शेअर गुंतवणुकीच्या बहाण्याने वयोवृद्ध महिलेची फसवणुक

२.८५ कोटीच्या फसवणुकीप्रकरणी तिघांना अटक व कोठडी

0

अरुण सावरटकर
१३ डिसेंबर २०२४
मुंबई – शेअर गुंतवणुकीवर चांगला परतावा देतो असे सांगून एका वयोवृद्ध महिलेला शेअरमध्ये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन तिची २ कोटी ८५ लाख रुपयांची फसवणुक करणार्‍या एका त्रिकुटाला उत्तर प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. .शेषनाथ ऊर्फ गणेश शत्रुघ्न पांडे, सतीश अशोक पुनमिया आणि राहुल रामकुमार बच्चन अशी या तिघांची नावे असून ते तिघेही मिरारोडचे रहिवाशी आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी सहा मोबाईल जप्त केले असून याच मोबाईलचा गुन्ह्यांसाठी वापर झाला होता. या तिघांनी सायबर ठगांसाठी विविध बँकेत खाती उघडून दिल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

६२ वर्षांची तक्रारदार महिला सेवानिवृत्त असून ती उत्तर मुंबईत तिच्या कुटुंबियांसोबत राहते. फेब्रुवारी महिन्यांत तिचा मोबाईल क्रमांक फिडेलिटी नावाच्या एका खाजगी कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड करण्यात आला होता. ही कंपनीत शेअरमध्ये गुंतवणुक करत असून कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये अनेक सभासद होते. त्यापैकी काही सभासदांनी त्यांच्या कंपनीमार्फत शेअरमध्ये लाखो रुपयांची गुंतवणुक केल्याचे तसेच या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा मिळत असल्याचे दिसून आले. काही दिवस शेअरसंदर्भातील अंदाज घेतल्यानंतर ग्रुप ऍडमिनने तिला संपर्क साधून शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता. या गुंतवणुकीवर तिला हमखास चांगला परवाता मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. कंपनीने आतापर्यंत अनेक सभासदांना शेअरमध्ये चांगला परतावा मिळवून दिला आहे, त्यामुळे कंपनीवर विश्‍वास ठेवून तिने बिनधास्त गुंतवणुक करावी असे सांगितले. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून तिने ६ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२४ या कालावधीत विविध शेअरसाठी तिने २ कोटी ८५ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणुक केली होती.

काही महिन्यांत तिच्या गुंतवणुकीवर तिला चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तिला कंपनीवर विश्‍वास निर्माण झाला होता. मात्र ही रक्कम तिच्या बॅक खात्यात ट्रान्स्फर करण्यास ते टाळाटाळ करत होते. काही दिवसांनी त्यांनी तिला प्रतिसाद देणे बंद केले होते. याबाबत तिने तिच्या मुलीशी सविस्तर चर्चा केल्यानंतर तिच्या मुलीने तिची अज्ञात सायबर ठगाकडून फसवणुक झाल्याचे सांगितले. तसेच तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने उत्तर प्रादेशिक विभागाच्याा सायबर सेलसह सायबर हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२० (बी) भारतीय दंड सहिता सहकलम ६६ (सी), ६६ (डी) आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच सायबर सेल पोलिसांनी तपास सुरु केला होता. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या सर्व बँक खात्याची माहिती काढून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला होता.

तपासात संबंधित बँक खाती शेषनाथ पांडे, सतीश पुनमिया आणि राहुल बच्चन यांचे असल्याचे उघडकीस आले. ते तिघेही मुंबई सेंट्रल परिसरात येणार असल्याची माहिती प्राप्त होताच या पथकाने तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले होते. चौकशीत या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर या तिघांनाही अटक करुन शुक्रवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंतच्या तपासात फसवणुकीची रक्कम शेषनाथने उघडलेल्या बँक खात्यात जमा झाले असून ही रक्कम त्याने इतर बँक खात्यात ट्रान्स्फर केली होती. फसवणुक करणार्‍या सायबर ठगांना तिन्ही आरोपी विविध बँकेत खाती उघडून देण्यास मदत करत होते. याकामी त्यांना इतर काही सहकार्‍यांनी मदत केली होती. त्यांच्या चौकशीतून इतर आरोपींची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page