सैफअलीच्या हल्लेखोरांना पकडणार्‍या पोलीस पथकाचा विसर

दोनशेहून पोलिसांचा सहपोलीस आयुक्ताकडून सत्कार

0

राजू परुळेकर
२० जानेवारी २०२५
मुंबई, – चोरीच्या उद्देशाने सिनेअभिनेता सैफअली खान याच्यावर हल्ला करणार्‍या शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद राहिल्ला अमीर फकीर या ३० वर्षीय आरोपीला चार दिवसांनी अटक करणार्‍या दोनशेहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्याकडून सत्कार करण्यात आला. मात्र शरीफुलला हिरानंदानीच्या खाडीजवळील अंधार असलेल्या झुडपात मोबाईलच्या टॉच लावून जिवाची रान करुन पकडणार्‍या झोन सहाचे पोलीस उपायुक्त पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल गायकवाड, पोलीस शिपाई कैलास सावकारे, आश्‍विन कोळेकर आणि अन्य एका पोलीस शिपायाचा वरिष्ठांना विसर पडल्याचे दिसून आले. या पोलीस पथकाचे अभिनंदन आणि सत्कार न झाल्याने पोलीस दलात प्रचंड नाराजी असल्याचे बोलले जाते.

चोरीच्या उद्देशाने सैफअलीच्या फ्लॅटमध्ये घुसून शरीफुलने प्रवेश केला होता. मात्र सैफअलीच्या महिला स्टाफमुळे त्याचा चोरीचा प्रयत्न फसला, याच दरम्यान तिथे सैफअलीला आला आणि त्याने शरीफुलला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने त्याच्यासह इतर महिला स्टाफवर चाकूने हल्ला करुन पलायन केले होते. पळून गेलेल्या आरोपी हल्लेखोराच्या अटकेसाठी पोलिसांच्या स्थानिक पोलिसांनी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. चार दिवस उलटूनही आरोपी हल्लेखोर सापडत नसल्याने वरिष्ठांकडून तपास अधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली होती. याच दरम्यान पोलिसांना सीसीटिव्ही फुटेजवरुन आरोपीची ओळख पटली होती. तो ठाण्यातील त्याचा मित्र पांडे याच्या संपर्कात होता. त्यालाच त्याने शेवटचा कॉल केला होता. त्यामुळे ठाण्यात गेलेल्या पोलीस पथकाने पांडेला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने शरीफुल हा बांगलादेशी नागरिक असून तो रात्रीच बांगलादेशात पळून जाण्याच्या तयारीत आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोड, हिरानंदानीजवळील खाडी परिसरात तो लपला असल्याची माहिती प्राप्त झाली होती. या माहितीनंतर स्वत पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी विक्रोळी आणि चुन्नाभट्टी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल गायकवाड, पोलीस शिपाई कैलास सावकारे, आश्‍विन कोळेकर आणि अन्य एका पोलीस शिपायासोबत त्याचा शोध घेतला होता. तिथे प्रचंड अंधार होता, त्यामुळे या पथकाने मोबाईलचा टॉच लावून त्याचा शोध सुरु केला होता. बराच वेळ शोध घेतल्यानंतर शरीफुल हा एका झुडपात लपवून बसला होता. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने लगेचच स्वतचा गुन्हा कबुल केला. मला मारु नका, मीच चोरीच्या उद्देशाने सैफअलीच्या घरात प्रवेश केल्याचे सांगितले. त्याला पकडल्यानंतर ही माहिती वांद्रे पोलिसांना देण्यात आली होती. त्यानंतर त्याचा ताबा संबंधित पोलिसांना देण्यात आला होता.

शरीफुलला अंधार असताना मोबाईल टॉचवरुन शोधून पकडून वांद्रे पोलिसांच्या स्वाधीन करणार्‍या पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल गायकवाड, पोलीस शिपाई कैलास सावकारे, आश्‍विन कोळेकर आणि अन्य एका पोलीस शिपायाचा पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी कौतुक केले होते. शरीफुलला पकडणार्‍या या पोलीस पथकाचे अभिनंदन करुन त्यांचा सत्कार होणे गरजेचे होते, मात्र वरिष्ठांना या चारही पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा विसर पडल्याचे दिसून आले. सोमवारी पोलीस आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमांत दोनशेहून अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा सत्कार करण्यात आला आहे. उत्कृष्ठ कामगिरी बजाविली म्हणून त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गोरविण्यात आले. मात्र संबंधित कारवाई यशस्वीपणे पार पाडणार्‍या पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल गायकवाड, पोलीस शिपाई कैलास सावकारे, आश्‍विन कोळेकर आणि अन्य एका पोलीस शिपायाची साधी दखलही वरिष्ठांनी घेतली नाही. त्यांचा कामाचा कुठेही उल्लेख झाला नसल्याचे दिसून आले. जिवाची बाजी लावून शरीफुलला पकडूनही साधी कौतुकाची थाप न मिळाल्याने पोलीस दलात प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. ज्या पोलीस पथकाचे सहपोलीस आयुक्तांकडून सत्कार झाला, त्यांनीही शरीफुलला पकडण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र शरीफुलला ज्या पोलिसांनी ताब्यात घेऊन संबंधित पोलिसांच्या स्वाधीन केले त्याची साधी दखल घेण्यात आली नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
दो दिनो से कुछ खाया नही; मुझे खाना दो
शरीफुलला पकडल्यानंतर त्याने पोलिसांकडे मुझे खाने को दो, मैने दोन दिन से कुछ खाया नही असे सांगितले. हल्ल्यानंतर पळून गेल्यानंतर शरीफुल हा वांद्रे, दादर आणि ठाण्याला गेला होता. याच दरम्यान त्याला त्याने हल्ला केलेला अन्य कोणीही नसून सिनेअभिनेता सैफअली खान असल्याचे समजले होते. या हल्ल्यानंतर त्याचा संपूर्ण पोलीस दल शोध घेत आहेत. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. शरीफुलने शेवटचे कॉल पांडेला केल्यानंतर त्याचा ठावठिकाणा पोलिसांना समजला होता. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल गायकवाड, पोलीस शिपाई कैलास सावकारे, आश्‍विन कोळेकर व अन्य पोलीस शिपाई तिथे उपस्थित होते. या ठिकाणी वांद्रे पोलिसांचे एक पथक येणार आहे, त्यामुळे त्यांना तेथून निघून जाण्यास सांगण्यात आले. तरीही या पोलीस पथकाने त्याचा शोध घेतला आणि शरीफुलला शिताफीने अटक केली. अटकेच्या भीतीने शरीफुल हा तिथे लपून बसला होता. त्यामुळे तो बांगलादेशला पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याच रात्री तो बांगलादेशला जाण्यासाठी निघणार होता. त्यासाठी त्याने त्याचा मोबाईलही बंद ठेवला होता. दोन दिवस त्याने काहीच खाल्ले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी पकडल्यानंतर त्याने त्यांच्याकडे जेवणाची मागणी केली होती. बांगलादेशातून भारतात प्रवेश करताना जंगलात प्रवास करावा लागतो. यावेळी तिथे जेवणाची सोय नसल्याने अनेक बांगलादेशी नागरिक दोन-तीन दिवस उपाशी प्रवास करुन भारतात येतात. त्याचाच शरीफुलला फायदा झाल्याचे बोलले जाते.
हल्ल्याच्या वेळेस सर्कल स्पर्धेचा फायदा झाला
बांगलादेशात एक सर्कल स्पर्धेचे आयोजन केले जाते. या सर्कलमध्ये चारजण उभे राहतात. त्यांना एकमेकांना पकडून सर्कलबाहेर काढायचे असते. या स्पर्घेत त्याने अनेकदा भाग घेतला होता. हल्ल्याच्या वेळेस त्याला सैफअलीने मागून पकडले, तेव्हा त्याने स्वतची सुटका करण्यासाठी सैफअलीला धक्का देण्याचा प्रयत्न केला, मात्र या प्रयत्नात त्याला यश न आल्याने त्याने सैफअलीवर चाकूने हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. सैफअलीच्या घरात प्रवेश करताना शरीफुल हा इमारतीच्या पाईपवरुन चढून गेला होता. सैफअलीच्या घरातून मोठा डल्ला मारुन त्याला कायमचे बांगलादेशात जायचे होते, मात्र त्याचा प्रयत्न फसला. त्यामुळे तो काही मजले जिन्यावरुन उतरुन तो पुन्हा पाईपावरुन खाली उतरला आणि पळून गेल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page