दोन कोटीच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहारप्रकरणी गुन्हा दाखल
क्रेडिटवर दागिने घेऊन तीन व्यापार्यांची फसवणुक केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ सप्टेंबर २०२४
मुंबई, – सुमारे दोन कोटीच्या सोन्याच्या दागिन्यांचा अपहारप्रकरणी दोन आरोपीविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पांडुरंग आबा पाटील आणि विकी सुनिल अनासने अशी या दोघांची नावे आहेत. क्रेडिटवर दागिने घेऊन या दोघांनी तीन ज्वेलर्स व्यापार्यांची फसवणुक केल्याचा आरोप आहे. पळून गेलेल्या या दोन्ही आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
राजेश संपतलाल सोनी हे ज्वेलर्स व्यापारी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत चेंबूर परिसरात राहतात. त्यांचा झव्हेरी बाजार येथील तिसरी अग्यारी, डी डी प्लाझा परिसरात मानव गोल्ड नावाचे एक शॉप आहे. पांडुरंग पाटील आणि अमरावतीचे विकी अनासने हे त्यांच्या परिचित असून त्यांचाही सोन्याचे दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांच्यात अनेकदा दागिने खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला होता. दिलेल्या मुदतीत त्यांनी दागिन्यांचे पेमेंट करुन राजेश सोनी यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. १६ जुलै ते २५ जुलै २०२४ या कालावधीत या दोघांनी राजेश सोनी यांच्याकडून १४८२ ग्रॅम वजनाचे १ कोटी १ लाख ४३ हजार ७७८ रुपयांचे, भिक्षु गोल्ड दुकानाचे मालक हिमांशू भवरलाल जेन यांच्याकडून ७८७ ग्रॅम वजनाचे ५३ लाख ६३ हजार ६९२ रुपयांचे आणि मार्क बुलियन कमोडिटीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे मालक अरविंदकुमार मोतीलाल जैन यांच्याकडून ७०० ग्रॅम वजनाचे ४७ लाख ४६ हजार १२५ रुपयांचे असे २९७० ग्रॅम वजनाचे २ कोटी २ लाख ५३ हजार ५९५ रुपयांचे विविध सोन्याचे दागिने क्रेडिटवर घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी दागिन्यांचे पेमेंट केले नाही. विचारणा करुनही त्यांाच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता.
काही दिवसांनी त्यांनी त्यांचे मोबाईल बंद केले होते. महिनाभर पेमेंटची वाट पाहून त्यांनी पेमेंट केले नव्हते. क्रेडिटवर घेतलेल्या दागिन्यांचा अपहार करुन या दोघांनी तीन ज्वेलर्स व्यापार्यांची फसवणुक केली होती. त्यामुळे राजेश सोनीसह इतर दोन्ही व्यापार्यांनी घडलेला प्रकार एल. टी मार्ग पोलिसांना सांगून तिथे पांडुरंग पाटील आणि विकी अनासने यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी ३१८ (४), ३१६ (५), ३ (५) भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपी पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या दोघांनी झव्हेरी बाजार आणि काळबादेवीतील इतर काही ज्वेलर्स व्यापार्यांची फसवणुक केल्याचे बोलले जाते.