शासकीय नोकरीच्या आमिषाने गंडा घालणार्‍या भामट्याला अटक

विविध राजकीय नेते, मंत्र्याशी घनिष्ठ संबंध असल्याचा दावा करायचा

0

अरुण सावरटकर
1 मार्च 2026
मुंबई, – शासकीय नोकरीच्या आमिषाने एका तरुणाची फसवणुक केल्याप्रकरणी वॉण्टेड असलेल्या भामट्याला धारावी पोलिसांनी अटक केली. नितीन चंद्रशेखर देशमुख असे या भामट्याचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत आहे. राज्यातील विविध राजकीय नेते, मंत्र्याशी घनिष्ठ संबंध असल्याचा दावा करणारा नितीन देशमुखने स्वतला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा नाशिकचा जिल्हाप्रमुख असल्याची बतावणी केली होती. त्याच्या अटकेने अशाच इतर काही फसवणुकीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या गुन्ह्यांत किरण रामदास सातपुते हा सहआरोपी असून तो तक्रारदार तरुणाचा नातेवाईक असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रथमेश राजेंद्र बोडखे हा धारावीतील शास्त्रीनगर, गजानन सोसायटीमध्ये त्याच्या कुटुंबियांसोबत राहतो. त्याचे वडिल राज्य शासनामध्ये सरकारी सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2024 रोजी महानगरपालिकेत सहाय्यक लिपीक पदासाठी भरतीची एक जाहिरात आली होती. त्यासाठी प्रथमेशने अर्ज केला होता. मात्र परिक्षेसाठी प्रवेशपत्र प्राप्त होऊन त्याने परिक्षा दिली नव्हती. जानेवारी 2025 रोजी त्याचा मामाचा मुलगा किरण सातपुते याने त्याला फोन करुन नितीन देशमुख याच्याविषयी माहिती दिली होती. नितीन हा राजकारणी असून त्याचे अनेक राजकीय नेते, मंत्री आदीशी जवळचे संबंध असून त्याची मंत्रालयात चांगली ओळख आहे.

तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नाशिक जिल्हा प्रमुख आहे. त्याचा शब्द कोणीही टाळत नाही. तो त्याला सरकारी मिळवून देऊ शकतो. त्यासाठी त्याला काही पैसे द्यावे लागतील असे सांगितले. इतकेच नव्हे तर त्याला सरकारी नोकरी मिळाली नाहीतर त्याला पूर्ण परत करण्याचे त्याने आश्वासन दिले होते. त्यामुळे किरणवर विश्वास ठेवून त्यांनी सरकारी नोकरीसाठी नितीन देशमुखला पैसे देण्याची तयारी दर्शविली हाती. हा कॉल सुरु असताना प्रथमेशने नितीनला ऑनलाईन पैसे पाठवतो असे सांगितले, मात्र त्याने ऑनलाईन पैसे घेण्यास नकार दिला. आयकर विभागामुळे त्याने त्याच्या बँक खात्यात पैसे न पाठवता दुसर्‍या बँक खात्यात पैसे पाठविण्यास सांगितले. त्यामुळे प्रथमेशने त्याला वेगवेगळ्या बँक खात्यात नऊ लाख दहा हजार रुपये ट्रान्स्फर केले होते.

जुलै 2025 रोजी नितीनने त्याला फोन करुन नोकरीसाठी आणखीन दोन लाख रुपये द्यावे लागतील से सांगितले, मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने त्याने त्याला नोकरी देणार नाही असे सांगितले. त्यामुळे प्रथमेशने त्याच्याकडे नोकरीसाठी घेतलेले पैसे परत करण्यास सांगितले असता त्याने पैसे परत करणार नाही असे सांगून त्याला शिवीगाळ केली होती. तसेच पैशांसाठी पुन्हा कॉल केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली होती. या घटनेनंतर त्याने किरण सातपुतेला ही माहिती सांगितली. मात्र त्याने आश्वासन देऊनही त्याला नोकरी मिळवून दिली नाही किंवा नितीनकडून नोकरीसाठी घेतलेले पैसे परत मिळवून नाही.

या दोघांनी नोकरीच्या आमिषाने त्याची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच प्रथमेश बोडखे याने धारावी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून या दोघांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नितीन देशमुख आणि किरण सातपुते यांच्याविरुद्ध नोकरीसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन तक्रारदार तरुणाची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच या दोघांचा पोलिसांनी शोध सुरु केला.

ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या तीन ते साडेतीन महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या नितीन देशमुख याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. नितीनने नोकरीच्या आमिषाने अशाच प्रकारे इतर काही बेरोजगार तरुणांची आर्थिक फसवणुक केली आहे याचा पोलीस तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page