अरुण सावरटकर
२२ डिसेंबर २०२४
मुंबई, – मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतून शिक्षक म्हणून निवृत्त झालेल्या वयोवृद्ध सासर्याच्या बँक खात्यावर सूनेनेच इतर दोघांच्या मदतीने सुमारे साडेदहा लाखांचा डल्ला मारल्याची घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी सूनेसह तिघांविरुद्ध समतानगर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. अर्शद पठाण, टिंकू गुप्ता आणि पुष्पा बिंद अशी या तिघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार असून या चौकशीनंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
कांदिवलीतील पोयसर परिसरात भारतभूषण बाबूनंदन केवट हे ६९ वर्षांचे वयोवृद्ध त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत ते शिक्षक म्हणून काम करत होते. २०१३ साली ते निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांतून त्यांनी पाच लाख नऊ हजार रुपयांची एक एफडी बनविली होती. त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये एटीएमसह एफडीच्या मोबाईल ऍपचे पासवर्ड लिहून तसेच एटीएम कार्ड ठेवले होते. त्यांची सून पुष्पाची सुषमा ही बहिण तर अर्शद पठाण तिचा मित्र आहे. तो त्यांच्या घरी येत असल्याने त्यांची चांगली ओळख होती. १ मार्च २०२४ रोजी ते कामानिमित्त बाहेर गेले होते. यावेळी त्यांची सून पुष्पा आणि अर्शद त्यांना ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरात भेटले होते. त्यांनी त्यांच्याकडे मोबाईलसह त्यांची डायरी मागितली होती. त्यामुळे त्यांनी त्यांना विश्वासाने मोबाईलसह डायरी दिली होती. काही वेळानंतर ते दोघेही तेथून निघून गेले.
घरी आल्यानंतर त्यांना त्यांचा बँकेचा एटीएम गहाळ झाल्याचे दिसून आले. त्यामुळे ते बँकेत गेले होते. त्यांच्या एफडीची चौकशी करताना त्यांच्या एफडीची रक्कम बँक खात्यातून काढून घेण्यात आल्याचे बँकेच्या कर्मचार्यांकडून समजले. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या एफडीसह बँक खात्यातून १० लाख ५९ हजार रुपये काढण्यात आल्याचे दिसून आले. या प्रकाराने त्यांना धक्काच बसला होात. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यासह समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता.
तपासात ही रक्कम टिकू गुप्ता आणि अर्शद पठाण याच्या बँक खात्यात आणि नंतर अर्शदने ही रक्कम त्यांची सून पुष्पा बिंद हिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्यांनी या तिघांविरुद्ध समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अर्शद पठाण, टिंकू गुप्ता आणि पुष्पा बिंद या तिघांविरुद्ध पोलिसांनी साडेदहा लाखांचा अपहार करुन भारतभूषण यांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या तिघांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. सूनेनेच इतर दोघांच्या मदतीने वयोवृद्ध सासर्याच्या बँक खात्यात डल्ला मारल्याने केवळ कुटुंबियांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता.