सायबर ठगांना विविध बँकेत खाती पुरविणार्या आरोपीस अटक
चौदा मोबाईल, सतरा सिमकार्डसह बँकेशी संबंधित मुद्देमाल जप्त
अरुण सावरटकर
26 नोव्हेंबर 2025
मुंबई, – डिजीटल अरेस्ट फसवणुकीच्या गुन्ह्यांतील सायबर ठगांना मदत करण्यासाठी विविध बँकेत खाती पुरविणार्या एका मुख्य आरोपीला अटक करण्यात उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांना यश आले आहे. जयेश जयंत झव्हेरी असे या 55 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईलसह सिमकार्ड व बँकेशी संबंधित हस्तगत केला आहे. त्यात गुन्ह्यांत वाापरलेले चौदा मोबाईल, सतरा सिमकार्ड, पाच डेबीट कार्ड, पंधरा चेकबुक, चार रबरी स्टॅम्प, अनेक व्यक्तींचे पॅनकार्ड, आधारकार्ड, बँक खाते तयार करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांचा समावेश आहे. याच कागदपत्रांच्या आधारे जयेश झव्हेरीने विविध बँकेत सायबर ठगांना बँक खाती उघडून दिल्याचा आरोप आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
यातील तक्रारदार 79 वर्षांचे वयोवृद्ध असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत उत्तर मुंबईत राहतात. 26 सप्टेंबर ते 7 नोव्हेंबर 2025 रोजी त्यांना ट्राय अधिकार्यासह स्थानिक पोलीस आणि सीबीआयचे अधिकारी असल्याची बतावणी करुन काही अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधा होता. त्यांचा मोबाईल क्रमांक मनी लॉड्रिंगच्या गुन्हयांत वापरण्यात आला असून त्यांचा सिमकार्ड एक तासांनी बंद होणार आहे. त्यांच्याविरुद्ध मनी लॉड्रिंगप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
याच गुन्ह्यांत त्यांची चौकशी सुरु आहे. त्यांच्या कागदपत्रांवरुन वेगवेगळ्या बँकेत खाती उघडण्यात आले असून त्यात कोट्यवधी रुपयांचे मनी लॉड्रिंगचा व्यवहार झाला होता. या व्यवहारात त्यांना मोठ्या प्रमाणात कमिशन मिळाल्याचे पुरावा मिळाल्याचा दावा करुन त्यांच्यावर डिजीटल अरेस्टची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. या प्रकाराने त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता.
त्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे कुठल्याही बँकेत खाते नाही, त्यांच्या खात्यात मनी लॉड्रिंगचे कुठलाही व्यवहार झाला नाही, त्यांना कोणाकडून कुठलेच कमिशन प्राप्त झाले नाही असे सांगितले. तरीही संबंधित अधिकार्यांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार असल्याची भीती दाखवून त्यांची चौकशी सुरु केली होती. त्यांच्याकडील बँक खात्याची डिटेल्स काढून बँकेतील सर्व रक्कम सीबीआयच्या सिक्रेट अकाऊंटमध्ये जमा करण्यास सांगितले.
चौकशी पूर्ण होताच तिची रक्कम तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर होईल असे सांगितले. अटकेसह कारवाईच्या भीतीने त्यांनी संबंधित बँक खात्यात 2 कोटी 65 लाख 11 हजार 400 रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र ठरल्याप्रमाणे त्यांनी ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली नाही. पैसे ट्रान्स्फर झाल्यानंतर त्यांची कोणीही चौकशी केली नव्हती. डिजीटल अरेस्टच्या नावाने त्यांची फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती.
याप्रकरणी भारतीय न्याय सहिता आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड, सहाय्यक पोलीस आयुक्त इरफान इब्राहिम शेख, प्रभारी पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पांचागणे, सुदर्शन पाटील, पोलीस शिपाई गणेश कोरे, किरण गवळी, पोलीस हवालदार रविंद्र पाटील, पोलीस शिपाई साळवे यांनी तपास सुरु केला होता.
तपासात फसवणुकीच्या रक्कमेपैकी 39 लाख 40 हजार 290 रुपये जयेश झव्हेरीच्या बॅक खात्यात जमा झाली होती. त्यामुळे या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढून जयेशला नालासोपारा येथून पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्यानेच फसवणुकीसाठी सायबर ठगांना विविध बॅकेत खाती उघडून दिले होते. याच बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. त्यानंतर ती रक्कम त्याने संबंधित ठगांना पाठविल्याची कबुली दिली. तपासात ही माहिती उघड होताच त्याच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.