प्रेससाठी दिलेल्या साडेदहा लाखांच्या कपड्याचा अपहार
चार महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या लाँड्रीचालकास अटक
अरुण सावरटकर
29 मार्च 2026
मुंबई, – प्रेससाठी दिलेल्या सुमारे साडेदहा लाखांच्या लेडीज पॅण्ट, शर्टसह इतर विविध 1019 कपड्याचा अपहार करुन पळून गेलेल्या लॉड्रीचालकास मिरारोड येथून सांताक्रुज पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. प्रेमसागर श्रीराम कनोजिया असे आरोपीचे नाव असून त्याच्या मालकीची सांताक्रुज येथील गजझरबांध परिसरात लाँड्री आहे. गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता, अखेर चार महिन्यानंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत तो सघ्या पोलीस कोठडीत असून त्याच्याकडून अपहार केलेले सर्व कपडे लवकरच ताब्यात घेतले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हरेश नाथा चौधरी हे कापड व्यापारी असून त्यांच्या कुटुंबियांसोबत सांताक्रुज येथे राहतात. त्यांचा रेती कंपाऊंड, एस. व्ही रोडवर लेडीज पॅण्ट बनविण्याचा कारखाना आहे. अक्षय राजेंद्र रावल हा त्यांचा मित्र असून तोदेखील याच व्यवसायात आहे. त्याचा शर्ट बनविण्याचा कारखाना आहे. अनेकदा ते दोघेही कारखान्यातील तयार कपडे प्रेससाठी प्रेमसागर कनोजिया याच्याकडे देत होते. नोव्हेबर 2025 रोजी हरेश चौधरी यांनी कारखान्यात बनविलेले 10 लाख 48 हजार रुपयांचे विविध 1019 पॅण्ट, शर्टसह इतर कपडे प्रेस करण्यासाठी प्रेमसागरच्या सांताक्रुजच्या गझजरबांधच्या लॉण्ड्रीमध्ये पाठविले होते.
15 नोव्हेंबरपर्यंत सर्व कपडे प्रेस करुन पाठविण्याचे त्याने त्यांना आश्वासन दिले होते. मात्र त्याने त्यांना प्रेस केलेले कपडे त्यांच्या कारखान्यात पाठविले नाही. त्यामुळे हरेश हे स्वत त्याच्याकडे गेले होते. तिथे त्यांना दुकानात कोणीही दिसले नाही. तसेच त्यांचे कपडे दुकानात नव्हते. याबाबत त्यांनी रुममालक सोनू पंजाबीकडे प्रेमसागरबाबत विचारणा केली होती. यावेळी त्यांनी प्रेमसागर हा दुकान बंद करुन, त्यांचे भाडे न देता पळून गेल्याचे सांगितले. या प्रकाराने त्यांना धक्काच बसला होता. परिसरात त्यांनी प्रेमसागरचा सर्वत्र शोध घेतला, मात्र तो सापडला नाही.
याच दरम्यान हरेश यांना त्यांच्याप्रमाणे प्रेमसागरने अक्षय रावल यांच्याकडून प्रेससाठी घेतलेले 645 शर्ट घेऊन पलायन केल्याचे समजले. प्रेससाठी दिलेले साडेदहा लाखांचे कपडे घेऊन पळून गेल्याचे लक्षात येताच हरेश चौधरी यांनी घडलेला प्रकार सांताक्रुज पोलिसांना सांगून तिथे त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर प्रेमसागर कनोजिया याच्याविरुद्ध पोलिसांनी साडेदहा लाखांच्या प्रेससाठी दिलेल्या कपड्याचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.
गेल्या चार महिन्यापासून तो पोलिसांना सतत गुंगारा देत होता. अखेर दोन दिवसांपूर्वी त्याला मिरारोड येथून सांताक्रुज पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. चौकशीत त्याने या गुन्ह्यांची कबुली दिली. कारखान्यात बनविलेले कपडे प्रेससाठी आल्यानंतर तो कपड्यामध्ये फेरफार करुन त्याची परस्पर बाजारात विक्री करत होता. त्याच्याकडून गुन्ह्यांतील सर्व कपडे लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान अटकेनंतर प्रेसागरला वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.