शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने 7.71 कोटीच्या फसवणुकीप्रकरणी दोघांना अटक

सुरतचे रहिवाशी असलेल्या आरोपींनी बँक खाती पुरविल्याचे तपासात उघड

0

अरुण सावरटकर
3 एप्रिल 2026
मुंबई, – चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने एका वयोवृद्ध व्यावसायिकाची 7 कोटी 71 लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी दोन आरोपींना उत्तर प्रादेशिक सायबर सेल पोलिसांनी अटक केली. निलेश दिनेशभाई परमार आणि अफसर अख्तर खान अशी या दोघांची नावे असून ते दोघेही सुरतचे रहिवाशी आहेत. या दोघांनी फसवणुकीसाठी सायबर ठगांना बँक खाती पुरविले होते, याच बँक खात्यात लाखो रुपये ट्रान्स्फर झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सुरुवातीला गुंतवणुकीवर काही रक्कम देऊन या टोळीने व्यावसायिकाला विविध शेअरमध्ये 7.71 कोटी रुपये गुंतवणुक करण्यास प्रवृत्त करुन त्यांची फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

परेश नरेंद्र कोठारी हे 63 वर्षांचे तक्रारदार व्यावसायिक असून ते मालाड परिसरात राहतात. त्यांचा पेंट्स आणि कोटींग मॅन्यूफॅक्चरिंगचा व्यवसाय आहे. 12 नोव्हेंबर 2026 रोजी त्यांना एक शेअर ट्रेडिंगबाबत मॅसेज आला होता. या मॅसेजनंतर नयना नाव सांगणार्‍या एका तरुणीने त्यांना कॉल करुन ती फायर सिक्युरिटीज लिमिटेड कंपनीची प्रतिनिधी असल्याचे सांगितले होते. ही कंपनी शेअर ट्रेडिंगचे काम करत असून त्यांच्या कंपनीच्या प्लॅटफॉर्मसोबत काम केले तर त्यांना शेअरमध्ये चांगला फायदा होईल असे सांगितले. त्यानंतर तिने तिच्या व्हॉटअपवर त्यांना एक लिंक पाठविली होती.

ही लिंक ओपन केल्यानंतर तिने त्यांना त्यांची वैयक्तिक माहितीसह बँक खात्याची डिटेल्स भरण्यास सांगितले होते. त्यानंतर तिने त्यांचे इस्टीट्यूशन ट्रेडिंग अकाऊंट ओपन केले होते. काही दिवस नयनासह गोपाल नावाच्या दोघांनी त्यांना शेअर ट्रेडिंगबाबत काही महत्त्वाचे टिप्स दिले. त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या शेअरची माहिती सांगून कुठल्या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास त्यात त्यांना फायदा होईल याची माहिती दिली होती. त्यांच्या सांगण्यावरुन त्यांनी वेगवेगळ्या शेअरमध्ये काही रक्कम गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा झाला होता,

विशेष म्हणजे काही रक्कम त्यांनी त्यांच्या बँक खात्यात पाठवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांनी शेअरमध्ये आणखीन रक्कम गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत त्यांनी विविध शेअरमध्ये 7 कोटी 71 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना 38 कोटी रुपयांचा फायदा झाला होता. ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली होती. त्यामुळे त्यांनी 50 लाख रुपये काढण्याची रिक्वेस्ट नयनाला पाठविली होती,

यावेळी तिने 24 तासांत ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल असे सांगितले. मात्र ती रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झाली नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांना आधी काही टॅक्सची 50 लाखांची रक्कम भरावी लागेल असे सांगण्यात आले. मात्र त्यांनी ती रक्कम भरण्यास नकार दिला. त्यानंतर तिने त्यांना किमान 25 लाख रुपये भरल्या त्यांच्या खात्यात त्यांची संपूर्ण रक्कम ट्रान्स्फर होईल असे सांगितले. मात्र त्यांनी ती रक्कम ट्रान्स्फर केली नाही. त्यानंतर नयनासह इतरांनी त्यांच्याशी संपर्क साधणे बंद केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी 4 फेब्रुवारीला सायबर हेल्पलाईन आणि नंतर उत्तर प्रादेशिक सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला हेता. यावेळी त्यांनी नयनासह इतरासोबत झालेले व्हॉटअप चॅट, बँक खात्याची डिटेल्स आणि त्यांच्या इस्टीट्यूशन ट्रेडिंग अकाऊंटची माहिती सादर केली होती. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला होता. तपासात फसवणुकीची काही रक्कम सुरतच्या काही खातेदारांच्या बँक खात्यात जमा झाल्याचे दिसून आले होते. त्यानंतर सायबर सेलची एक टिम सुरतला गेली हेती. या पथकाने निलेश परमार आणि अफसर खान या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस येताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करुन त्यांना पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. तपासात या दोघांनी सायबर ठगांना त्यांच्या बँक खात्याची डिटेल्स पाठविली होती. याच बँक खात्यात फसवणुकीची लाखो रुपयांची रक्कम ट्रान्स्फर झाली होती. ती रक्कम नंतर त्यांनी संबंधित सायबर ठगांना दिली होती. त्यामोबदल्यात त्यांना काही रक्कम कमिशन म्हणून मिळाली होती. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page