दुप्पट रक्कमेच्या आमिषाने गंडा घालणार्या चौकडीला अटक
व्यापार्याला गुंगीचा पेढा देऊन ५० लाख पळविले होते
अरुण सावरटकर
२३ डिसेंबर २०२४
मुंबई, – तंत्रमंत्राच्या सहाय्याने दुप्पट रक्कमेच्या आमिषाने गंडा घालणार्या कांदिवलीतील व्यापार्याला सुमारे ५० लाख रुपयांची कॅश पळविणार्या टोळीचा समतानगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पळून गेलेल्या चारजणांना पोलिसांनी अटक केली आहे. शिवकुमार अभिराम यादव, राजेश बसलोच विश्वकर्मा, राजू हनुमंत पाडवी आणि नवनीत गोपाळ गोराने अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गेल्याच आठवड्यात या टोळीने तक्रारदार व्यापार्याला गुंगीचे पेढा देऊन त्यांच्याकडील कॅश घेऊन पलायन केले होते. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
कैलास लालाराम चौधरी हे व्यवसायाने व्यापारी असून त्यांचा कांदिवली परिसरात किराणा मालाचे एक दुकान आहे. दोन महिन्यांपूर्वी त्यांची त्यांच्या मित्रामार्फत शिवकुमारशी ओळख झाली होती. त्याने त्यांना त्याच्या परिचित सूर्याबाबा हे सर्वांचे पैसे डबल करुन देतात. तुमचा विश्वास बसावा म्हणून सूर्याबाबाकडे घेऊन जातो आणि तिथे डेमो करुन दाखवितो असे सांगितले. त्यामुळे ते त्याच्यासोबत गोरेगाव येथील एम. जी रोडवरील एका इमारतीच्या सतराव्या मजल्यावर गेले होते. तिथे सूर्याबाबा हा त्याच्या इतर पाच ते सहा सहकार्यासोबत बसला होता. काही वेळानंतर शिवकुमार तिथे एक पुस्तक घेऊन आला होता. यावेळी सूर्याबाबाने ज्यांना पैसे डबल करुन हवे आहेत, त्यांनी पुस्तकात पैसे जमा करावे असे सांगितले. त्यामुळे कैलास चौधरी यांनी पुस्तकात शंभर रुपयांची एक नोट ठेवली होती. ही नोट ठेवल्यानंतर त्याने त्यावर एक कपडा ठेवला. काही वेळानंतर पुस्तकातून शंभर रुपयांच्या दोन नोटा निघाल्या. या प्रकाराने त्यांना धक्काच बसला होता. त्यानंतर ते तेथून निघून गेले.
दुप्पट रक्कमेच्या आमिषाला बळी पडून त्यांनी जास्त रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याकडे त्यांच्या व्यवसायाचे तीस लाख रुपये होते, मित्र, नातेवाईकाकडून त्यांनी वीस लाखांची व्यवस्था केली. त्यानंतर ५० लाख रुपये दुप्पट करण्यासाठी पुन्हा तिथे गेले होते. यावेळी त्याने त्यांना दुसर्या रुमची व्यवस्था करण्यास सांगून तिथे तंत्रमंत्राच्या सहाय्याने ५० लाख रुपये दुप्पट करुन देतो असे सांगितले. ठरल्याप्रमाणे बुधवारी १८ डिसेंबरला ते ५० लाख रुपये घेऊन शिवकुमारच्या कांदिवलीतील दामूनगर येथील नातेवाईकाच्या रुममध्ये आले होते. तिथे सूर्याबाबाने सर्वांना मोबाईल बंद करण्यास सांगून पूजा सुरु केली होती. पूजा संपल्यानंतर त्यांनी त्यांना प्रसाद खाण्यासाठी दिला. प्रसाद खाल्यानंतर त्यांना चक्कर आली आणि ते बेशुद्ध झाले. दुसर्या दिवशी म्हणजे गुरुवारी १९ डिसेंबरला सकाळी दहा वाजता त्यांना जाग आली. यावेळी त्यांना ते सेव्हन स्टार हॉस्पिटलमध्ये असल्याचे समजले. तिथे त्यांचे नातेवाईक हजर होते. यावेळी त्यांनी त्यांच्या भावाला ही माहिती सांगितली.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला होता. हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज मिळताच ते समतानगर पोलीस ठाण्यात आले आणि तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत समतानगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना शिवकुमार यादव, राजेश विश्वकर्मा, राजू पाडवी आणि नवनीत गोराने या चौघांनाही वेगवेगळ्या परिसरातून पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते चौघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.