्रग्जमध्ये गुंतवणुक केली आहे. आता त्यांच्याकडे पैसे नाही. त्यामुळे कोणालाही पैसै मिळणार नाही, पैशांसाठी घरी येऊ नका, नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली होती. चौकशीनंतर या दोघांकडे त्यांच्याप्रमाणे अनेकांनी चांगला परतावा मिळेल म्हणून गुंतवणुक केली, मात्र त्यांनी कोणालाही मूळ रक्कमेसह परतावा दिला नव्हता.

पैशांची मागणी केल्यानंतर ते दोघेही सर्वांना धमकी देत होते. त्यांच्याकडे आतापर्यंत हिरेन शाह यांच्यासह आठजणांनी 6 कोटी 71 लाखांची गुंतवणुक केली होती.  या पैशांचा सिद्धार्थ आणि तेजल यांनी परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर सिद्धार्थ पोलाडिया आणि त्याची पत्नी तेजल पोलाडिया या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली.

अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक तपासात आरोपी पती-पत्नीने आठजणांची 6 कोटी 71 लाखांची फसवणुक केली असली तरी ही रक्कम त्यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे या दोघांकडून फसवणुक झालेल्यांनी कस्तुरबा मार्ग पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page