वयोवृद्धाची सव्वादोन कोटीची फसवणुक करणारा गजाआड

दशहतवाद्यांसाठी बँक खाते उघडून कमिशन घेतल्या आरोप करुन गंडा

0

अरुण सावरटकर
4 मार्च 2026
मुंबई, – गोरेगाव येथे राहणार्‍या एका वयोवृद्धाची सुमारे सव्वादोन कोटींची फसवणुक केल्याप्रकरणी किशन भावेशभाई मकवाना या आरोपीस उत्तर प्रादेशिक विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. जम्मू-काश्मीर येथील एका नामांकित बँकेत दहशतवाद्यांसाठी खाते उघडून त्यातून सत्तर लाखांचे कमिशन घेतल्याचा आरोप करुन तक्रारदार वयोवृद्धाला गंडा घालण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. आरोपी किशन हा मूळचा गुजरातचा रहिवाशी असून तो काही सायबर ठगांच्या संपर्कात आहे. फसवणुकीसाठी त्याने या ठगांसाठी बँकेत खाते उघडले होते. याच बँक खात्यात फसवणुकीची ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

दत्तात्रय महादेव देशपांडे हे 77 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार त्यांच्या पत्नीसोबत गोरेगाव येथे राहतात. त्यांना दोन मुली असून या दोघींचे लग्न झाले आहेत. 15 नोव्हेंबर 2025 रोजी ते त्यांच्या घरी असताना त्यांना सकाळी अकरा वाजता आकाश शर्मा नावाच्या एका व्यक्तीचा फोन आला होता. त्याने तो मुंबई पोलीस मुख्यालयातून वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करुन त्यांना एक मोबाईल क्रमांक सांगितला. या व्यक्तीला तुम्ही ओळखता का याबाबत विचारणा केली होती. त्यांनी नकार देताच त्याने त्यांना तुम्हाला चौकशीसाठी यावे लागेल असे सांगितले. यावेळी त्यांनी त्यांची पत्नी आजारी असल्याचे सांगून त्यांना चौकशीसाठी हजर राहता येणार नाही. याच दरम्यान त्याने त्याचा कॉल लखनऊ एटीएस युनिटला ट्रान्स्फर केला होता.

यावेळी प्रेमकुमार गौतम नावाच्या अन्य एका पोलीस अधिकार्‍याने त्यांच्याशी संभाषण केले होते. त्याने त्यांच्या आधारकार्डवरुन जम्मू-काश्मीर येथील एका खाजगी बँकेत एक खाते उघडण्यात आले आहे. या संशयित अतिरेक्यांसाठी काही रक्कम जमा झाली होती. त्यासाठी त्यांना दहा टक्के म्हणजे सत्तर लाख रुपये प्राप्त झाले आहेत असा आरोप केला होता. मात्र त्यांनी या आरोपांचे खंडन केले. त्यांचा कुठल्याही अतिरेकी किंवा अतिरेकी संघटनेशी तसेच संबंधित बँक खात्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले. 2025 साली मी जम्मूला फिरायला गेलो होते, त्यानंतर तिथे कधीच गेलो नाही. काही वेळानंतर प्रेमकुमारने त्यांचा कॉल कट केला. याच दरम्यान त्यांना त्यांच्या व्हॉटअपवर एक नोटीस आणि कराराची प्रत प्राप्त झाली होती. त्यात एनआयएचे प्रमुख सदानंद दाते यांची स्वाक्षरी होती.

या करारात संबंधित व्यक्तीने तपासात सहकार्य केले नाहीतर त्यांना दहा वर्ष कारावास आणि पाच लाखांच्या दंडाची शिक्षा होईल असे नमूद केले होते. या करारासोबत त्यांच्या नावाने अरेस्ट वॉरंट आणि अरेस्ट सीझर ऑर्डरची प्रत होती. 17 नोव्हेंबरला प्रेमकुमारने त्यांना पुन्हा कॉल करुन ही गोपनीय चौकशी होणार आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत याबाबत कोणाशी काहीही चर्चा करु नका असे सांगून त्यांना त्यांच्या बँक खात्याची डिटेल्स पाठविण्यास सांगितले. बँकेची माहिती शेअर केल्यानंतर त्यांनी त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांना बँक खात्यात रक्कम त्याने दिलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर करावी लागेल. चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यांना ती रक्कम परत केली जाईल. त्यांनी सहकार्य केले नाहीतर त्यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली जाईल असे सांगितले.

अटकेच्या भीतीने त्यांनी प्रेमकुमारने दिलेल्या बँक खात्यात 18 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2025 या कालावधीत टप्याटप्याने सुमारे सव्वादोन कोटी रुपये ट्रान्स्फर केले होते. ही रक्कम पाठविल्यानंतर त्यांनी त्यांना त्यांचा जामिन झाला असून त्यांच्यावर आता अटकेची कारवाई होणार नाही. काही दिवसांत त्यांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात पाठवली जाईल असे सांगितले. मात्र त्यांनी ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली नाही. त्यामुळे त्यांनी संबंधित पोलिसांना कॉल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे मोबाईल बंद येत होते. त्यामुळे त्यांनी ही माहिती त्यांची मुलगी प्रिया वालावलकर हिला सांगितली. त्यांची फसवणुक झाल्याचे सांगून तिने त्यांना पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी उत्तर सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता. तांत्रिक माहितीवरुन फसवणुकीची काही रक्कम किशन मकवाना या व्यक्तीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना किशनला तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला आहे. त्यानेच फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँकेत खाते उघडून दिले होते.

याच खात्याचा फसवणुकीसाठी वापर केला होता. तक्रारदारासह इतर गुन्ह्यांतील फसवणुकीची रक्कम त्याच्याच बँक खात्यात जमा झाले होते. ही रक्कम नंतर त्याने सायबर ठगांना ट्रान्स्फर केले होते. त्यासाठी त्याला या ठगांकडून चांगले कमिशन देण्यात आले होते. तपासात आलेल्या या माहितीनंतर किशन मकवाना याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page