आरटीओ चलनाची बोगस एपीके लिंक पाठवून 21 लाखांना गंडा
बँक खाती पुरविणार्या सुरतच्या व्यावसायिकाला अटक व कोठडी
अरुण सावरटकर
1 जानेवारी 2026
मुंबई, – आरटीओ चलनाची बोगस एपीके लिंक पाठवून एका व्यावसायिकासह त्याच्या पत्नीच्या बँक खात्यातून सुमारे 21 लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी हार्दिक अशोकभाई बोरडा नावाच्या एका 25 वर्षांच्या आरोपी व्यावसायिकाला उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. हार्दिकवर सायबर ठगांना फसवणुकीसाठी बँक खाती पुरविल्याचा आरोपी असून तो मूळचा गुजरातच्या सुरत, एबीसी चौक, ब्लॉसम होमचा रहिवाशी आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत मिलन कौशिक बारोट, विाल जादवानी, बम्ब्रोलिया, सुरेशभाई पोपटभाई चौहाण याच्यासह इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
भावेन हिम्मतलाल शहा हे मालाड येथे राहत असून त्यांचा त्यांच्या भावासोबत व्यवसाय आहे. 1 डिसेंबरला ते त्यांच्या बँकेत गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्यासह त्यांच्या पत्नीचे पासबुक अपडेट करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांना त्यांच्या बँक खात्यातून 11 लाख 33 हजार 880 रुपये तर त्यांची पत्नी हेतल शहा हिच्या बँक खात्यातून 10 लाख 39 हजार 326 रुपये असे 21 लाख 71 हजार 782 रुपये डेबीट झाल्याचे दिसून आले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी बँक मॅनेजरकडे तक्रार केली होती. यावेळी बँक मॅनेजरने त्यांच्या खात्याची पाहणी केली असता त्यांच्यासह त्यांच्या पत्नीच्या खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार झाल्याचे दिसून आले.
सायबर फ्रॉडचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांनी उत्तर सायबर सेल विभागात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्या मोबाईलची पाहणी केली होती. त्यात त्यांना 17 नोव्हेंबरला एका अज्ञात व्यक्तीने एपीके फाईल पाठविली होती. अहमदाबाद येथे लग्नाच्या कार्यक्रमांत व्यस्त असताना त्यांनी ही फाईल त्यांनी ओपन केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यांना आरटीओ चलन पाठवून अज्ञात व्यक्तीने त्यांच्यासह त्यांच्या पत्नीचे अॅक्सेस प्राप्त करुन त्यांच्या खात्यातून या रक्कमेचा परस्पर अपहार करुन फसवणुक केली होती.
हा प्रकार उघडकीस येताच अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पांचागणे, पोलीस हवालदार रविंद्र पाटील, किरण गवळी व अन्य पोलीस पथकाने ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्याची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. त्यात ही रक्कम वेगवेगळ्या आठ बँक खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे दिसून आले. या बँक खात्याचे खातेदार मिलन कौशिक बारोट, विशाल जादवानी, बम्ब्रोलिया, सुरेशभाई पोपटभाई चौहाण होते, ते सर्वजण गुजरातच्या सुरतचे रहिवाशी असल्याने सायबर सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पांचागणे, पोलीस हवालदार रविंद्र पाटील, किरण गवळी आदींची एक टिम सुरतला रवाना झाली होती.
चौकशीत हार्दिक व मिलन बारोट यांच्या संयुक्त बँक खात्यात त्यातील काही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. हार्दिकने बँक खाते उघडून त्याची माहिती संबंधित आरोपींना दिली होती. या बँक खात्यात जमा होणार्या रक्कमेवर तो अडीच टक्के कमिशन घेत होता. त्याच्या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा झाल्यानंतर त्याला तीन लाख सत्तर हजार रुपये मिळाले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर हार्दिकला सुरतला किरण चौक, निलकंठ प्लाझा परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
या गुन्ह्यांत त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला अटक करुन पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल व दोन सिमकार्ड जप्त केला आहे. हार्दिकच्या बँक खात्यात सुमारे नऊ लाख रुपये जमा झाले होते. या रक्कमेची त्याने रिधम धमेलियाच्या मदतीने विल्हेवाट लावल्याचे उघडकीस आले आहे. अटकेनंतर हार्दिकला बुधवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण कटात चार ते पाचजणांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.