गुंतवणुकीच्या आमिषाने विमा अधिकार्याची 34 लाखांची फसवणुक
फॉरेक्स ट्रेडिंगसह क्रिप्टो करन्सीच्या नावाने अनेकांना गंडा घातला
राजू परुळेकर
16 मार्च 2025
मुंबई, – गुंतवणुकीच्या आमिषाने एका विमा अधिकार्याची पाचजणांच्या टोळीने सुमारे 34 लाखांची फसवणुक केल्याची घटना मालाड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पाचही आरोपीविरुद्ध मालाड पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. रवी महाशेठ, दिलीप मालप, मोहम्मद रफिक, राजीव सिंग आणि अभिषेक साहू अशी या पाचजणांची नावे आहेत. या सर्वांची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार असून त्यासाठी त्यांना समन्स पाठविले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या टोळीने फॉरेक्स ट्रेडिंगसह क्रिप्टो करन्सीच्या नावाने अनेकांना त्यांच्या बोगस कंपनीत गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन कोट्यवधी रुपयांची फसवणुक केल्याचे बोलले जाते. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ऋषिकेश दिपक जुन्नरकर हे बोरिवलीतील मागाठाणे परिसरात राहत असून एका खाजगी कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम करतात. चार वर्षांपूर्वी ते मालाड येथील शाखेत कामाला होते. तिथेच त्यांची दिलीपशी ओळख झाली होती. तो तिथे नियमित येत होता. त्यातून त्यांची चांगली मैत्री झाली होती. त्याने त्यांना फॉरेक्स ट्रेडिंग आणि क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर त्यांना अठरा टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखवून त्याने त्यांचा विश्वास संपादन केला होता. सुरुवातीला त्यांनी त्यास नकार दिला होता, मात्र त्याच्याकडून सतत गुंतवणुकीबाबत विचारणा होत असल्याने त्यांनी फॉरेक्स ट्रेडिंग आणि क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी त्याने त्यांच्या गोरेगाव येथील कार्यालयात आणले होते. तिथेच त्यांची इतर आरोपीशी ओळख झाली होती. या चर्चेत त्यांना भारतात फॉरेक्स ट्रेडिंग अधिकृत नसल्याने त्यांना गुंतवणुकीची रक्कम कॅश स्वरुपात करावी लागेल असे सांगण्यात आले होते.
त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे डिसेंबर 2021 ते मार्च 2025 या कालावधीत फॉरेक्स ट्रेडिंग आणि क्रिप्टो करन्सीमध्ये सुमारे 34 लाख रुपये गुतवणुकीसाठी पैसे दिले होते. त्यानंतर त्यांनी त्यांचे एका खाजगी संकेतस्थळावर लॉगिन आयडी बनविले होते. त्यात त्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला फायदा होत असल्याचे भासविण्यात आले होते. मात्र गुंतवणुकीवर त्यांना वीस महिने पैसे काढता येणार नव्हते. याबाबत त्यांनी त्यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. याच दरम्यान त्यांच्या वडिलांच्या उपचारासाठी त्यांना पैशांची गरज होती. त्यासाठी त्यांनी त्यांच्याकडे गुंतवणुकीसह परताव्याच्या रक्कमेची मागणी सुरु केली होती. मात्र त्यांच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. ते सर्वजण विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या वडिलांचा उपचाराचा खर्च क्रेडिट कार्डवरुन करावा लागत होता.
मर्यादीत उत्पनामुळे त्यांना क्रेडिट कार्डचे पैसे भरता येत नव्हते. त्यामुळे त्यांना रिकव्हरी एजंट सतत विचारणा करत होते. त्यांच्या घरासह कार्यालयात येत होते. त्याचा त्यांना नाहक मानसिक त्रास होऊ लागला होता. रवी महाशेठसह इतर चारही आरोपींनी बोगस कंपनी सुरु असून फॉरेक्स ट्रेडिंग आणि क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून त्यांच्यासह इतरांना गुंतवणुक करण्यास प्रवृत्त केले होते, मात्र कोणालाही मूळ रक्कमेसह परताव्याची रक्कम परत केली नाही. बाजारात काहीही किंमत नसलेले आभासी नाणे आणून त्यांच्या कंपनीने गुंतवणुकदाराची फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच ऋषिकेश जुन्नरकर यांनी मालाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी रवी महाशेठ, दिलीप मालप, मोहम्मद रफिक, राजीव सिंग आणि अभिषेक साहू या पाचही आरोपीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासात आरोपींच्या कंपनीत आतापर्यंत अनेकांनी चांगल्या परताव्याच्या आमिषाला बळी पडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणुक केली होती. त्यामुळे फसवणुकीचा हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.