मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून फसवणुक
वयोवृद्ध महिलेला ७८ लाखांना गंडा घालणार्या दुकलीस अटक
अरुण सावरटकर
१९ जानेवारी २०२५
मुंबई, – मनी लॉंड्रिंगच्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून एका वयोवृद्ध महिलेची सुमारे ७८ लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी दुकलीस उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलच्या अधिकार्यांनी अटक केली. प्रितइंदर सुभाषचंद्र अरोरा आणि गौरव सतीशकुमार खुराणा अशी या दोघांची नावे आहेत. ते दोघेही काही सायबर ठगांच्या संपर्कात असून या सायबर ठगांना विविध बँकेत खाती पुरविण्याचे काम करत होते. याच बँकेत खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर केली जात होती. अटकेनंतर दोन्ही आरोपींना शनिवारी बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
वैशाली अरुण मोरे ६७ वर्षांची तक्रारदार महिला बोरिवलीतील गोराई परिसरात राहते. जून २०१८ साली ती एका खाजगी पेट्रोलियम कंपनीतून निवृत्त झाली आहे. ९ ऑक्टोंबरला सकाळी पावणेदहा वाजता तिला एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन तो मुंबई उच्च न्यायालयाच्या नोटीफिशन विभागातील कर्मचारी अजयकुमार बोलत असल्याचे सांगितले. त्यांच्याविरुद्ध अरेस्ट वॉरंट जारी झाले असून त्याचा क्रमांक सांगितला. यावेळी तिने तिच्याविरुद्ध कोणीही केस केली आहे याबाबत विचारणा केली होती. यावेळी त्याने बंगलोरच्या एका खाजगी बँकेने तिच्याविरुद्ध तक्रार केली आहे. तिच्या आधारकार्डवरुन संबंधित बँकेत एक खाते उघडण्यात आले असून तिला बँकेला २ लाख ७३ हजार ३०० रुपये देणे बाकी आहे.
ही बँक बंगलोर शहरात असल्याने तिच्याविरुद्ध तेथील स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या व्यक्तीने तिला स्काईप ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर तिच्याशी विनयकुमार चौबे नाव सांगणार्या एका तोतया पोलिसाने संभाषण सुरु केले होते. तुम्ही नरेश गोयलला ओळखता का अशी विचारणा करुन तिला त्याचा फोटो पाठविला. त्याला मनी लॉडिंगच्या गुनह्यांत पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या राहत्या घरी छापा टाकल्यानंतर २४७ क्रेडिट कार्ड सापडले असून त्यातील एक क्रेडिट कार्ड तिच्या नावाचा आहे. या कार्डवरुन दोन कोटीचे मनी लॉड्रिंग झाले आहे.
ही माहिती ऐकल्यानंतर तिने या संपूर्ण प्रकरणाशी तिचा काहीही संबंध नाही. तरीही त्याने तिला चौकशीसाठी बंगलोर येथे यावे लागेल असे सांगून तिच्यावर कारवाईची धमकी दिली होती. तिने आपण कॅन्सर पेशंट असल्याने बंगलोर येणे शक्य होणार नाही असे सांगून तुम्हाला तपासात सहकार्य करण्यास आश्वासन दिले होते. याच दरम्यान तिच्याशी इतर दोन महिलांनी संभाषण केले होते. या महिलांनी त्या बंगलोर पोलीस दलाशी संबंधित असल्याचे सांगितले. या महिलांची तिच्या आजारासह उपचाराची माहिती घेत तिच्याकडे तिच्या सर्व बँक खात्याचा तपशील घेतला होता. वरिष्ठ पातळीवर हा तपास सुरु असल्याने याबाबत कोाणालाही काहीही सांगू नका. त्याचे उल्लघंन केल्यास त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना अटकेची धमकी दिली होती.
तिला तिचे एफडी मोडून बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर करण्यास सांगण्यात आले. १० ऑक्टोंबरला दिपाली नाव सांगणार्या महिलेने तिला पुन्हा कॉल करुन तिच्या एफडीबाबत विचारणा केली होती. तिने एफडीची रक्कम बँक खात्यात जमा केल्याचे सांगितल्यानंतर तिने तिला सर्व बँक खात्याचे व्हेरीफिशन तसेच ऑडिट करायचे आहे असे सांगितले. त्यासाठी तिला एक बँक खाते देण्यात आले होते. या बँक खात्यात तिला तिच्या खात्यातील सर्व रक्कम ट्रान्स्फर करण्यास सांगण्यात आले होते. त्यासाठी तिला सर्वोच्च न्यायालयाची एक प्रत पाठविण्यात आली होती. ती प्रत पाहून तिने तिने दिलेल्या बँक खात्यात टप्याटप्याने ७८ लाख ७० हजार रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम पाठविल्यानंतर तिने त्याचे स्क्रिनशॉट पाठविले होते. यादरम्यान ही महिला तिच्याकडे तिच्या जेवणासह औषधाबाबत सतत विचारणा करत होती.
१२ ऑक्टोंबरला तिचा मुलगा घरी आला होता. यावेळी तिने घडलेला प्रकार तिच्या मुलाला सांगितला. त्याने तिची अज्ञात सायबर ठगांनी फसवणुक केल्याचे सांगून तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने घडलेला प्रकार बोरिवली पोलिसांसह सायबर सेल आणि सायबर हेल्पलाईनला सांगून तिथे फसवणुकीची तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध कट रचून पोलीस असल्याची बतावणी करुन पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलकडे वर्ग करण्यात आले होते. हा तपास हाती येताच पोलिसांनी आरोपींची माहिती काढून ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे त्या बँक खात्याचा तपशील काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रितइंदर अरोरा आणि गौरव खुाराणा या दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत या गुन्ह्यांत त्याचंा सहभाग उघडकीस आला होता. त्यांच्याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाली होती. अशा प्रकारे फसवणुक करणार्या काही सायबर ठगांच्या ते दोघेही संपर्कात होते. त्यांच्याच सांगण्यावरुन त्यांनी बँकेत खाती उघडली होती. याच खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर केली जात होती. त्यानंतर ती रक्कम ते दोघेही सायबर ठगांना पाठवत होते. याकामासाठी त्यांना ठराविक रक्कमेचे कमिशन मिळत होते. तपासात आलेल्या माहितीनंतर या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर दोन्ही आरोपींना शनिवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.