1.83 कोटीच्या फसवणुकीप्रकरणी वॉण्टेड व्यावसायिकाला अटक

स्टेशनरीची डिलीव्हरी न करता 57 लाखांचा अपहार केल्याचा आरोप

0

अरुण सावरटकर
7 जून 2025
मुंबई, – मालाड परिसरातील सुराणा हॉस्पिटलची 1 कोटी 83 लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुक कटातील एका वॉण्टेड व्यावसायिकाला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. हरजीवन चंदूभाई कोळी असे या आरोपी व्यावसायिकाचे नाव असून तो अदगमा बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड आणि भाविक इंटरप्रायजेस कंपनीचा मालक-संचालक आहे. हॉस्पिटलला स्टेशनरीचा कुठल्याही मालाची डिलीव्हरी न करता त्याने सुमारे 57 लाखांचा अपहार केल्याचा आरोप आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. याच गुन्ह्यांत इतर काही आरोपींचे नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या सर्व आरोपींनी सुराणा हॉस्पिटलचा स्टोअरचा इंचार्ज महेश रमेश डोलरिया याच्या मदतीने ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

अमीत विवेक झा 24 वर्षांचा तक्रारदार विरार राहतो. मालाड येथे सुराणा नावाचे एक हॉस्पिटल असून तिथे तो गेल्या तीन वर्षांपासून अ‍ॅडमिन हेड म्हणून काम करतो. 2021 पासून या हॉस्पिटलसोबत मालाडच्या अदगमा बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड, भाविक इंटरप्रायजेस या दोन कंपनीचे संचालक व मालक हरजीवन कोळी आणि भावनाबेन कोळी यांच्यासोबत व्यवहार सुरु होता. या दोन्ही कंपनीकडून हॉस्पिटलला स्टेशनरी पुरविले जात होते. त्यांचा सर्व आर्थिक व्यवहार महेश डोलरिया हा पाहत होता. महेश हा हॉस्पिटलमध्ये स्टोअर इंचार्ज म्हणून कामाला असून स्टोअर रुममध्ये येणार्‍या सर्व सामानाचे देवाणघेवाणाची जबाबदारी त्याच्यावर होती. गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही कंपन्यांकडून जो स्टेशनरी माल येत होता, तो माल पूर्ण न येता अर्धाच पाठविला जात होता. मात्र महेश डोलरियाने माल पूर्ण आल्याची नोंद केली होती. अशा प्रकारे महेशने हरजीवनच्या मदतीने हॉस्पिटलची फसवणुक केली होती.

तीन वर्षांत कुठल्याही स्टेशनरीची डिलीव्हरी न करता हॉस्पिटलकडून हरजीवनच्या कंपनीला 57 लाख 35 हजार 904 रुपयांचे पेमेंट करण्यात आले होते. ते पेमेंट हॉस्पिटलच्या बँक खात्यातून दोन्ही कंपन्याच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केला होता. त्याप्रमाणे माऊली इंटरप्रायजेस, पार्वती इंटरप्रायजेस आणि गावंड इंटरप्रायजेस कंपनीचे मालक आणि संचालक अशोक गावंड यांच्याकडून हाऊसकिपिंगसाठी 28 ते 30 महिला आणि पुरुषांची मागणी करण्यात आली होती. या तिन्ही कंपनीसोबत त्यांच्या हॉस्पिटलचा 2010 पासून व्यवहार सुरु होता. अशोक गावंड यानेही महेश डोलरियाच्या मदतीने हॉस्पिटलला हाऊसकिपिंगसाठी पुरविण्यात आलेल्या महिला आणि पुरुष कर्मचार्‍यांनी बारा तासाप्रमाणे 360 तास काम केले होते, मात्र रेकॉर्डवर त्यांनी सातशे तास केल्याची नोंद केली होती. त्यासाठी अशोक गावंडच्या कंपनीला हॉस्पिटलकडून ऐंशी लाख रुपयांचे पेमेंट करण्यात आले होते.

अशा प्रकारे पटेल इलेक्ट्रॉनिक कंपनीचे मालक किमजी जीवराज गांधी, किरण गांधी यांच्याशी हॉस्पिटलचा कुठलाही व्यवहार नसताना या कंपनीकडून हॉस्पिटलला काही माल पुरविण्यात आल्याचे दस्तावेज बनविण्यात आले होते. त्यासाठी किमती गांधी यांच्या बँक खात्यात 5 लाख 64 हजार 126 हजार तर किरण गांधी यांच्या बँक खात्यात 6 लाख 89 हजार 201 रुपयांचे पेमेंट करण्यात आले होते. हा प्रकार अलीकडेच हॉस्पिटलच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या निदर्शनास आला होता. त्यामुळे त्यांनी त्याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या चौकशीत 2021 ते 2024 या कालावधीत महेश डोलरिया याच्या मदतीने संबंधित कंपनीच्या मालकांनी सुराणा हॉस्पिटलची 1 कोटी 83 लाख 44 हजार 834 रुपयांची आर्थिक फसवणुक केल्याचे उघडकीस आले होते.

या प्रकारानंतर अमीत झा यांनी सुराणा हॉस्पिटलच्या वतीने मालाड पोलिसांत महेश डोलरिया याच्यासह संबंधित तिन्ही कंपनीच्या मालकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या हरजीवन कोळी याला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांतील इतर आरोपींच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page