शेअर गुंतवणुकीच्या आमिषाने वयोवृद्ध विमा एजंट फसवणुक
सायबर ठगांना मदत करणार्या दोन सहकार्यांना अटक
अरुण सावरटकर
9 फेब्रुवारी 2026
मुंबई, – शेअरमार्केटमध्ये गुंतवणुकीस प्रवृत्त करुन अंधेरीतील एका वयोवृद्ध विमा एजंटची 1 कोटी 89 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी दोन आरोपींना पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. चैतन्य पडाळकर आणि दस्तगीर कासी अशी या दोघांची नावे असून ते दोघेही या कटातील मुख्य आरोपी असलेल्या सायबर ठगांचे सहकारी आहेत. फसवणुकीसाठी त्यांनी त्यांच्याच सांगण्यावरुन विविध बँकेत खाती उघडले होते. या खात्यात तक्रारदारासह इतर फसवणुकीच्या गुन्ह्यांतील मोठी रक्कम ट्रान्स्फर झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अमीतलाल आसधीर सावला हे 62 वर्षांचे वयोवृद्ध तक्रारदार अंधेरी परिसरात राहत असून ते विमा एजंट म्हणून काम करतात. ऑक्टोंबर 2025 रोजी ते त्यांच्या घरी होते. यावेळी त्यांचा क्रमांक एका खाजगी कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये अॅड करण्यात आला होता. या ग्रुपमध्ये शेअर मार्केट गुंतवणुकीबाबत माहिती दिली जात होती. त्यामुळे ग्रुपमधील मॅसेज नियमित पाहत होते. यावेळी त्यांना ग्रुपमधील अनेक सभासदांनी कंपनीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेअरमध्ये गुंतवणुक केल्याचे तसेच या गुंतवणुकीतून त्यांना चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले. याच दरम्यान त्यांना मिना भट्ट या महिलेने शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना त्यांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते.
शेअर गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत असल्याने त्यांनीही शेअरमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मिना भट्टसह अॅडमिनने त्यांचे एक आयडी पासवर्ड बनविले होते. नोव्हेंबर ते डिसेंबर 2025 या कालावधीत त्यांनी विविध शेअरमध्ये 1 कोटी 89 लाख 53 हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना प्रचंड फायदा झाला होता. याच दरम्यान त्यांना पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या खात्यातून दोन लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अॅपवर वारंवार विनंती करुनही त्यांची विनंती मान्य करण्यात आली होती.
मिना भट्टने विविध कारण सांगून त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात केली होती. त्यांचे क्रेडिट स्कोर कमी आहे, त्यामुळे त्यांना पैसे काढता येणार नाही. त्यासाठी त्यांना आणखीन शेअर खरेदी करावे लागतील असे सांगितले. मात्र त्यांच्याकडे पैसे नसल्याने त्यांनी आणखीन शेअर खरेदी करण्यास नकार दिा होता. यावेळी तिने त्यांना पैसे भरले नाहीतर त्यांना त्यांची रक्कम मिळणार नाही असे सांगून त्यांना ब्लॉक केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संंबंधित खाजगी कंपनीच्या ग्रुप अॅडमिनसह इतर सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संबंधित बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. या माहितीनंतर पोलिसांनी चैतन्य पडाळकर आणि दस्तगीर कासी या दोघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. तपासात ते दोघेही या गुन्ह्यांतील मुख्य सायबर ठगांच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले होते. त्यांच्याच सांगण्यावरुन त्यांनी फसवणुकीसाठी विविध बँकेत खाती उघडले होते, याच बँक खात्यात तक्रारदारांची रक्कम जमा झाली होती.
त्यांच्या बँक खात्यात इतर फसवणुकीच्या गुन्ह्यांतील रक्कम ट्रान्स्फर झाले होते. ही सर्व रक्कम नंतर त्यांनी सायबर ठगांना वेगवेगळ्या बँकेत ट्रान्स्फर केले होते. त्यासाठी या दोघांनाही ठराविक रक्कमेचे कमिशन मिळाले होते. तपासात ही बाब उघडकीस येताच त्यांच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलीस कोठडीनतर या दोघांना कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.