फसवणुकीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या वरिष्ठ अधिकार्याला अटक
बोगस इन्व्हाईस तयार करुन कंपनीच्या ७३ लाखांचा अपहाराचा आरोप
अरुण सावरटकर
१८ जानेवारी २०२५
मुंबई, – फसवणुकीच्या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या कंपनीच्या ऍडमिन विभागाच्या सहाय्यक व्यवस्थापक शैलेश कुट्टी शेट्टी याला पवई पोलिसांनी अटक केली. कंपनीत न झालेल्या बैठकासह प्रशिक्षण सत्राचे बोगस इन्व्हाईस बिल सादर करुन सुमारे ७३ लाखांचा अपहार करुन कंपनीची फसवणुक केल्याचा शैलेशवर आरोप आहे. याच गुन्ह्यांत अटक केल्यांनतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.
मंदार मारुती नलावडे हे ठाण्यातील माजीवाड्यातील रहिवाशी असून पवईतील शिंडलर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सहाय्यक महाव्यवस्थापक म्हणून कामाला आहेत. त्यांच्या कंपनीत शैलेश शेट्टी हा गेल्या अकरा वर्षांपासून सहाय्यक व्यवस्थापक ऍडमिन म्हणून कामाला होता. त्याच्यावर मुंबई एक आणि दोन कार्यालयात लागणारे स्टेशनरी साहित्य पुरविणे, कंपनीतील होणार्या बैठका, प्रशिक्षण सत्राच्या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचार्यांची जेवण, नास्ता, आयोजन करुन होणार्या खर्चाचा तपशील संबंधित विभागात सादर करणे आदीची जबाबदारी होती. बैठका, प्रशिक्षण सत्रासाठी पुरविण्यात आलेल्या जेवणासह नास्तासाठी कंपनीने आर. के कॅटरर्सचे रविंद्र गोपाळ कुळर्ये यांची नियुक्ती केली होती. जून-जुलै २०२४ रोजी मुंबई एक आणि दोन कार्यालयात कंपनीच्या ऍडमिन खात्यात मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याचे कंपनीच्या फायानान्स टिमला दिसून आले होते.
आर. के कॅटरर्सचे वार्षिक बिल पाच ते सात लाख रुपये येत होते. मात्र अचानक त्यात सव्वाकोटी खर्च झाल्याचे नमूद करण्यात आले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच शैलेश शेट्टीकडे विचारणा करण्यात आली होती. यावेळी त्याने कंपनीत झालेल्या बैठकासह प्रशिक्षण सत्राचे पाच अटेंडंट शिट्स सादर केल्या होत्या. त्यातील काही शिट्स या बोगस असल्याचे वरिष्ठांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची कंपनीकडून चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या आदेशांनतर ऑगस्ट २०२४ रोजी लिगल विभागाचे प्रमुख मंदार नलावडे यांनी तपास सुरु केला होता. त्यात शैलेश शेट्टीने आर. के कॅटरर्सला जास्तीचे बिलाचे पेमेंट केल्याचे दिसून आले. त्यामुळे रविंद्र कुळर्ये यांची चौकशी करण्यात आली होती. यावेळी त्यांनी नजरचुकीने सुमारे ६२ लाखांचे पेमेंट जास्त आल्याची कबुली देताना कंपनीला दोन धनादेश दिले होते.
याच दरम्यान कंपनीच्या चार वर्षांच्या सर्टिफाईट स्टेटमेंटची पाहणी करण्यात आली होती. त्यात ३८ बँक नोंदी असल्याचे आले. त्यात आर. के कॅटरर्स यांच्या बँक खात्यात १ कोटी ४ लाख रुपये तर शैलेश शेट्टीच्या बँक खात्यात काही रक्कम ट्रान्स्फर झाली होती. या रक्कमेची पाहणीनंतर या दोघांकडून कंपनीला सुमारे सत्तर येणे बाकी होते. त्यामुळे त्यांना ती रक्कम तातडीने कंपनीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास सांगण्यात आले होते. तपासात जुलै २०२३ ते जून २०२४ या कालावधीत शैलेशने कंपनीत बैठका आणि प्रशिक्षण सत्र झाले नसताना तीन ऑफिस बॉय यांच्याकडून कामगारांचे प्रशिक्षणाचे सत्र झाल्याचे बोगस हजेरी शिट तयार करण्यात आले होते. त्यात बोगस इन्वाईस तयार करुन आर. के कॅटरर्सला एक कोटी दहा लाख साठ हजार रुपयांचे पेमेंट करण्यात आले होते.
ही रक्कम नंतर या कंपनीकडून शैलेशच्या बँक खात्यात ट्रानस्फर झाल्याचे उघडकीस आले होते. अशा प्रकारे शैलेशने कंपनीत कामगाराचे प्रशिक्षण सत्रासह बैठका झाले नसताना त्यात जेवण आणि नास्तासाठी खर्च झाल्याचे दाखवून ३४ बोगस इनव्हाईस तयार करुन ती बिले पास करुन कंपनीची ७३ लाख ६७ हजार ८९५ रुपयांची फसवणुक केली होती. हा अहवाल सादर केल्यानंतर वरिष्ठांकडून शैलेश शेट्टीवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तसेच कंपनीच्या वतीने मंदार नलावडे यांना पवई पोलिसांना तक्रार करण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशानंतर त्यांनी पवई पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शैलेश शेट्टीविरुद्ध बोगस इन्व्हाईस बिल तयार करुन कंपनीच्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याच गुन्ह्यांत त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले होते. त्याचा शोध असताना त्याला दोन महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. आतापर्यंत चौकशीत शैलेशने बोगस इन्व्हाईस तयार करुन कंपनीच्या पैशांचा अपहार केल्याची कबुली दिली आहे.