मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
30 जुलै 2025
मुंबई, – हस्ताक्षर चांगले काढत नाही म्हणून शिक्षा म्हणून एका खाजगी ट्यूशन टिचरने तिच्याकडील आठ वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थ्याच्या हातावर मेणबत्तीचे चटके दिल्याची धक्कादायक घटना मालाड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी राजश्री राठोड या खाजगी ट्यूशन टिचरविरुद्ध कुरार पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि अल्पवयीन न्याय कायदा कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तिला अटक केली. अटकेनंतर तिची नोटीस देऊन सुटका करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान शुक्रवारी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांसह ट्यूशनमधील पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली होती.
50 वर्षांचे तक्रारदार मालाडच्या पिंपरीपाड्यात राहत असून त्यांचा अंडी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्या कुटुंबात त्याची पत्नी, 22 वर्षांची मुलगी आणि आठ वर्षांचा मुलगा असे तिघेजण आहेत. त्यांचा मुलगा गोरेगाव येथील गोकुळधाम परिसरातील एका खाजगी शाळेत तिसरीत शिकतो. याच परिसरातील एका खाजगी शिकवणीसाठी त्यांनी त्यांच्या मुलाला पाठवत होते. तिथेच राजश्री राठोड ही इतर मुलांसोबत त्याच्या मुलाची शिकवणी घेत होती. सायंकाळी सात ते रात्री नऊ असा त्याच्या ट्यूशनची वेळ आहे. त्याला ट्यूशनला सोडण्यासाठी आणि घरी आणण्यासाठी त्याची मोठी बहिण जात होती.
सोमवारी सायंकाळी सात वाजता त्यांचा मुलगा नेहमीप्रमाणे ट्यूशनला गेला होता. रात्री नऊ वाजता राजश्रीने त्यांना कॉल करुन त्यांच्या मुलाचे ट्यूशन झाले असून त्याला घरी घेऊन जाण्यासाठी कोणाला तरी पाठवा असे सांगितले. त्यानंतर त्यांची मुलगी त्याला आणण्यासाठी तिथे गेली होती. यावेळी तिला तिचा भाऊ रडत असल्याचे तसेच त्याच्या तळहाताला जखमी झाल्याचे दिसून आले. याबाबत तिने त्याला अभ्यासाचा कंटाळा येत असल्याने तो नाटक करत असल्याचे सांगितले. त्यानंतर ती त्याला घेऊन घरी आली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या मुलाला तळहाताला काय झाले याबाबत विचारणा केली होती. यावेळी त्याने राजश्री मॅमने त्याचे हस्ताक्षर चांगले नसल्याने त्याच्या हाताला मेणबत्तीने चटके देऊन त्याला शिक्षा दिल्याचे सांगितले. त्यातून त्याच्या हाताला दुखापत झाली होती.
हा प्रकार समजताच त्यांना प्रचंड राग आला होता. त्यामुळे ते मुलासोबत राजश्री राठोडच्या घरी गेले आणि त्यांनी तिला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने त्यांच्याशी वाद घालून शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर ते मुलासोबत कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार करुन ते कुरार पोलीस ठाण्यात आले. तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांनी ट्यूशन टिचर राजश्री राठोड हिच्याविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची पोलिसांनी गंभीर दखल घेत तिच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता तसेच अल्पवयीन न्याय अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच तिला पोलिसांनी अटक केली. राजश्री हिने ट्यूशनच्या इतर विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून मारहाण किंवा मेणबत्तीने चटके दिले होते का याचा आता पोलिसांकडून तपास सुरु आहे.