बाईकच्या धडकेने वाहतूक विभागाचा पोलीस हवालदार जखमी

विरुद्ध दिशेने बाईक नेताना कारवाई करताना घडलेला प्रकार

0

राजू परुळेकर
११ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – बाईकच्या धडकेने कांदिवली वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार हेमंत वामन बागुल हे जखमी झाले. त्यांच्या उजव्या हाताच्या मनगट व हाताची करगळीला फॅक्चर झाले आहे. अपघातानंतर बाईकस्वार पळून गेल्याने त्याच्याविरुद्ध मालवणी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणणे व अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विरुद्ध दिशेने बाईक नेताना कारवाई करताना हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही घटना गुरुवारी १० ऑक्टोंबरला सकाळी साडेअकरा वाजता मालाड येथील मालवणी, जनकल्याणनगर, पौद्दार चायनिससमोर घडली. हेमंत बागुल हे बोरिवलीतील न्यू एमएचबी कॉलनी, अष्टविनायक नगरच्या प्रियदर्शनी अपार्टमेंटमध्ये राहतात. सध्या ते कांदिवली वाहतूक पोलीस चौकीत पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी सकाळी ते पौद्दार चायनिससमोर कर्तव्य बजावत होते. यावेळी त्यांना एक बाईकस्वार विरुद्ध दिशेने बाईक घेऊन जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने बाईक न थांबविता त्यांना त्यांच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्याच्या उद्देशाने बाईकने त्यांना जोरात धडक दिली होती. त्यात हेमंत बागुल हे जखमी झाले होते. अपघातानंतर बाईकस्वार तेथून पळून गेला होता. ही माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या हेमंत बागुल यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पळून गेलेल्या बाईकस्वाराविरुद्ध १३२, १२१ (१), (२), ३४१ भारतीय न्याय सहिता अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पोलिसाकडून शोध सुरु आहे.

वाहतूक अधिकार्‍याशी हुज्जत घालणार्‍या दोघांना अटक
वांद्रे येथील दुसर्‍या घटनेत वांद्रे वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय आत्माराम भिलारे यांच्याशी हुज्जत घालून मारहाण केल्याप्रकरणी दोघांना वांद्रे पोलिसांनी अटक केली. मोहम्मद जमील मुनीर शेख ऊर्फ समीर आणि जेम्स हनुमंता जेट्टी अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही शुक्रवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. संजय भिलारे हे नवी मुंबईत राहत असून वांद्रे वाहतूक विभागात कार्यरत आहेत. गुरुवारी दुपारी पावणेदोन वाजता ते त्यांच्या सहकार्‍यासोबत लिलावती हॉस्पिटलजवळील एमईटी कॉलेज, कार्मिल चर्च परिसरात कर्तव्य बजावत होते. यावेळी जेम्स हा विनाहेल्मेट स्कूटी चालवत तर त्याच्या मागे रिक्षाचालक असलेला मोहम्मद जमील बसला होता. या दोघांना संजय भिलारे यांनी थांबवून त्यांच्यावर विनाहेल्मेट स्कूटी चालविल्याबाबत दंडात्मक कारवाई करत होते. यावेळी या दोघांनी त्यांच्यासह वाहतूक वार्डन सुरज बलोटिया यांच्याशी हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ करुन मारहाण करुन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. ही माहिती प्राप्त होताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी मारहाण करणार्‍या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page