जापनिस बनावटीच्या गौतम बुद्धाची प्राचीन मूर्तीच्या चोरीचा पर्दाफाश
चोरी करणार्या आरोपीसह मूर्ती विकत घेणार्या आरोपींना अटक
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
16 नोव्हेंबर 2025
मुंंबई, – जापनिस बनावटीच्या भगवान गौतम बुद्धाच्या प्राचीन मूर्तीची चोरीचा विक्रोळी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत मूर्ती चोरी करणार्या आरोपीसह चोरीची मूर्ती विकत घेणार्या भंगार विक्रेत्याला विक्रोळी पोलिसांनी अवघ्या 24 तासांत अटक केली. जितेंद्र ऊर्फ जितू लखनराम बिनकर आणि मार्टिंन कमल कन्नन ऊर्फ मुरगन अशी या दोघांची नावे असून यातील जितूने मूर्तीची चोरी केली तर मार्टिंनने चोरीची मूर्ती विकत घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. य दोघांकडून पोलिसांनी 12 किलो वजनाची भगवान गौतम बुद्धाची मूर्तीसह बुद्ध विहारातील पाण्याच्या कुलरचे चार नळ आदी मुद्देमाल जप्त केला आहे.
विक्रोळीतील कन्नमवार नगर दोनमध्ये रत्नबोधी बुद्ध विहार आहे. गुरुवारी 13 नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजता एका अज्ञात व्यक्तीने बुद्ध विहारातील पंचधातूची भगवान गौतम बुद्धाची जापनिस बनावटीची प्राचीन मूर्ती आणि पिण्याचे पाण्याचे नळ चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार नंतर उघडकीस येताच विक्रोळी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला होता.
या घटनेनंतर अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील, पोलीस उपायुक्त राकेश ओला, सहाय्यक पोलीस आयुक्त प्राची कर्णे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी, पोलीस निरीक्षक संदेश मोरे, सुनिल क्षीरसागर यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक पंकज पाटील, योगेश चिंचोळे, पोलीस हवालदार चव्हाण, सोनजे, आवहाड, पोलीस शिपाई कोळेकर, शिरसाठ, रणखांबे, उंडरे,, सावकारे यांनी तपास सुरु केला होता. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजवरुन एक संशयित आरोपी विक्रोळी रेल्वे स्थानकातून दादर रेल्वे स्थानकात उतरल्याचे दिसून आले. त्यानंतर या पथकाने दादर आणि माहीम परिसरात त्याचा शोध घेऊन जितेंद्र ऊर्फ जितूला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच ही चोरी केल्याची कबुली दिली. चोरीची मूर्तीसह नळ त्याने मार्टिंग कन्नन या भंगार दुकानात विक्री केली होती. त्यानंतर पोलिसांनी मार्टिनला ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून चोरीची मूर्तीसह नळ आदी मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तपासात जितू हा वांद्रे येथे कचरा वेचण्याचे काम करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना विक्रोळीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.