हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड वयोवृद्ध आरोपीस युपीतून अटक
बॅटमिंटन मेंबरशीपच्या बहाण्याने बोलावून 31 वर्षांनी अटकेची कारवाई
अरुण सावरटकर
3 जानेवारी 2026
मुंबई, – गंभीर दुखापतीसह हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या एका वयोवृद्ध आरोपीस उत्तरप्रदेशातून ओशिवरा पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. हकीम नरसिंग यादव असे या 61 वर्षांच्या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. बॅटमिंटन मेंबरशीपच्या बहाण्याने बोलावून हकीमला 31 वर्षांनी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. हकीम हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मुंबईतील खार, ओशिवरा पोलीस ठाण्यात तीन तर छत्रपती संभाजीनगरच्या जवाहरनगर पोलीस ठाण्यात एक अशा चार गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हकीम हा कुर्ला येथील शिवाजी चौक, दुबे चाळीत राहत होता. 1994 साली त्याच्यासह इतर आरोपीविरुद्ध ओशिवरा पोलिसांनी घातक शस्त्रांच्या धाकावर गंभीर दुखापतीसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यांत नंतर हकीम यादवला पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत असताना त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी होऊन त्याला विशेष सेशन कोर्टाने जामीन मंजूर केला होता.
मात्र जामिनावर बाहेर येताच तो पळून गेला होता. तो खटल्याच्या सुनावणीसाठी सतत गैरहजर राहत होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध सेशन कोर्टाने त्याच्याविरुद्ध अटकपूर्व जामिन वॉरंट जारी करुन त्याच्या अटकेचे आदेश ओशिवरा पोलिसांना दिले होते. संबंधित अटक वॉरंट कोर्ट कारकून अंमलदार मधुरा बर्वे, सिमा धवन यांच्याकडून प्राप्त होताच ओशिवरा पोलिसांनी हकीमच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.
त्याचा त्याच्या कुर्ला येथील राहत्या घरी शोध घेतल्यानंतर तो तिथे राहत नसल्याचे उघडकीस आले होते. गेल्या 31 वर्षांपासून पोलीस त्याच्या मागावर होते, त्याच्याशी संबंधित सर्व नातेवाईक, मित्र आणि नातेवाईकाकडून त्याची माहिती काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्याच्याविषयी कोणालाही काहीही माहिती नव्हती. याच दरम्यान या पथकाने कुर्ला, सहार, खार आणि विलेपार्ले परिसरात त्याचा शोध घेतल्यानंतर पोलिसांना एक मोबाईल क्रमांक प्राप्त झाला होता.
या मोबाईलच्या लोकेशनवरुन संंबंधित व्यक्ती उत्तरप्रदेशातील सोनभद्र, रॉबर्टगंज परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार बाविस्कर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनिल साळुंखे, पोलीस हवालदार महेश साळोखे, पोलीस शिपाई महेंद्र भोये, स्वप्नील सोनावणे आदीचे एक पथक उत्तरप्रदेशात पाठविण्यात आले होते.
या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने हकीमची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. यावेळी हकीम हा रॉबर्टगंजच्या न्यू शिवाजी बॅटमिंटन मिनी स्टेडियममध्ये काम करत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून बॅटमिंटन मेंबरशीपच्या बहाण्याने चौकशी केली होती. या चौकशीनंतर त्याने त्याचे नाव हकीम असल्याचे सांगितले. त्यानंतर या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मिनी स्टेडियम परिसरात साध्या वेशात पाळत ठेवून हकीम यादवला ताब्यात घेतले होते.
चौकशीत तोच गंभीर दुखापतीसह हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपी असल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडून पोलिसांनी एक आधारकार्ड जप्त केले असून त्यात त्याचे नाव हकीम नरसिंग यादव असल्याचे होते. याच गुन्ह्यांत त्याला ट्रॉन्झिंट रिमांडसाठी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने ट्रॉन्झिंट रिमांड प्राप्त होताच त्याला पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते.
यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तपासात हकीमविरुद्ध खार पोलीस ठाण्यात दोन, ओशिवरा आणि जवाहरनगर पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्ह्यांची नोंद असल्याचे उघडकीस आले. गेल्या 31 वर्षांपासून हकीम पोलिसांना सतत गुंगारा देत होता, अखेर त्याला उत्तरप्रदेशातून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.