अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणीची मागणी

विनयभंगासह खंडणीच्या गुन्ह्यांत मित्राला अटक व कोठडी

0

अरुण सावरटकर
19 मार्च 2025
मुंबई, – अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन एका 24 वर्षांच्या तरुणीला खंडणीसाठी धमकी देऊन, पैसे दिले नाही म्हणून तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करुन तिची बदनामी केल्याप्रकरणी 27 वर्षांच्या आरोपी मित्राला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. रोहित मंगूलाल बिसोई असे या आरोपीचे नाव असून तो मूळचा ओरिसाचा रहिवाशी आहे. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टाने गुरुवार 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्यावर विनयभंगासह खंडणीसाठी धमकी देणे आणि अश्लील व्हिडीओ व्हायरल करुन तरुणीची बदनामी केल्याच्या विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

24 वर्षांची तक्रारदार तरुणी ही मूळची ओरिसाची रहिवाशी आहे. तिथेच ती तिच्या आई-वडिल आणि दोन भावांसोबत राहत होती. तिच्या गावी आरोपी रोहित हा राहत असून ते दोघेही एकमेकांच्या परिचित आहेत. रोहित हा मुंबईत कामाला असल्याने तिने तिच्यासाठी मुंबई शहरात काम बघण्याची विनंती केली होती. त्यामुळे त्याने तिला मुंबईत बोलावून घेतले होते. घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने चार महिन्यांपूर्वीच ती मुंबई शहरात नोकरीसाठी आली होती. यावेळी रोहितने एका खाजगी प्लेसमेंट एजन्सीच्या वतीने तिला अंधेरी येथे एका व्यावसायिक महिलेच्या घरी घरकामाला ठेवले होते. तिथेच ती दिवसभर काम करुन राहत होती. त्यासाठी तिला दरमाह पंधरा हजार रुपयांचे वेतन मिळत होते. काम करताना ती नियमित रोहितच्या संपर्कात होती.

27 जानेवारी 2025 रोजी तिला सुट्टी होती, त्यामुळे रोहितने तिला बाहेर फिरायला बोलाविले होते. त्यामुळे ती त्याच्यासोबत दादर येथे गेली होती. तिथे गेल्यानंतर रोहितने तिला एका लॉजमध्ये नेले होते. तिथे त्यांच्यात शारीरिक संबंध आले होते. या शारीरिक संबंधाचे त्याने त्याच्या मोबाईलवर काही अश्लील व्हिडीओ बनविले होते. 9 फेब्रुवारीला रोहितने तिला कॉल करुन तिच्याकडे दहा हजाराची मागणी केली होती. त्याला पैशांची गरज होती, त्यामुळे तिने त्याला मदत करावी असे तो तिला सांगत होता. मात्र तिच्याकडे पैसे नसल्याने तिने काही दिवस थांबण्यास सांगितले होते. यावेळी तो तिला कॉल करुन ब्लॅकमेल करत होता. तिने पैसे दिले नाहीतर त्यांच्यातील शारीरिक संबंधाचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करुन तिची बदनामी करण्याची तो तिला धमकी देत होता. मात्र त्याकडे तिने दुर्लक्ष केले होते.

याच दरम्यान रोहितने तिचे अश्लील व्हिडीओ तिच्यासह तिच्या व्यावसायिक मालकीणीला पाठवून दिले होते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिने तिला विचारणा केली होती. त्यानंतर तिने तिच्या मालकीणीला घडलेला प्रकार सांगितला होता. रोहित पैशांसाठी तिला ब्लॅकमेल करत होता. तिने पैसे दिले नाहीतर म्हणून त्याने तिचे व्हिडीओ व्हायरल करुन तिची बदनामी केली होती. त्यानंतर मालकीणीच्या सल्ल्यानंतर तिने ओशिवरा पोलिसांत रोहितविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत ओशिवरा पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रोहितविरुद्ध विनयभंगासह खंडणीसाठी धमकी देणे, बदनामी करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. तो ओरिसा येथील पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र गावी जाण्यापूर्वीच त्याला जोगेश्वरी रेल्वे स्थानकातून ओशिवरा पोलिसांच्या एका विशेष पथकाने ताब्यात घेतले. चौकशीत त्याने त्याचा गुन्हा कबुल केला. त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला गुरुवार 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून हा मोबाईल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page