मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत डिजीटल अटक दाखवून फसवणुक
वयोवृद्धाच्या तक्रारीनंतर चार भामट्यांना सुरत येथून अटक
अरुण सावरटकर
मुंबई, – मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत डिजीटल अटक दाखवून एका ६८ वर्षांच्या वयोवृद्धाकडे दहा लाखांची मागणी करुन त्यांना साडेआठ लाख रुपये ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त करुन फसवणुक केल्याप्रकरणी चार भामट्यांना मालाड पोलिसांनी अटक केली. जगू जितेंद्रभाई असोडिस्वे, संदीप प्रतापभाई लेव्हीसॅल, धरम मुसूभाई गोहिल आणि जय राहिलभाई मोराडिया अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने मंगळवार ३१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशा प्रकारे फसवणुक करणारी ही एक आंतरराज्य टोळी असून या टोळीच्या मुख्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
बिपीनचंद्र हिम्मतलाल शहा हे ६८ वर्षांचे वयोवृद्ध तक्रादार मालाडच्या रामचंद्र लेन, मिलन अपार्टमेंटमध्ये राहतात. २१ डिसेंबरला सकाळी साडेअकरा वाजता ते त्यांच्या घरी होते, यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन त्याने तो पोलीस असल्याचे सांगितले. त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची माहिती काढून त्याने त्यांच्या आधारकार्डवरुन गोयल नावाच्या एका व्यक्तीने बँकेत एक खाते उघडले आहे. या बँक खात्यात मनी लॉड्रिंगसंदर्भात गैरव्यवहार झाल्याचे सांगून त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्याला यावे लागेल असे सांगितले. यावेळी त्यांनी ते गोयल नावाच्या कुठल्याही व्यक्तीला ओळखत नसून त्यांचा संबंधित मनी लॉड्रिंग गुन्ह्यांशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. त्यानंतर या व्यक्तीने त्यांना व्हिडीओ कॉल केला होता. यावेळी त्यांना समोर एक पोलीस गणवेश घातलेला व्यक्ती त्यांच्याशी बोलत असल्याचे दिसून आले. त्यांना डिजीटल अटक केल्याचे सांगून त्यांना कोणाशी संपर्क साधता येणार नाही असे सांगितले.
या संपूर्ण प्रकरणातून सुटका करण्यासाठी त्याने त्यांच्याकडे दहा लाखांची मागणी केली. नाहीतर त्यांच्यावर त्यांच्या घरात येऊन अटकेची कारवाई करावी लागेल अशी धमकी दिली होती. या प्रकाराने ते प्रचंड घाबरले आणि त्यांनी त्यांच्याकडे दहा लाख रुपये नसून साडेआठ लाख रुपये असल्याचे सांगितले. यावेळी त्याने त्यांना ही रक्कम ट्रान्स्फर करण्यास सांगून त्यांना एक बँक खात्याची माहिती दिली होती. कारवाईच्या भीतीने त्यांनी त्याने दिलेल्या बँक खात्यात आठ लाख साठ हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. त्यानंतर त्याने कॉल बंद केला होता. सायंकाळी त्यांची मुलगी जेतल भाविन शहा ही घरी आली, यावेळी त्यांनी तिला घडलेला प्रकार सांगितला.
हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे सांगून तिने त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ते त्यांच्या मुलीसोबत मालाड पोलीस ठाण्यात गेले आणि तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पन्हाळे, पोलीस निरीक्षक संजय बेडवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश बच्छाव, दिपक पोवार, पोलीस हवालदार तौशिफ शेख, दलित पाईकराव, महेश डोईफोडे यांनी तपास सुरु केला होता.
हा तपास सुरु असताना संबंधित आरोपी सुरत येथे वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यानंतर या पथकाने सुरत येथून जगू, संदीप, धरम आणि जय नावाच्या चौघांनाही संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला आहे. त्यांच्याच बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. या आरोपींच्या सहकार्यांनीच बिपीनचंद्र शहा यांना कॉल करुन ही धमकी देऊन त्यांना पैसे ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केल्याचे उघडकीस आले.
तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली. चारही आरोपी मूळचे गुजरातच्या सुरतचे रहिवाशी आहे. पैशांचे आमिष दाखवून त्यांनी काही लोकांचे आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर दस्तावेज घेतले होते. या दस्तावेजाच्या आधारे त्यांनी विविध बँकेत खाते उघडले होते. याच खात्यात फसवणुकीची रक्कम जमा केली जात होती. त्यासाठी संबंधित व्यक्तींना पाच ते सहा हजार रुपयांचे कमिशन दिले जात होते.
अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत त्यांच्या इतर काही आरोपींचे नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश बच्छाव व पोलीस उपनिरीक्षक दिपक पोवार हे करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.