मुंबई विद्यापिठाच्या परिक्षेत डमी विद्यार्थ्यांचा पर्दाफाश
मित्रासाठी परिक्षा देण्यासाठी आल्याचे तपासात उघडकीस
राजू परुळेकर
२७ ऑक्टोंबर २०२४
मुंबई, – मुंबई विद्यापिठाच्या वतीने सुरु असलेल्या फायनाशियल अकाऊंटिंग या विषयाचा पेपर सोडण्यासाठी कांदिवलीतील एका कॉलेजमध्ये आलेल्या डमी विद्यार्थ्यांचा पर्दाफाश करण्यात एका महिला शिक्षिकेला यश आले. याप्रकरणी रोशन अजयकुमार यादव आणि मनिष अरविंदकुमार यादव या दोन्ही विद्यार्थ्यांविरुद्ध समतानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मनिष यादव हा त्याचा मित्र रोशन यादव याच्यासाठी परिक्षा देण्यासाठी परिक्षा केंद्रावर आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
विनय विजय डुकळे हे विरार येथे राहत असून ती कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्स, निर्मला मेमोरियल फाऊंनडेशन कॉलेज ऑफ कॉमर्स ऍण्ड सायन्स या कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून काम करतात. २३ ऑक्टोंबर ते १३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत मुंबई विद्यापिठाच्या वतीने विविध कॉलेजमध्ये तृतीय वर्षांच्या परिक्षेचे आयोजन करण्त आले होते. त्यामुळे त्यांच्या कॉलेजला मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची एक सूची पाठविण्यात आली होती. परिक्षेदरम्यान ते सिनिअर सुपरवायझर तसेच परिक्षा अध्यक्ष म्हणून काम पाहणार होते. २३ ऑक्टोंबरला फायनाशियल अकाऊटिंग या विषयाचा पेपर होता. त्यामुळे ठरल्याप्रमाणे सर्व विद्यार्थी परिक्षा देण्यासाठी तिथे आले होते. दुपारी सव्वाबारा वाजता क्रस ऍन्थोनी या महिला शिक्षिकेला एका विद्यार्थ्यावर संशय आला होता. त्यामुळे तिने त्या विद्यार्थ्याचे हॉल तिकिटची पाहणी केली असता त्यात मनिष यादव असल्याचे दिसून आले. तो लथीबाई रामदर महेश्वरी नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स या कॉलेजचा विद्यार्थी होता. त्याला विश्वासात घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर त्याने त्याचे नाव रोशन अजयकुमार यादव असल्याचे सांगितले. तो नायगाव येथील जय मारुती वेल्फेअर सोसायटी, जुचंद्र व्हिलेजचा रहिवाशी आहे.
मनिष यादव हा त्याचा मित्र असून त्यानेच त्याला त्याची परिक्षा देण्यासाठी डमी विद्यार्थी म्हणून परिक्षा केंद्रावर पाठविले होते. यावेळी त्याच्याकडे मनिषविषयी विचारणा करण्यात आली असता तो बाहेर बसला असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्याला कॉल करुन तिथे बोलाविण्यात आले होते. यावेळी त्याने आपण मनिषला परिक्षा देण्यासाठी पाठविल्याची कबुली दिली. डमी विद्यार्थ्यांचा पर्दाफाश होताच ही माहिती नंतर समतानगर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर विनय डुकळे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी मनिष यादव आणि रोशन यादव या दोघांविरुद्ध भारतीय न्याय सहिता सहकलम महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विनिर्ष्टि परिक्षांमध्ये होणार्या गैरप्रकारास प्रतिबंधक कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.