फसवणुकीसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपीस अटक

ऑनलाईन फसवणुकीनंतर सतरा वर्षांच्या तरुणाने जीवन संपविले होते

0

अरुण सावरटकर
15 मार्च 2026
मुंबई, – जानेवारी 2025 साली जोगेश्वरी रेल्वे स्थानकात विघ्नेश निलेश चौगुले या सतरा वर्षांचया मुलाच्या अपघाती मृत्यूचा तपास करताना या मुलाने ऑनलाईन फसवणुकीमुळे मानसिक नैराश्यातून लोकलखाली उडी घेऊन स्वतचे जीवन संपविल्याचे उघडकीस आले होते. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अकरा महिन्यानंतर अंधेरी रेल्वे पोलिसांनी फसवणुकीसह आयटी तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांतील एका वॉण्टेड आरोपीस मध्यप्रदेशातून रेल्वे पोलिसांनी अटक केली. बिनोद राजवंशी असे या 33 वर्षीय आरोपीचे नाव असून तो मूळचा राजस्थानचा रहिवाशी आहे. तो व्यसनी असून पैशांसाठी त्याने हा गुन्हा केला होता. त्याच्याविरुद्ध इतर काही गुन्ह्यांची नोंद असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लोंढे यांनी सांगितले.

निलेश गजानन चौगुले हे जोगेश्वरीतील मेघवाडी, जुम्मनखान चाळीत त्यांच्या पत्नी आणि मुलांसोबत राहत असून ते चालक म्हणून काम करतात. विघ्नेश हा त्यांचा सतरा वर्षांचा मुलगा असून तो श्री मुंबादेवी ज्युनिअर कॉलेज कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स या कॉलेजमध्ये बारावीचे शिक्षण घेत होता. तसेच जोगेश्वरीतील सर्वोदयनगर परिसरात असलेल्या दिपक क्लासेसमध्ये एक्स्ट्रा क्लासाठी जात होता. दहावी पास झाल्यानंतर त्यांनी विघ्नेशला एक मोबाईल दिला होता. या मोबाईलमध्ये त्याने वेगवेगळे सोशल मिडीया अकाऊंट उघडले होते. 21 जानेवारी 2025 रोजी तो नेहमीप्रमाणे क्लासला जातो असे सांगून घरातून निघून गेला. मात्र रात्री दहापर्यंत घरी आला नाही. त्यामुळे चौगुले कुटुंबियांनी त्याचा शोध सुरु केला होता.

ही शोधमोहीम सुरु असताना जोगेश्वरी रेल्वे स्थानकात एका मुलाचा लोकल अपघात झाल्याची माहिती निलेश चौगुले यांना मिळाली होती. या माहितीनंतर ते त्यांच्या मित्रांसोबत कूपर हॉस्पिटलमध्ये गेले होते. तिथे मृतदेहाची पाहणी केल्यानंतर त्यांना मृत मुलगा त्यांचा विघ्नेश असल्याचे दिसून आले. याप्रकरणी त्यांची अंधेरी रेल्वे पोलिसांनी जबानी नोंदविली होती. या जबानीनंतर पोलिसांनी एडीआरची नोंद केली होती. अपघातात त्याचा मोबाईल फुटला होता. तो दुरुस्त करुन नंतर रेल्वे पोलिसांना देण्यात आला होता. तपासात विघ्नेशची व्हॉटअप आणि टेलिग्राम या सोशल मिडीया अ‍ॅपमधून फसवणुक झाल्याचे उघडकीस आले होते.

ऑनलाईन रेटींग टास्कचे पार्टटाईम जॉबची ऑफर देऊन त्याच्याकडून वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यात आले होते. त्यात त्याला सुरुवातीला काही कमिशन देण्यात आले होते. नंतर त्याच्याकडून प्रत्येक टास्कसाठी पैसे घेण्यात आले. या टास्कसाठी त्याने 49 हजाराची गुंतवणुक करुन संबंधित सर्व टास्क पूर्ण केले होते. मात्र टास्क पूर्ण करुनही त्यांनी त्याला पैसे परत केले नव्हते. ऑनलाईन टास्कच्या नावाने अज्ञात सायबर ठगांनी त्याची फसवणुक केली होती. त्यातून त्याला प्रचंड मानसिक नैराश्य आले होते. याच नैराश्यातून त्याने जोगेश्वरी रेल्वे स्थानकात लोकलखाली आत्महत्या केली होती. त्याची टेलिग्राम अकाऊंट युझर नेहा अग्रवाल ऊर्फ शर्मा, डॉरिस सेठ, किरण राव पंडित यांच्यासह इतर पाचजणांची फसवणुक केली होती.

ही माहिती नंतर निलेश चौगुले यांना देण्यात आली होती. या माहितीने त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यामुळे त्यांनी संबंधित आठही आरोपीविरुद्ध अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अकरा महिन्यानंतर विघ्नेशची आर्थिक फसवणुक करुन त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अंधेरी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्याची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लोंढे यांना तपासाचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर वरिष्ठ पोली निरीक्षक नितीन लोंढे यांनी एका विशेष पथकाची नियुक्ती केली होती. ज्या बँक खात्यात विघ्नेशच्या खात्यातून पैसे ट्रान्स्फर झाले होते. त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढण्यास रेल्वे पोलिसांनी सुरुवात केली होती. त्यात बिनोद राजवंशी याचे नाव समोर आले होते. तो राजस्थानचा रहिवाशी असल्याने त्याच्या अटकेसाठी एक टिम राजस्थानला पाठविण्यात आली होती. यावेळी या पथकाला बिनोदला कारचोरीच्या एका गुन्ह्यांत मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केली असून तो याच गुन्ह्यांत तेथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत असल्याचे समजले होते. त्यानंतर या पथकाने मध्यप्रदेशातून बिनोदचा ताबा घेतला होता.

ट्रॉन्झिंट रिमांड घेतल्यानंतर त्याचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्याच्यावर अटकेची कारवाई करुन त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला मंगळवार 17 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लोंढे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page