निवडणुकीच्या धामधुमीत वरिष्ठ निरीक्षकांच्या खुर्च्या रिकाम्याच
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पोलीस दलात संताप
राजू परुळेकर
१८ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राज्यात निवडणुक आयोगाने आचारसंहिता लागू केल्याने प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असली तरी मुंबई पोलीस दलात गेल्या आठवड्याभरापासून रिक्त असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या जागा भरण्याबाबत गृहखाते ढिम्मच असल्याचे दिसून आले आहे. त्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाचा अतिरिक्त ताणावामुळे पोलीस दलात संतापाची लाट उसळली आहे.
काही दिवसांपूर्वी कार्यकाळ पूर्ण झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. प्रशासकीय कारणास्तव झालेल्या या बदल्यांमुळे त्या रिक्त झालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या नियुक्त्या होणे आवश्यक होते. मात्र त्या जागा भरण्याची प्रक्रिया अद्याप सुरु झालेली नाही. या सगळ्याचा पोलीस दलाच्या कामाच्या कामजावर प्रचंड परिणाम होत आहे. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत ताण तुलनेत अधिक अशा वांद्रे, मालाड, कुरार, समतानगर, सायन, वर्सोवा आदी महत्त्वाच्या पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या खुर्च्या अद्याप रिकाम्या आहेत.
आता निवडणुकीमुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीमुळे अनेक राजकीय पक्ष आपले उमेदवार जाहीर करणार आहेत. मोर्चा, पदयात्रा, घोषणाबाजी आदी ताणतणावाचे प्रसंगात पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकच नसल्याने परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस ठाण्याचा प्रमुख नसल्याने आगामी काळात कुठलीही अनुचित प्रकार घडली त्याला कोण जबाबदार असेल असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे गृहखात्यावर सध्या सडकून टिका होताना दिसून येत आहे. ज्या पोलीस अधिकार्यांना मुंबई शहराची चांगली माहिती आहे, कठीण परिस्थितीत कुठलीही समस्या निर्माण झाल्यास, ती हाताळण्याची क्षमता आहे अशा काही चांगल्या आणि प्रामाणिक पोलीस अधिकार्यांची बदली ठाणे आणि इतर ठिकाणी करण्यात आली आहे.
काही पोलीस अधिकारी दाद मागण्यासाठी महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे गेले आहे. असा सगळा सावळागोंधळ सुरु असल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यात काही पोलीस ठाण्यात स्थानिक आमदारांची प्रचंड दादागिरी सुरु आहे. त्यांच्या मनासारखे काम होत नसल्याने अशा पोलिसांना जाणूनबुजून टार्गेट केले जात आहे. त्यामुळे काही अधिकार्यांनी स्वतची बदली इतर ठिकाणी करुन घेतली आहे. पोलीस दलावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले दिसून येत नाही. वरिष्ठांकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही.
बोरिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निनाद सावंत यांना सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून बढती दिल्यानंतर वाहतूक विभागात बदली दाखविण्यात आली होती, मात्र या बदलीला काही दिवस उलटत नाहीतर तोवर त्यांची गुन्हे शाखेच्या लिगल विभागात बदली दाखविण्यात आली. ज्या अधिकार्यांनी गुन्हे शाखेसह स्थानिक पोलीस ठाण्यात अनेक उल्लेखनीय कामगिरी केली, अनेक किचकट गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक केली. संघटित टोळी उद्धवस्त करण्यात मौलाची भूमिका पार पाडली. एखादी अनुचित घटना घडली की ती हाताळण्याची क्षमता आहे, अशा पोलीस अधिकार्याला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साईट पोस्टिंग देऊन त्यांचे खच्चीकरण करण्यात येत आहे.
अशा अनेक पोलिसांनी आपली खंत व्यक्त केली आहे. वरिष्ठ अधिकारी राजकीय नेत्यांच्या दबावापुढे झुकत असल्याने पोलिसांना कोणी वालीच राहिली नाही. त्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या आणि त्यानंतरच्या नियुक्त्यावर कोणाचेही नियंत्रण राहिले नसल्याने आगामी दिवसांत शहरात कुठलीही अनुचित घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असतील असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.