विनयभंगाच्या दोन गुन्ह्यांत तिघांना कारावासाची शिक्षा
सहा महिने कारावासाह दंडाची शिक्षा सुनावण्यात आली
राजू परुळेकर
1 मार्च 2025
मुंबई, – विनयभंगाच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत तीन आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने दोषी ठरवून शिक्षा ठोठावली आहे. या तिघांमध्ये मोहम्मद लुकमान हाजी मुबारक शेख, रेहान लुकमान शेख आणि राजेश भागवत कोळी यांचा समावेश आहे. त्यांना सहा महिने कारावासासह दंडाची शिक्षा सुनावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
19 वर्षांची तक्रारदार महिला ही कांदिवली परिसरात राहत असून शिक्षण घेते. 4 एप्रिल 2024 रोजी तिला मोहम्मद लुकमान हाजी मुबारक शेख आणि रेहान लुकमान शेख यांनी हाताने मारहाण करुन तिच्याशी अश्लील शिवीगाळ करुन तिचा विनयभंग केला होता. यावेळी या दोघांनी तिच्याशी अश्लील वर्तन केले होते. या घटनेनंतर तिने या दोघांविरुद्ध समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी 509, 323, 34 भादवी कलमातंर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यात अटक केल्यानंतर त्यांच्याविरुद्ध बोरिवलीतील लोकल कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले. अलीकडेच या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी ए. एम मुजावर यांनी दोषी ठरवून दोघांनाही सहा महिने सश्रम कारावास आणि दोन हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास त्यांना आणखीन एक महिना साधी कैद सुनावण्यात आली आहे. या खटल्यात हेमंत पगारे यांनी सरकारी वकिल म्हणून काम पाहिले होते.
दुसर्या गुन्ह्यांतील तक्रारदार महिला ही 47 वर्षांची असून ती कांदिवलीतील ठाकूर व्हिलेज परिसरात राहते. डिसेंबर 2012 रोजी तिच्या पतीविरोधात राजेश भागवत कोळी याने आक्षेपार्ह मेल पाठविले होते. याबाबत ती त्याला जाब विचारण्यासाठी गेली होती. त्याचा राग आल्याने त्याने तिच्यासमोरच स्वतच्या अंगावरील कपडे काढून तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी 509 कलमातंर्गत गुन्हा नोंदवून समतानगर पोलिसांनी राजेश कोळीला अटक केली होती. त्याच्याविरुद्ध नंतर बोरिवलीतील लोकल कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी अलीकडेच पूर्ण झाली होती. यावेळी प्रथमवर्ग महानगर न्याय दंडाधिकारी ए. एम मुजावर यांनी आरोपी राजेश कोळीला दोषी ठरवून सहा महिने साधा कारावास आणि दहा हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक अजीतसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी, पोलीस उपनिरीक्षक प्रविण जाधव, न्यायालयीन कामकाज पाहणारे सहाय्यक फौजदार बजाजी जगताप, पोलीस हवालदार विवेक खोलम बाळू कोंडे, पोलीस शिपाई अक्षय सानप यांनी आरोपीविरुद्ध खटला सुरु असताना गुन्ह्यांतील तक्रारदार महिलेसह साक्षीदारांना वेळोवेळी सुनावणीसाठी हजर ठेवले आणि न्यायालयीन कामकाजात मदत केली होती.