शारीरिक शोषणासह मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत अटकेची धमकी देऊन फसवणुक
4.62 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी दोघांना अटक व कोठडी
अरुण सावरटकर
4 फेब्रुवारी 2026
मुंबई, – मानसिक व शारीरिक शोषणासह मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून पवईतील आयआयटीमधून मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या एका वयोवृद्ध महिलेची 4 कोटी 62 लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी दोन आरोपींना पश्चिम प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी अटक केली. नरेंद्र एस. सिन्हा आणि गुंजन देवकुमार दिनेशचंद्र अशी या दोघांची नावे असून अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत दोघांनी सायबर ठगांना बँक खाती पुरविल्याचे, त्यांच्याच बँक खात्यात फसवणुकीची रक्कम जमा झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या कटात इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
आशा विजय शंगरपवार ही 74 वर्षांची वयोवृद्ध महिला तिच्या पतीसोबत पवई परिसरात राहते. तिची मुलगी बंगलोर येथे शिक्षण घेत असून त्या पवईतील आयआयटीमध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून निवृत्त झाल्या आहे. 11 ऑक्टोंबर 2026 रोजी तिला एक व्हिडीओ कॉल आला होता. यावेळी समोरुन बोलणार्या व्यक्तीने तो टेलिकॉम विभागातून बोलत असून तिच्याविरुद्ध मानसिक व आणि शारीरिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्यांत तिला केव्हाही अटक होऊ शकते. याच दरम्यान तिला दिल्ली पोलीस दलातील आयपीएस अधिकारी सुशीलकुमार गौतम नाव सांगणार्या व्यक्तीने कॉल केला होता. त्याने तिच्या आधारकार्डचा गैरवापर झाला असून एका खाजगी बँकेत तिच्या नावाने बँक खाते उघडण्यात आले आहे.
या खात्यात सहा कोटीचे व्यवहार झाला असून हा मनी लॉड्रिंगचा प्रकार आहे. त्यामुळे तिच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. यावेळी तिने तिचे संबंधित बँक खाते नसून या खात्याची तिचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले. यावेळी गौतमने तिला मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यांत संदीपकुमार नावाच्या एका व्यक्तीला अटक केली असून त्याच्या चौकशीतून तिचे नाव समोर आले आहे. त्यामुळे तिची चौकशी होणार असून चौकशीनंतर तिच्यावर अटकेची कारवाई होणार आहे. त्यामुळे तिने चौकशीला सहकार्य करावे नाहीतर घरी येऊन तिला अटक केली जाईल अशी धमकी दिली होती. संबंधित प्रकरण संवेदनशील असल्याने याबाबत कोणाशी चर्चा करु नये, तसे केल्यास त्यांच्या अडचणीत वाढ होईल. त्यांच्यावरही अटकेची कारवाई होईल असे सांगून तिच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही तसेच चौकशीला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्याने तिच्यासह बँक खात्याची, तिने केलेल्या गुंतवणुकीची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. तिला तिचे एफडी आणि आरडी तोडण्यास सांगून ती रक्कम त्याने दिलेल्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास प्रवृत्त केले होते. अटकेच्या भीतीने तिने संबंधित बँक खात्यात ऑक्टोंबर 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत 4 कोटी 62 लाख रुपये ट्रान्स्फर केले होते. यावेळी त्याने या संपूर्ण व्यवहाराची ऑडिटरकडून तपासणी होणार आहे. चौकशी पूर्ण होताच ती रक्कम तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली जाणार असल्याचे सांगितले. मात्र या तोतया अधिकार्याने तिला नंतर संपर्क साधला नाही किंवा तिचे पैसे तिच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केले नाही.
हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने सोशल मिडीयावर सुशीलकुमार गौतम याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता, यावेळी तिला या नावाने कोणीही अधिकारी दिल्ली सायबर सेल, गुन्हे शाखा किंवा सीबीआयमध्ये कार्यरत नसल्याचे समजले. अज्ञात सायबर ठगांनी मनी लॉड्रिंगसह मानसिक व शारीरिक शोषण केल्याच्या गुन्ह्यांत अटकेची भीती दाखवून तिची 4 कोटी 62 लाखांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच तिने पवई पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तोतयागिरी करुन फसवणुक करणे आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यांचा तपास नंतर पश्चिम सायबर सेल विभागाकडे सोपविण्यात आला होता.
या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेचे सायबर सेल पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी ज्या बँक खात्यात फसवणुकीची रक्कम ट्रान्स्फर झाली होती, त्या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. हा तपास सुरु असताना पोलिसांनी नरेंद्र सिन्हा आणि गुंजन दिनेशचंद्र या दोघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता. या दोघांनीच फसवणुकीसाठी सायबर ठगांना विविध बँकेत खाती उघडून दिले होते. त्यांच्या बँक खात्यात फसवणुकीची ही रक्कम ट्रान्स्फर झाली होती.
ही रक्कम काढून त्यांनी सायबर ठगांना दिली होती. त्यासाठी त्यांना ठराविक रक्कम कमिशन म्हणून मिळाली होती. तपासात आलेल्या या माहितीनंतर नरेंद्र सिन्हा आणि गुंजन दिनेशचंद्र या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही मंगळवारी सायंकाळी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.