व्यवसायासाठी घेतलेले चार कोटी रुपये शेअरमार्केटमध्ये गुंतविले
फसवणुकीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड व्यावसायिकाला एक वर्षांनी अटक
अरुण सावरटकर
1 मे 2025
मुंबई, – व्यवसाय वाढीसाठी घेतलेले सुमारे चार कोटी रुपये शेअरमार्केटमध्ये गुंतवून एका 59 वर्षांच्या डॉक्टरची फसवणुक केल्याप्रकरणी सुनिल पारसमल लोढा या वॉण्टेड व्यावसायिकाला बोरिवली पोलिसांनी एक वर्षांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. शेअरमार्केटमध्ये सुनिलला प्रचंड नुकसान होऊन तो कर्जबाजारी झाला होता. कर्ज फेडता येत नसल्याने तो गेल्या एक वर्षांपासून फरार होता असे तपासात उघडकीस आले आहे.
अरुणकुमार सोहनलाल गुप्ता हे डॉक्टर असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत परळ परिसरात राहतात. त्यांचे बोरिवली आणि दादर येथे खाजगी क्लिनिक असून या दोन्ही क्लिनिकमध्ये ते आठवड्यातून दोन ते तीन दिवस काम करतात. सहा वर्षांपूर्वी त्यांच्या बोरिवलीतील क्लिनिकमध्ये सुनिल हा त्याच्या शारीरिक कमजोरी आणि आरोग्यविषयक समस्या जाणून घेण्यासाठी आला होता. त्यानंतर तो नियमित त्यांच्याकडे उपचारासाठी येत होता. त्यातून त्यांची मैत्री झाली होती. त्याने त्याचा भाऊ ज्वेलर्स व्यापारी असून त्याच्या मालकीचे मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये कांचन ज्वेलर्स नावाचे एक शॉप असल्याचे सांगतले होते. जून 2020 रोजी तो त्यांच्या क्लिनिकमध्ये आला होता. यावेळी सुनिलने त्यांना त्याने शुभम सॅनटरी अॅण्ड हार्डवेअर नावाचे एक शॉप मालाड येथे सुरु केल्याचे सांगितले. या शॉपमध्ये प्लाय लॅमिनेट वूड, फेव्हिकॉल, पाईन वूड, लबाचा मटेरियलची विक्री केली जात असून त्यात त्याला चांगला फायदा होत आहे. त्यामुळे त्याला त्याला त्याच्या व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करायचे आहे. त्यासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. त्यांनी त्याला व्यवसाय वाढीसाठी आर्थिक मदत करावी. या व्यवसाायातून होणारा प्रॉफिट त्यांना देण्याचे आश्वासन दिले होते.
थोड्याच दिवसांत तो त्यांचा चांगला मित्र झाला होता. त्यामुळे त्यांनी त्याच्या व्यवसायात गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. जुलै 2020 ते मार्च 2021 या कालावधीत त्यांनी त्याला 50 लाख रुपये दिले होते. या गुंतवणुकीनंतर त्यांनी त्याला 38 लाख रुपये परत केले होते. त्यामुळे सुनिलवर त्यांचा विश्वास बसला होता. त्यानंतर त्यांनी त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यातून त्याला व्यवसायासाठी 4 कोटी 1 लाख 50 हजार रुपये दिले होते. मात्र या पैशांतून त्याने हार्डवेअरशी संबंधित साहित्य खरेदी केले की नाही याबाबत वारंवार विचारणा करुनही त्याने काहीही माहिती दिली नाही. विविध कारण सांगून तो त्यांची दिशाभूल करत होता. त्याचा व्यवहार संशयास्पद वाटताच त्यांनी गुंतवणुक केलेल्या रक्कमेची मागणी सुरु केली होती. यावेळी त्याने त्यांची रक्कम व्यवसायात न गुंतविता शेअरमार्केटमध्ये गुंतविल्याचे सांगून त्यात त्याला प्रचंड नुकसान झाल्याचे सांगितले. त्यातून तो कर्जबाजारी झाला होता.
व्यवसायासाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन त्यांना कुठलीही माहिती न देता सुनिल लोढाने त्यांची रक्कम शेअरमार्केटमध्ये गुंतवणुक केली होती. त्यातून त्याला नुकसान होऊन तो कर्जबाजारी झाला होता. त्यानंतर तो त्याचा मोबाईल बंद करुन पळून गेला होता. त्याच्याविषयी त्याच्या कुटुंबियासह इतर कुठल्याही नातेवाईकांना काहीच माहिती नव्हती. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी दिडोंशी पोलिसात सुनिल लोढाची मिसिंग तक्रार केली होती. अशा प्रकारे त्यांनी गुंतवणुकीच्या नावाने फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर जानेवारी 2024 रोजी सुनिल लोढाविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
याच गुन्ह्यांत तो गेल्या एक वर्षांपासून वॉण्टेड होता. तरीही त्याचा पोलिसांनी शोध सुरु होता. ही शोधमोहीम सुरु असताना वॉण्टेड असलेल्या सुनिलला मंगळवारी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने अरुणकुमार गुप्ता यांची फसवणुक केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर त्याला अटक करुन बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्याने अशाच प्रकारे गुंतवणुकीच्या नावाने इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलीस तपास करत आहेत.