विश्वासाने दिलेल्या सोन्याची चोरी करुन दोन नोकराचे पलायन
३३.५० लाखांचे सोने पळविले; दोन्ही नोकराविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२० मार्च २०२४
मुंबई, – विश्वासाने दिलेल्या सोन्याची चोरी करुन दोन नोकरांनी पलायन केल्याची घटना वरळी आणि अब्दुल रेहमान स्ट्रिट परिसरात उघडकीस आली आहे. सौरव खानरा आणि एस. के सानू अशी या दोन नोकरांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध दादर व एल. टी मार्ग पोलिसांनी दोन स्वतंत्र चोरीच्या गुन्ह्यांची नोंद करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. या दोघांनी सुमारे ३३ लाख ५० हजार रुपयांचे सोने चोरी केल्याचा आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लालबाग येथे राहणारे चिंतन सागरमल जैन हे व्यवसायाने सोन्याचे व्यापारी आहेत. त्यांच्या मालकीचे वरळी परिसरात नेमीनाथ ज्वेलर्स नावाचे एक दुकान तसेच सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. याच कारखान्यात एस. के सानू हा कारागिर म्हणून कामाला होता. तीन वर्षांपासून तो त्यांच्यासोबत काम करत असल्याने त्यांचा त्याच्यावर विश्वास होता. ५ मार्चला त्यांनी कारखान्यात साडेतेरा लाखांची २१२ ग्रॅम वजनाची एक सोन्याची लगड ठेवली होती. ही लगड कोणीतरी चोरी केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी सानूला कॉल केला, मात्र त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर तो कुठेच सापडला नाही. त्यानेच ही सोन्याची लगड चोरी करुन पलायन केल्याची खात्री होताच त्यांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
दुसरी घटना अब्दुल रेहमान स्ट्रिटवर घडली. शुभंकर पंचराम पॉजा हे परळ येथे राहत असून त्यांचा अब्दुल रेहमान स्ट्रिटवर सोन्याचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात ३५ कारागिर कामाला असून त्यात सौरव हा गेल्या दहा वर्षांपासून कामाला होता. काही दिवसांपूर्वी त्यांना चेन्नईतील एका ज्वेलर्स व्यापार्याने सोन्याचे दागिने बनविण्यासाठी २० लाख रुपयांचे ३३० ग्रॅम वजनाचे सोने दिले होते. ते सोने त्यांनी सौरवला दागिने बनविण्यासाठी दिले होते. दहा दिवसांत दागिने बनवून देतो असे सांगून तो कारखान्यातून पळून गेला होता. १५ मार्चला तो नेहमीप्रमाणे कामावर आला नाही. त्याचा मोबाईल बंद होता. त्यामुळे ते कारखान्यात गेले आणि कारखान्यातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती. त्यात त्यांना सौरव हा पहाटे साडेचार वाजता कारखान्यात आला होता. पिशवीतून वीस लाख रुपयांचे दागिने घेऊन तो जाताना दिसून आला. त्यामुळे त्याचा त्यांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेच सापडला नाही. सौरव हा दागिने घेऊन पळून गेल्याची खात्री होताच त्यांनी एल. टी मार्ग पोलिसात तक्रार केली होती. या दोन्ही तक्रार अर्जानंतर पोलिसांनी दोन्ही नोकराविरुद्ध चोरीचा गुन्ह्यांची नोंद केली आहे. पळून गेलेल्या या दोघांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.