ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील टोळीचा पर्दाफाश

रेकॉर्डवरील तिघांना अटक; सतरा तक्रारीची नोंद प्राप्त

0

राजू परुळेकर
३० डिसेंबर २०२४
मुंबई, – ओएलएक्सवर स्वस्तात मोबाईलची जाहिरात देऊन ऑनलाईन फसवणुक करणार्‍या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांतील तीन गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली. इम्रान रिझवान अन्सारी, रिझवान वसी अहमद अन्सारी आणि लक्ष्मण मच्छिंद्र गोरे अशी या तिघांची नावे आहेत. यातील इम्रान आणि लक्षमण हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्या मोबाईलसह बँक खात्यातून सतरा ऑनलाईन फसवणुकीच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाले आहेत. अटकेनंतर या तिघांनाही पुढील चौकशीसाठी आंबोली पोलिसांकडे सोपविण्यात आले असून सध्या ते तिघेही पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

२३ वर्षांचा तक्रारदार तरुण संकेत दिनेश केणी हा मालाड येथे राहतो तर अंधेरी येथे एका खाजगी कंपनीत कामाला आहे. २९ मार्च २०२३ रोजी तो त्याच्या कार्यालयात काम करत होता. यावेळी त्याला ओएलएक्स या ऑनलाईन साईटवर ऍपल कंपनीचा आयफोन १४ प्रो हा ऐंशी हजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहिरात दिसली होती. स्वस्तात आयफोन मिळत असल्याने त्याने मोबाईल खरेदीसाठी आपण इच्छुक असल्याचा मॅसेज पाठविला होता. त्यानंतर त्याला रिझवानने संपर्क साधला होता. चर्चेअंती त्यांच्यात ६३ हजारामध्ये आयफोन खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला होता. त्यामुळे त्याने त्याला ऑनलाईन ६३ हजार रुपये पाठविले होते. काही दिवसांनी त्याने क्लोन केलेला बोगस आयफोन मोबाईल पाठवून त्याची फसवणुक केली होती.

२९ मार्च ते १३ जून २०२३ या कालावधीत हा संपूर्ण फसवणुकीचा प्रकार घडला होता. त्यामुळे संकेत केणीने आंबोली पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांतील आरोपी अटक करण्यात आंबोली पोलिसांना यश आले नव्हते. त्यामुळे हा गुन्हा ए फाईलन केला होता. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत होते. तपासादरम्यान संबंधित आरोपी धारावी परिसरात राहत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय बिराजदार यांना मिळाली होती.

या माहितीनंतर प्रभारी पोलीस निरीक्षक लता सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय बिराजदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सावंत, पोलीस हवालदार महाजन, उघाडे, पोलीस शिपाई चव्हाण यांनी धारावी आणि डोबिवली येथून इम्रान अन्सारी, रिझवान अन्सारी आणि लक्ष्मण गोरे या तिघांनाही संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. तपासात या तिघांनीच संगनमत करुन ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिघांचा ताबा आंबोली पोलिसांना देण्यात आला.

तपासात इम्रान आणि रिझवान हे दोघेही धारावी तर लक्ष्मण हा डोबिवलीचा रहिवाशी आहे. ते तिघेही ऑनलाईन फसवणुक करणार्‍या काही सायबर ठगांच्या संपर्कात होते. त्यांनी बोगस खाती उघडून त्यात फसवणुकीची रक्कम जमा करण्यास अनेकांना प्रवृत्त केले होते. या आरोपींच्या मोबाईलसह बँक खात्याची माहिती सायबर पोर्टलवरुन घेतली असता त्यांच्या बँक खात्यात मुंबईसह गुजरात, कर्नाटक, उत्तरप्रदेश, दिल्ली, कोलकाता, राजस्थान, मिरा-भाईंद या ठिकाणी अशा प्रकारच्या एकूण सतरा तक्रारी अर्ज प्राप्त झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या तिघांनाही रविवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page