एमडी कोर्सच्या ८१ लाखांच्या अपहारप्रकरणी आरोपीस अटक

पैशांची मागणी केल्यानंतर मुलाच्या अपहरणासह हत्येची धमकी

0

अरुण सावरटकर
६ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – पुण्यातील बी. जे मेडीकल कॉलेजमध्ये एमडी कोर्ससाठी घेतलेल्या सुमारे ८१ लाख रुपयांचा अपहार करुन एका मेडीकल व्यावसायिकाच्या फसवणुकीप्रकरणी मुख्य आरोपीस बोरिवली पोलिसांनी अटक केली. अनिल रामचंद्र तांबट असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याच गुन्ह्यांत संदीप वाघमारे, अभिजीत पाटील आणि भूषण पाटील असे तीनजण सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. पैशांची मागणीसह पोलिसांत तक्रार केल्यास त्यांच्या मुलाचे अपहरण करुन त्याची हत्या करण्याची धमकीच आरोपींनी दिली होती.

मंगेश अनंत राणे हे कांदिवली परिसरात राहत असून त्यांचा मेडीकल व सर्जीकल साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना आदित्य नावाचा मुलगा असून त्याचे २०१९ साली एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाले होते. त्यात त्याला १९९ गुण मिळाले होते. त्यामुळे त्याने एमडी कोर्ससाठी प्रयत्न सुरु केले होते. मात्र त्याला एमडी कोर्ससाठी प्रवेश मिळाला नाही. दोन वर्षांपूर्वी त्यांची नांदेडचा रहिवाशी असलेला संदीप वाघमारेशी ओळख झाली होती. या ओळखीदरम्यान त्यांनी त्यांच्या मुलाविषयी माहिती दिली होती. या माहितीनंतर त्याने त्यांना एनआरआय कोट्यातून त्यांच्या मुलाला औरंगाबादच्या एका नामांकित कॉलेजमध्ये एमडी कोर्ससाठी प्रवेश मिळवनू देतो असे सांगितले. त्यानंतर त्याने त्यांची अभिजीत पाटीलशी ओळख करुन त्यांना औरंगाबादचया कॉलेजमध्ये नेले होते. तिथे त्यांची अनिल तांबटशी ओळख झाली. या तिघांनी शासकीय कोट्यातून त्यांच्या मुलाचे काम होईल असे सांगितले. त्यांच्या सांगण्यावरुन मंगेश राणे यांच्या मुलाने नीट परिक्षेसाठी पुन्हा अर्ज केला होता. या अर्जानंतर त्याला तिसर्‍या दिवशी मेलवरुन त्याची पुण्याच्या बी. जे मेडीकल कॉलेजमध्ये सीट ऍलोट झाल्याचा मॅसेज प्राप्त झाला होता.

हा मॅसेज कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटवरुन आल्याचे समजून त्यांनी पुढील प्रक्रिया सुरु केली होती. त्यांच्या सांगण्यावरुन त्यांनी आदित्यचे सर्व वैद्यकीय प्रमाणपत्रासह इतर कागदपत्रे सादर केले होते. काही दिवसांनी त्यांनी एमडी कोर्स प्रवेशासाठी अनिल तांबडला ९४ लाख, अभिजीत पाटीलला साडेआठ लाख, संदीप वाघमारेला तेवीस लाख तर भूषण पाटीलला अकरा लाख असे १ कोटी ३६ लाख रुपये दिले होते. त्यानंतर आदित्यला कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्याचे डीनचे कागदपत्रे आणि ओळखपत्र पाठविले होते. मात्र त्यांनी कॉलेज प्रवेशाचे दिलेले कागदपत्रांसह ओळखपत्र बोगस असल्याचे नंतर उघडकीस आले. याच दरम्यान त्यांना त्यांचा परिचित विश्‍वनाथ बाळुंज यांना त्यांच्या मुलाला मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश देतो असे सांगून या चौघांनी फसवणुक केल्याचे समजले होते. हा प्रकार समजताच त्यांनी अनिलसह इतर तिघांना फोन करुन पैशांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी त्यांना सुमारे ५५ लाख रुपये परत केले. मात्र ८१ लाख रुपये परत न करता त्यांची फसवणुक केली होती. तसेच पोलिसांत तक्रार केल्यास त्यांच्या मुलाचे अपहरण करुन त्याची हत्या करण्याची धमकी दिली होती.

अशा प्रकारे या चौघांनी मेडीकल प्रवेशास पात्र असल्याचे बोगस मॅसेज तसेच कॉलेजच्या डीनच्या नावाने प्रवेश मिळाल्याचे बोगस कागदपत्रे व ओळखपत्र देऊन त्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे त्यांनी घडलेला प्रकार बोरिवली पोलिसांना सांगून चारही आरोपीविरुद्ध लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अनिल तांबट, संदीप वाघमारे, अभिजीत पाटील आणि भूषण पाटील यांच्याविरुद्ध पोलिसांनी भादवीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच या चौघांचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना गेल्या दहा महिन्यांपासून फरार असलेल्या अनिल तांबट याला औरंगाबाद येथून पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या गुन्ह्यांत इतर तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page