अरुण सावरटकर
१८ जानेवारी २०२५
मुंबई, – सिनेदिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्याकडे हाऊसकिपिंगमध्ये काम करणार्या कर्मचार्याची फसवणुक करुन पळून गेलेल्या एका चौकडीला नऊ महिन्यानंतर गजाआड करण्यात जुहू पोलिसांना यश आले आहे. प्रकाश व्यकंटेश नायडू, नवनाथ सोमनाथ साठे, रामेश्वर राजेंद्रप्रसाद चौधरी आणि राजू राजेश मौर्या अशी या चौघांची नावे आहेत. २५ लाखांच्या लॉटरीचे आमिष दाखवून या टोळीने या कर्मचार्याला गंडा घातल्याचे तपासात उघडकीस आले आहे. गुन्हा करण्यासाठी ते चौघेही पुन्हा विलेपार्ले येथे आले असता चौघांनाही सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत चव्हाण व त्यांच्या पथकाने शिताफीने ताब्यात घेऊन या गुन्ह्यांचा पर्दाफाश केला.
२८ वर्षांचा धर्मजीत रामनरेश सिंग हा तरुण मूळचा उत्तरप्रदेशच्या वाराणसीचा रहिवाशी असून सध्या गोरेगाव येथील संतोषीनगर, हनुमान चाळीत राहतो. गेल्या दोन वर्षांपासून तो सिनेदिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्याकडे हाऊसकिपिंगचे काम करतो. २२ एप्रिल २०२४ रोजी दुपारी एक वाजता तो नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी विलेपार्ले रेल्वे स्थानकात आला होता. तेथून स्कायवॉकवरुन जाताना त्याला एका अज्ञात व्यक्तीने आवाज दिला. त्यामुळे तो तिथे गेला होता. यावेळी या व्यक्तीसोबत इतर दोनजण होते. त्यांनी त्याला त्यांच्याकडे २५ लाखांची लॉटरीचे तिकिट आहे. ती लॉटरी खरेदी करण्यास सांगून त्यांनी त्याला नक्कीच लॉटरी लागेल असे सांगितले. यावेळी दुसर्या व्यक्तीने मला ते तिकिट खरेदी करायची होती, मात्र माझ्याकडे पैसे नसल्याने लॉटरीची तिकिट खरेदी करु शकत नाही असे सांगितले. यावेळी अन्य एका व्यक्तीने त्याने ती लॉटरी खरेदी केल्यास त्याला २५ लाख रुपये मिळतील असे सांगून त्याला ती लॉटरी खरेदी करण्यास प्रवृत्त केले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून त्याने ती लॉटरी खरेदीचा निर्णय घेतला होता.
यावेळी धर्मजीतने त्याच्याकडे पैसे नसून तो ऑनलाईन पैसे ट्रान्स्फर करतो असे सांगितले. त्यास त्यांनी होकार दिला होता. त्यानंतर त्याने एका व्यक्तीच्या मोबाईलवर २५ हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. यावेळी त्याला दिनेशकुमार शंकर जैस्वाल या व्यक्तीच्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे समजले. पैसे ट्रान्स्फर केल्यानंतर त्यांनी लॉटरीची तिकिट घेऊन येतो असे सांगितले. मात्र बराच वेळ वाट पाहूनही ते तिघेही तिथे आले नाही. २५ लाखांच्या बक्षिसाचे आमिष दाखवून त्यांनी त्याला लॉटरीची तिकिट खरेदी करण्यास प्रवृत्त करुन २५ हजार रुपये घेऊन पलायन केले होते.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच धर्मजीत सिंगच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा जुहू पोलिसांकडून तपास सुरु केला होता. आरोपींचा शोध सुरु असतानाच नऊ महिन्यापासून वॉण्टेड असलेल्या चार संशयितांना पोलिसांनी चोकशीसाठी ताब्यात घेतले होते. ते चौघेही अशाच प्रकारे फसवणुकीच्या उद्देशाने विलेपार्ले रेल्वे स्थानकातील स्कायवॉक ब्रिजवर आले होते. ही माहिती प्राप्त होताच पोलीस उपायुक्त दिक्षीत गेडाम, सहाय्यक पोलीस आयुक्त मारुती पंडित, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत चव्हाण, सहाय्यक फौजदार तोडणकर, पोलीस हवालदार मांडेकर, महांगडे, घाडीगावकर, तायडे यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवून या चौघांना ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यांनीच धर्मजीतला लॉटरी तिकिटातून २५ लाख रुपये मिळतील असे आमिष दाखवून त्याची फसवणुक केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर या चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या चौघांनाही अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. चारही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.