अभिनेता सैफअली खानच्या हल्लेखोराविरुद्ध आरोपपत्र दाखल
हल्लेखोराविरुद्ध भक्कम पुरावे असल्याचा पोलिसांचा दावा
राजू परुळेकर
9 एप्रिल 2025
मुंबई, – सिनेअभिनेता सैफअली खान याच्यावर हल्ला करणार्या शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद राहिल्ला अमीर फकीर याच्याविरुद्ध वांद्रे पोलिसांनी बुधवारी सायंकाळी सोळाशे पानाचे आरोपपत्र सादर केले. या आरोपपत्रात शरीफुलविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्यात आल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. हल्ल्याच्या वेळेस शरीफुलने घातलेले टी शर्ट, चाकूच्या हँडलवर आढळलेला डीएनए सैफअली खानशी जुळत असल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले.
सैफअली खान हा वांद्रे येथील सतगुरु शरण अपार्टमेंटच्या अकराव्या आणि बाराव्या मजल्यावर राहतो. जानेवारी महिन्यांत त्याच्या फ्लॅटमध्ये शरीफुल हा चोरीच्या उद्देशाने घुसला होता. मात्र सैफच्या मोलकरणीमुळे त्याचा चोरीचा प्रयत्न फसला, अटकेच्या भीतीने पळून जाताना त्याला सैफने पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने सैफवर चाकूने हल्ला केला होता. याप्रकरणी वांद्रे पोलिसांत गुन्हा दाखल होताच चार दिवसांनी शरीफुलला ठाण्यातून पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडीनंतर गेल्या तीन महिन्यांपासून तो न्यायालयीन कोठडीत आहेत. या गुन्ह्यांचा तपास पूर्ण झाल्याने बुधवारी वांद्रे पोलिसांनी शरीफुलविरुद्ध वांद्रे येथील लोकल कोर्टात सोळाशे पानांचे आरोपपत्र सादर केले आहे. या आरोपपत्रात चाळीसहून अधिक साक्षीदारांची जबानी नोंदविण्यात आली असून त्यात सैफअलीसह त्याची पत्नी करीना, घरातील नोकर, सुरक्षारक्षक, पोलीस अधिकारी, कर्मचारी, रिक्षाचालक, तचा मालक जितेंद्र पांडे, एकमेव नातेवाईक त्याचा मामाचा आदींचा समावेश आहे.
या साक्षीदारामध्ये एका बांगादेशी महिलेचा समावेश असून तिचा मोबाईल शरीफुलने चोरी केला होता. आरोपपत्रात फॉन्सिक अहवाल सादर करण्यात आला असून त्यात सर्व अहवाल शरीफुलशी जुळल्याचा दावा पोलिसांकडून आला आहे. चेहर्याची ओळख चाचणीचे निकाल, फिंग्ररपिंट विश्लेषण आणि सैफअलीच्या रक्ताच्या डाग आरोपीच्या शर्टावर आढळले आहेत. आरोपपत्रात ओळख परेड आणि इतर फॉन्सिक प्रयोगशाळेतील निष्कर्ष समावेश करण्यात आला आहे. गुन्ह्यांतील चाकून पोलिसांनी वांद्रे तलावातून जप्त केला असून सैफअलीच्या मणक्यात अडकलेला चाकूचा तुकडा जप्त केलेल्या तुकड्याशी जुळल्याचे अहवालात नमूद करणयात आले आहे.
सतगुरु शरण अपार्टमेंटच्या सीसीटिव्ही फुटेजसह इतर फुटेजमध्ये शरीफुल स्पष्टपणे दिसत आहे. या संपूर्ण प्रकरणात वैज्ञानिक पुरावे महत्त्वाचे असून ते सर्व पुरावे पोलिसांकडे उपलब्ध आहेत. तसेच तांत्रिक आणि भौतिक पुरावेही पोलिसांनी आरोपपत्रात सामिल केले आहे. त्यामुळे या गुन्ह्यांत शरीफुलला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे एका अधिकार्याने सांगितले. शरीफुलने इमारतीची केलेली रेकी, तो घरात कसा आणि कोठून घुसला, त्याने सैफवर कसा हल्ला केला. हल्ल्यानंतर तो कसा आणि कुठे पळून गेला, वांद्रे येथून तो वरळी आणि नंतर ठाण्यात गेला याचे काही सीसीटिव्ही फुटेज पोलिसांना सापडले आहेत.
जवळपास चाळीसहून अधिक फुटेज वापरुन त्याचा मागोवा घेण्यात आला होता. या फुटेजवरुन शरीफुलनेच सैफच्या घरात चोरीच्या उद्देशाने प्रवेश केला, चोरीचा प्रयत्न फसल्यानंतर त्याने सैफवर हल्ला केला. त्याचा गुन्ह्यांच्या वेळेस घातलेला टी शर्ट, चाकू, पूर्वी काम करत असलेल्या हॉटेलचा लोगो आदी मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. शरीफुलविरुद्ध आरोपपत्र दाखल झाल्याने या खटल्याची आता नियमित सुनावणी सुरु होणार आहे. या गुन्ह्यांत शरीफुलला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी आरोपपत्रात भक्कम पुरावे सादर केल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.