चौदा वर्षांच्या मुलाला राजस्थानात नोकरी देणे महागात पडले

वडिलांच्या मारहाणीनंतर मुलगा घरातून निघून गेला होता

0

अरुण सावरटकर
7 मार्च 2026
मुंबई, – घरातून पळून गेलेल्या एका चौदा वर्षांच्या अल्पवयीन मुलाला राजस्थानात नोकरीसाठी घेऊन जाणे तिघांना चांगले महागात पडले. बळीत मुलगा अल्पवयीन असल्याचे, घरातून पळून आल्याची माहिती असतानाही त्यांनी त्याला स्थानिक पोलिसांसह त्याच्या पालकांच्या स्वाधीन न करता राजस्थानात नोकरीसाठी नेले. एका मंदिरात महाप्रसाद वाटण्याच्या कामावर ठेवले. तीन महिन्यानंतर हा प्रकार उघडकीस येताच तिन्ही आरोपीना अपरहणाच्या गुन्ह्यांत दिडोंशी पोलिसांनी अटक केली आहे. कासिम मुर्शरफअली खान, महेंद्र विष्णू कश्यप आणि संजय राधेश्याम सचेती अशी या तिघांची नावे असून ते तिघेही लेबर कॉन्ट्रक्टर म्हणून काम करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर या तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.

38 वर्षांचे तक्रारदार त्यांची वयोवृद्ध आई, पत्नी आणि दोन मुलांसोबत गोरेगाव येथील फिल्मसिटी रोड परिसरात राहतात. ते चालक म्हणून काम करत असून त्यांचा मोठा मुलगा जावेद (नावात बदल) हा याच परिसरातील एका खाजगी शाळेत नववीत शिकतो. जावेद शाळेत सकाळी सात वाजता जातो आणि दुपारी एक वाजता घरी येतो. त्यानंतर तो सायंकाळी चार वाजता ट्यूशनला जातो आणि सायंकाळी सहा वाजता घरी येतो. 6 डिसेंबरला सकाळी जावेद हा घरी मोबाईलवर गेम खेळत होता. त्यानंतर तो कोणाशी तरी चॅट करत होता. त्यामुळे त्यांनी मोबाईलची पाहणी केल्यानंतर जावेद हा त्यांच्या मित्रांसोबत इंटाग्रामवर चॅट करताना दिसून आला. त्यात ते एकमेकांना शिवीगाळ करत होते.

हा प्रकार पाहिल्यानंतर त्यांना प्रचंड राग आला आणि त्यांनी त्याला चॅटींग करताना शिवीगाळ करत असल्याने हाताने मारहाण केली होती. रागाच्या भरात जावेदने तुमच्या लोकांचा कंटाळा आला आहे, आता ती घर सोडून जातो असे बोलून घराबाहेर पडला. बराच वेळ होऊन तो घरी आला नाही. त्यामुळे त्यांनी त्याचा शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे तक्रारदार प्रचंड घाबरले आणि त्यांनी दिडोंशी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून मुलाची मिसिंग तक्रार केली होती. जावेद हा अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते.

या फुटेजवरुन जावेद हा गोरेगाव येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात आणि नंतर बाहेरगावी जाणार्‍या एक्सप्रेसमधून निघून गेल्याचे दिसून आले. हाच धागा पकडून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना जावेदला राजस्थानच्या एका मंदिरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीत वडिलांनी मारहाण केल्यानंतर तो घरातून निघून गेला होता. गोरेगाव रेल्वे स्थानकात आल्यानंतर तो लोकल पकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात आला होता. तिथे त्याला आरोपी भेटले होते. त्याने तो घर सोडून आला असून त्याला नोकरीची गरज आहे असे सांगितले. त्यामुळे आरोपी त्याला घेऊन राजस्थानात गेले होते. तिथे असलेल्या एका प्रसिद्ध मंदिरात त्यांनी त्याला नोकरी दिली होती. या मंदिरात तो महाप्रसाद देण्याचे काम करत होता.

दिवसा काम करुन तो तिथेच झोपत होता. मंदिरात त्याची राहण्याची, खाण्या-पिण्याची सोय करण्यात आली होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर पोलिसांनी त्याला राजस्थानात आणणार्‍या कासिम खान, महेंद्र कश्यप आणि संजय सचेती या तिघांना ताब्यात घेतले. अपहरणाच्या गुन्ह्यांत नंतर या तिघांनाही पोलिसांनी अटक केली. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी दुजोरा दिला आहे. या तिघांनी जावेद हा अल्पवयीन असल्याचे माहिती असताना त्याला रेल्वे पोलीस किंवा त्याच्या पालकांकडे सोपविले नाही.

त्याला घेऊन ते राजस्थानात गेले. तिथे त्याला नोकरी दिली, त्याची राहण्याची तसेच खाण्या-पिण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे या तिघांवर चौदा वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याच्या गुन्ह्यांत अटकेची कारवाई करण्यात आली होती. याच गुन्ह्यांत तिघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या तावडीतून पोलिसांनी जावेदची सुटका केली असून त्याला त्याच्या पालकांकडे सोपविण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शिंदे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page