भाजपा आमदार अमीत साटम यांच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न
अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा
अरुण सावरटकर
20 एप्रिल 2025
मुंबई, – शैक्षणिक मदतीच्या बहाण्याने अंधेरीतील स्थानिक भाजपा आमदार अमीत साटम यांच्या नावाने एका अज्ञात व्यक्तीने फसवणुकीचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जुहू पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. या गुन्ह्यांचा जुहू पोलिसांसह गुन्हे शाखेकडून संमातर तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अमीत भास्कर साटम हे अंधेरीतील लल्लूभाई श्यामलाल रोड परिसरात राहत असून ते भारतीय जनता पार्टी अंधेरी पश्चिम विधानसभेचे विद्यमान आमदार आहेत. याच परिसरात त्यांचे कार्यालय असून तिथे ते स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी जाणून घेऊन त्याचे निवारण करतात. गुरुवारी 17 एप्रिलला त्यांना त्यांचे परिचित चैतन्य नाईक यांनी फोन केला होता. यावेळी त्याने त्याच्या व्हॉटअप क्रमांकावर एका अज्ञात व्यक्तीचा मॅसेज आला होता. या व्यक्तीने स्वतची सेहगल अशी ओळख देताना तो अमीत साटम यांच्या कार्यालयातून बोलत आहे असे सांगितले. त्यानंतर त्याने त्यांना एका बँक खात्याची माहिती पाठविली होती. या व्यक्तीने नंतर कॉल करुन त्यांना तो अनेकांना शैक्षणिक कामात मदत करत असून या बँक खात्यात शैक्षणिक मदत म्हणून 25 हजार 862 रुपये पाठविण्याची विनंती केली होती.
मात्र हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी थेट अमीत साटम यांच्याशी संपर्क साधून या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केली होती. यावेळी त्यांनी त्यांच्याकडे सेहगल नावाचा कोणीही व्यक्ती काम करत नाही किंवा त्याला ते ओळखत नसल्याचे सांगितले. अशा प्रकारे सेहगल नावाच्या एका व्यक्तीने आमदार अमीत साटम यांच्या नावाने चैतन्य नाईक यांना कॉल करुन त्यांच्याकडे शैक्षणिक मदत म्हणून 25 हजार 862 रुपयांची मागणी करुन फसवणुक करण्याचा प्रयत्न केला होता.
हा प्रकार लक्षात येताच आमदार अमीत साटम यांनी जुहू पोलिसांना ही माहिती सांगून त्यांच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत जुहू पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या गुन्ह्यांचा स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत. या व्यक्तीने अशाच प्रकारे अमीत साटम यांच्या नावाने इतर कोणाला कॉल किंवा मॅसेज करुन पैशांची मागणी केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.