२४ वर्षांच्या तरुणाच्या दगडाने ठेचून हत्या

पळून गेलेल्याा दोन्ही मारेकर्‍यांना अटक

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
१३ फेब्रुवारी २०२४
कोल्हापूर – क्षुल्लक वादातून परशराम ऊर्फ प्रशांत भैरु कुराडे या २४ वर्षांच्या तरुणाची हत्या करुन पळून गेलेल्या दोन्ही मारेकर्‍यांना कोल्हापूर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर व त्यांच्या पथकाने अटक केली. अजय ऊर्फ नवनाथ बापू काशिद आणि आदाम ऊर्फ संभा मोहम्मद मुजावर अशी या दोघांची नावे असून हत्येनंतर ते दोघेही कोल्हापूर सोडून पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र त्यापूर्वीच या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांना पुढील चौकशीसाठी इचलकरंजी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या गुन्ह्यांत त्यांचा तिसरा सहकारी साहिल चव्हाण याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतल्याचे सांगण्यात आले.

कोल्हापूरच्या हातकणंगले, इचलकरंजी, शहापूर रोडवरील मशिदीजवळील गल्ली क्रमांक एकच्या इंदिरानगर परिसरात परशराम कुराडे हा त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. १० फेब्रुवारी सायंकाळी सहा वाजता त्याची क्षुल्लक वादातून अज्ञात मारेकर्‍यांनी दगडाने ठेचून हत्या केली होती. या हत्येनंतर मारेकरी पळून गेले होते. हा प्रकार नंतर उघडकीस येताच इचलकरंजी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रक्तबंबाळ झालेल्या परशरामला तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर राकेश राजाराम धुमाळ यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला होता. या हत्येच्या घटनेची पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर रविंद्र कळमकर यांनी पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, संदीप जाधव, अंमलदार राजीव शिंदे, खंडेराव कोळी, सचिन देसाई, तुकाराम राजीगरे, महेश खोत, संजय इंगवले, आयुब गडकरी, अमर शिरढोणे, नवनाथ कदम, सुशील पाटील यांच्या मदतीने दोन पथकाची नियुक्ती करुन मारेकर्‍यांचा शोध सुरु केला होता.

परिसरातील सीसीटिव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीवरुन या गुन्ह्यांत अजय काशिद आणि आदम ऊर्फ संभा मुजावर यांचे नाव समोर आले होते. त्यांच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरु असतानाच ते दोघेही कोल्हापूर सोडून पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर अजय काशिद आणि आदाम मुजावर या दोघांनाही जयसिंगपूर स्टॉण्ड परिसरातून पोलीस नाईक महेश खोत आणि पोलीस हवालदार आयुब गडकरी यांनी शिताफीने अटक केली. पोलीस तपासात या दोघांचा या हत्येत सहभाग उघडकीस आला. त्यानंतर या दोघांना अटक करुन त्यांचा ताबा स्थानिक पोलिसांना देण्यात आला. त्यांच्या चौकशीतून हत्येत साहिल चव्हाणचा सहभाग उघडकीस आला आहे. हत्येनंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. हत्येचा गुन्हा घडल्यानंतर काही तासांत दोन्ही मारेकर्‍यांना गजाआड करणार्‍या पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्यासह त्याच्या पथकाचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांनी कौतुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page