भुरळ पाडून वयोवृद्धांशी लगट करुन सोन्याच्या दागिन्यांची चोरी
६० वर्षांच्या वयोवृद्ध महिलेस अटक; नऊ गुन्ह्यांची नोंद
अरुण सावरटकर
१३ नोव्हेंबर २०२४
मुंबई, – वयोवृद्धांना भुरळ पाडून त्यांच्याशी लगट करुन सोन्याचे दागिने चोरी करुन पळून जाणार्या एका ६० वर्षांच्या रेकॉर्डवरील वयोवृद्ध महिलेस एमएचबी पोलिसांनी अटक केली. गीता किशन पटेल ऊर्फ गिताराणी असे महिलेचे नाव असून ती रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. तिच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात नऊहून अधिक अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. यातील काही गुन्ह्यांत ती पाहिजे आरोपी असल्याने तिचा ताबा लवकरच संबंधित पोलिसांकडे सोपविण्यात येणार आहे. बुधवारी तिने एका वयोवृद्धाशी लगट करुन त्यांच्याकडील दिड लाखांचे दागिने चोरी करुन पलायन केले, मात्र गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत तिला पोलिसांनी अटक केली. गुरुवारी दुपारी तिला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
८० वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार बोरिवलीतील एक्सर रोडवरील एका पॉश अपार्टमेंटमध्ये राहत असून एका खाजगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. बुधवारी १३ नोव्हेंबरला सकाळी साडेअकरा वाजता ते बाराच्या सुमारास ते बोरिवलीतील एक्सर रोड, विट्टल मंदिराजवळ आले होते. तिथेच त्यांची ओळख गिताशी झाली. तिने त्यांना भुरळ पाडून त्यांच्याशी संभाषण सुरु केले होते. तिच्या पतीला दारुचे व्यसन असून तो दारुच्या नशेत तिचा प्रचंड मानसिक शोषण करतो असे खोटे बोलून तिने त्यांच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बोलता बोलता तिने त्यांची माहिती काढण्याचा प्रयत्न केला. ते त्यांच्या घराच्या दिशेने जाताना तीदेखील त्यांच्यासोबत जात होती. त्यांच्या सोसायटीजवळ आल्यानंतर तिने त्यांच्या गळ्यात पडून त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील वीस ग्रॅम सोन्याची चैन आणि बदामाच्या आकाराचे स्वतिक असलेले लॉकेट असा दिड लाखांचा मुद्देमाल चोरी करुन तिने पलायन केले होते.
हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी एमएचबी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित महिलेविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. गेल्या काही महिन्यांत उत्तर-पश्चिम उपनगरात अशा प्रकारच्या काही घटना घडल्याने त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल एमएचबी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर एमएचबी पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या महिलेचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल जायभाये, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बळवंतराव, पोलीस निरीक्षक विजय आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील, भारत पौळ, पोलीस हवालदार अनिल शिंदे, श्रीधर खोत, रविंद्र पाटील आणि महांतेश सवळी यांनी तांत्रिक माहितीवरुन बोरिवली येथून गिता पटेल या महिलेस चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान तिनेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
६० वर्षांची वयोवृद्ध गिता पटेल ही भाईंदर येथील केबीन रोड, हरिकृपा इमारतीच्या टेरेस फ्लॅटमध्ये राहते. ती रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तिच्याविरुद्ध दहिसर, एमएचबी पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन, बोरिवली, अंधेरी, एमआयडीसी, कस्तुरबा मार्ग आणि मालाड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक अशा नऊ अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. यातील बहुतांश गुन्ह्यांत तिला पाहिजे आरोपी आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यामुळे एमएचबी पोलिसानंतर तिचा ताबा इतर पोलिसांकडे सोपविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांतील मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार आहे. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या महिलेस काही तासांत अटक करणार्या पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील, भारत पौळ, पोलीस हवालदार अनिल शिंदे, श्रीधर खोत, रविंद्र पाटील आणि महांतेश सवळी यांचे वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले.