अरुण सावरटकर
२०२३ साली मुंबई पोलिसांच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्यांनी १०६ ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांची नोंद करुन २२९ आरोपींना अटक केली होती. या कारवाईत पोलिसांी एकूण ५३ कोटी २३ लाखांचा ड्रग्जचा साठा जप्त केला होता. चालू वर्षांत आतापर्यंत याच पथकाने एकूण दहा गुन्ह्यांची नोंद करुन २७ ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. या दहाही कारवाईत पोलिसांनी २० कोटी १८ लाख रुपयांचा ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेने केली असली तरी स्थानिक पोलिसांची आकडेवारी पाहता गेल्या काही वर्षांत ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत मुंबई पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याचे आकडेवारीतून दिसून येत होते. ड्रग्जची खरेदी-विक्री तसेच ड्रग्ज सेवन करणार्या तस्काराविरुद्ध इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई करणारी महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात मुंबई पोलिसांचा पहिला क्रमांक लागतो. असे असले तरीही ड्रग्ज तस्करीचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांची ही मोहीम अशीच सुरु राहील याबाबत कोणाचेही दुमत नाही.
मालवणी पोलीस ठाण्याचा चार्ज घेतल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी मालवणीतील हद्दीत सर्व गुन्ह्यांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यात ड्रग्ज तस्करीचा विषय प्रामुख्याने पुढे आल्याने अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश पहिल्याच दिवशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी आपल्या सहकार्यांना दिले होते. खबर लहान असो किंवा मोठी असो, ड्रग्जची संबंधित कुठलीही माहिती मिळाल्यास त्याची शहानिशा करा, दोषीवर कारवाई करुन त्यांच्यावर अटकेची करा. अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेताना त्यांनी त्यांच्या सहकार्यांना पूर्ण मोकळीक दिली होती. त्यातून मालवणी पोलिसांना कांदिवली परिसरात सुरु असलेल्या एका एमडी ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश करण्यात यश आले होते. मुंबईत उद्धवस्त करण्यात आलेला हा पहिला एमडी ड्रग्जचा कारखाना आहे हे विशेष.
आधी सांगितल्याप्रमाणे चिमाजी आढाव यांनी ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांच्या सहकार्यांना मुंबई शहरात विशेषता मालवणी हद्दीत ड्रग्ज तस्करी करणार्या आरोपींची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. ही माहिती काढत असताना ५ जानेवारी २०२४ रोजी मालवणी येथे काहीजण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मालवणी पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मारोती शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश साळुंखे, पोलीस हवालदार अनिल पाटील, बुगडे, पोलीस शिपाई राठोड, विलास आव्हाड, शिंदे, सचिन वळतकर यांनी साध्या वेशात पाळत ठेवून तिथे आलेल्या अबरार इब्राहिम शेख या ३० वर्षांच्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना एमडी ड्रग्ज आणि शंभरहून थिनरच्या बाटल्या सापडल्या. पोलीस ठाण्यात आणल्यानंतर अब्ररारची स्वत चिमाजी आढाव यांनी चौकशी केली. या चौकशीत त्याला ते ड्रग्ज नूर आलम नावाच्या एका तरुणाने दिल्याचे उघडकीस आले.
नूर आलमची माहिती काढताना तो कांदिवली परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे क्षणाचा विलंब न लावता चिमाजी आढाव यांच्यासह निलेश साळुंखे व अन्य पोलीस पथकाने नूर आलम राहत असलेल्या कांदिवलीतील चारकोप, आरएमए टॉवरजवळील इस्लाम कंपाऊंड, संघवी इस्टेटच्या समता वेल्फेअर सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील रुम क्रमांक सातमध्ये छापा टाकला होता. याच रुममधून नूरआलम मेहबूब आलम चौधरी या २४ वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान पोलिसांना नूर आलमने त्याच्या राहत्या घरीच एमडी ड्रग्ज बनविण्याचा कारखाना सुरु केल्याचे दिसून आले. एका लहानशा खबरीवरुन पोलिसांनी कांदिवलीत सुरु असलेल्या एमडी ड्रग्ज कारखान्यांचा पर्दाफाश केला होता. ही माहिती नंतर वरिष्ठांना देण्यात आली होती. त्यांनीही घटनास्थळी धाव घेऊन या कारखान्यांची पाहणी केली होती. नूर आलमला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीत त्याने तो स्वत एमडी ड्रग्ज बनवत असल्याची तसेच अब्ररारच्या मदतीने या ड्रग्जची विक्री करत असल्याची कबुली दिली. त्यामुळे या दोघांविरुद्ध मालवणी पोलिसांनी कलम ८ (क), सह २२, २२ (क), २९ एनडीपीएस ऍक्ट १९८५ अन्वये गुन्हा नोंदविला होता. याच गुन्ह्यांत नंतर या दोघांसह अन्य एका महिलेस पोलिसांनी अटक केली होती.
चौकशीदरम्यान नूर आलम हा २४ वर्षांचा असून तो मध्यमवर्गीय कुटुंबातील तरुण असल्याचे उघडकीस आले. त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याने नुकताच बीएचएमएसला प्रवेश घेतला होता. त्याचे वडिल टॅक्सीचालक म्हणून काम करतात तर आई गृहिणी आहे. नूर आलमला दोन लहान भाऊ असून तो मोठा भाऊ आहे. चिमाजी आढाव यांनी त्यांच्या पथकासह त्याच्या राहत्या घरी छापा टाकला असता तो स्वत एमडी ड्रग्ज बनवित असल्याचे दिसून आले. दहा बाय दहाच्या या रुममध्येच त्याने एमडी ड्रग्ज बनविण्याचा एक कारखाना सुरु केला होता. तिथे त्याने एमडी ड्रग्ज बनविण्याचे साहित्य आणि मशिन्स आणले होते. त्यातून त्याने अर्धा किलो एमडी ड्रग्ज बनविले होते. ते साहित्य, ५०३ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज, मशिन्स असा एक कोटी पाच लाख साठ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याच रुममध्ये पोलिसांनाएक पुस्तक सापडले होते. त्यात एमडीचा फॉर्म्युला आणि तयार करण्याची पद्धत देण्यात आली होती.
मुंबई पोलिसांनी आतापर्यंत विविध ड्रग्ज कारवाईत एमडी ड्रग्ज कारखान्यांचा पर्दाफाश केला आहे. मात्र मुंबईतील कांदिवली परिसरात उद्धवस्त करण्यात आलेला हा पहिलाच एमडी ड्रग्जचा कारखाना होता. नूर आलमला डॉक्टर होण्याची इच्छा होती. मात्र पैशांमुळे त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. एकीकडे वैद्यकीय शिक्षण सुरु असताना त्याने त्याच्याच राहत्या घरी एमडी ड्रग्जचा कारखाना सुरु केला होता. मोठ्या प्रमाणात ड्रग्जची विक्री केल्यास अटकेची भीती असल्याने तो कमी प्रमाणात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी अब्ररारच्या मदतीने विक्री करत होता. अब्ररारला पोलिसांनी अटक केली तरी त्याच्याकडे सापडलेल्या एमडीवरुन पोलीस त्याच्यापर्यंत पोहचणार नाही असे त्याला वाटत होते. मात्र अब्ररारच्या चौकशीतून नूर आलमचे नाव आल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश साळुंखे यांना त्याची माहिती काढून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यातूनच या एमडी ड्रग्ज कारखान्यांचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले. याच संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त अजयकुमार बंसल यांनी चिमाजी आढाव यांच्यासह त्यांच्या पथकाने विशेष कौतुक केले होते.
ही कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन, पोलीस उपायुक्त अजयकुमार बंसल, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र धिवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक मारोती शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश साळुंखे, पोलीस हवालदार अनिल पाटील, बुगडे, पोलीस शिपाई राठोड, विलास आव्हाड, शिंदे, सचिन वळतकर यांनी विशेष परिश्रम घेतले होते.