सरकारी नोकरीच्या आमिषाने गंडा घालणारा भामटा गजाआड

पैसे द्या व सरकारी नोकरी मिळवा असे सांगून अनेकांना गंडा

0

अरुण सावरटकर
25 मार्च 2026
मुंबई, – मंत्रालयात कामाला असल्याची बतावणी करुन विविध राजकीय नेते, मंत्र्यासह मंत्रालयीन अधिकार्‍यांशी उठबस असल्याचे सांगून सरकारी नोकरीच्या आमिषाने गंडा घालणार्‍या एका भामट्याला दहिसर पोलिसांनी अटक केली. तुषार संजय कदम असे या भामट्याचे नाव असून त्याने अनेकांची विविध शासकीय नोकरीच्या आमिषाने फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तक्रारदारांसह त्यांच्या परिचितांना अग्निशमन दलासह महानगरपालिका आणि रेल्वेत नोकरी देतो असे सांगून त्यांच्याकडून 42 लाख 50 हजार रुपये घेतले, मात्र कोणालाही नोकरी न देता बोगस नियुक्तीपत्र देऊन त्यांची फसवणुक केल्याचे एका अधिकार्‍याने बोलताना सांगितले.

दिपक तानाजी यादव हे दहिसर येथे राहत असून ते फिलीपाईन्स या देशात खाजगी नोकरी करतात. तुषार कदम हा त्यांच्या परिचित असून ते दोघेही एकमेकांच्या ओळखतात. चार वर्षांपूर्वी ते दोघेही दहिसर येथील एका हॉटेलमध्ये भेटले होते. तिथेच त्याने तो मंत्रालयात कामाला असून त्याची अनेक राजकीय नेते तसेच मंत्रालयीन बड्या अधिकार्‍यांशी ओळख असल्याचे तसेच अनेकदा तो त्यांच्यासोबत उठत बसत असल्याचे सांगितले होते. 2023 रोजी अग्निशमन दलाची नोकरी भरतीची जाहिरात आली होती. यावेळी त्याने त्यांना त्यांच्या परिचित कोणी नोकरीसाठी इच्छुक असल्यास त्याला संपर्क साधण्यास सांगितले होते. त्यांना अग्निशमन दलात कायमस्वरुपी नोकरीचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी त्याला त्यांच्या मामाच्या मुलाच्या नोकरीसाठी विचारणा केली होती. यावेळी त्याने त्यांना आधी चार लाख आणि नोकरी मिळाल्यानंतर चार लाख रुपये देण्यास सांगितले होते. त्यासाठी ते तयार झाले होते,

ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या मामाच्या मुलाच्या नोकरीसाठी त्याला चार लाख रुपये दिले होते. ही रक्कम त्याच्या बॅक खात्यात ट्रान्स्फर करण्यात आली होती. याच दरम्यान त्यांनी त्यांच्या एका मित्राची तुषारसोबत ओळख करुन दिली होती. त्याने त्यांच्या मुलाला महानगरपालिकेत ज्युनिअर अभियंता म्हणून नोकरीचे आश्वासन देऊन त्यांच्याकडून नोकरीासठी ऑनलाईन सोळा तर आठ लाख रुपये कॅश स्वरुपात घेतले होते. यावेळी त्याने त्यांना आणखीन काही तरुणांना सरकारी नोकरीसाठी घेऊन येण्यास सांगितले होते. त्यामुळे ते दोघेही त्याच्या संपर्कात होते. याच दरम्यान रेल्वे विभागात टिसी पदासाठी नोकरी असल्याचे सांगून त्याने त्यांच्या भावोजीला नोकरी मिळवून देतो असे सांगितले. त्यासाठी त्याने त्यांच्याकडून दोन लाख, त्यांच्या पत्नीचा शाळेचा मित्राकडून चार रुपये घेतले होते.

वर्षभरात त्यांनी तुषार कदमला चौघांच्या नोकरीसाठी पैसे दिले होते. मात्र कोणालाही नोकरी मिळवून दिली नव्हती. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे विचारणा सुरु केली होती. यावेळी त्याने त्यांच्या मामाच्या मुलाच्या नोकरीचे काम झाले असून त्यांना अग्निशमन दलाचे नियुक्तीचे पत्र दिले होते. त्यामुळे ते दहिसर येथील अग्निशमन दलाच्या कार्यालयात संबंधित नियुक्तीपत्र घेऊन गेले होते. मात्र तिथे गेल्यांनतर त्यांना ते नियुक्तीपत्र बोगस असल्याचे समजले होते. या प्रकाराने त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी तुषारकडे जाब विचारला होता, यावेळी त्याने त्यांचे काम होणार असून त्यांच्याकडे आणखीन पैशांची मागणी करु लागला.

मात्र त्याच्या बतावणी न भुलता त्यांनी त्याच्याविरुद्ध दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रार अर्जात दिपक यादव यांनी विविध शासकीस विभागात नोकरीसाठी त्यांच्यासह इतरांनी तुषार कदम याला टप्याटप्याने 42 लाख 50 हजार रुपये दिल्याचे नमूद करताना त्याने त्यापैकी कोणालाही नोकरी मिळवून दिली होती. उलट नोकरीचे बोगस नियुक्तीपत्र देऊन त्यांची फसवणुक केल्याचा आरोप केला होता. या आरोपासह तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी बोगस नियुक्तीपत्र देऊन नोकरीसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. मात्र गुन्हा झाल्याचे समजताच तुषार हा पळून गेला होता. तो मुंबईतून पळून गेला होता. वेगवेगळ्या ठिकाणी राहून तो स्वतचे अस्तित्व बदलत होता. तरीही त्याचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. गेल्या महिनाभर तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्याला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दिपक यादव यांच्यासह इतर अनेक लोकांना मंत्रालयासह राजकीय नेते आणि अधिकार्‍यांशी ओळख असल्याची बतावणी करुन नोकरीच्या आमिषाने गंडा घातल्याची कबुली दिली. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page