मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ जानेवारी २०२५
मुंबई, – थर्टी फर्स्ट साजरी करताना मुंबई पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन करुनही मुंबईकरांनी या नियमांचे सर्रासपणे उल्लघंन केल्याचे दिसून आले. मद्यप्राशन करुन वाहन चालविणार्या ३३३ जणांवर कारवाई करण्यात आली तर रात्री उशिरापर्यंत ४६ हजार १४३ वाहनांची तपासणी करण्यात आली तर ५ हजार ६७० वाहनचालकावर विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षांच्या तुलनेत यंदा ड्रंक ऍण्ड ड्राईव्हचा आकडा वाढला आहे. गेल्या वर्षी २२९ जणांना ड्रंक ऍण्ड ड्राईव्ह कारवाई पकडण्यात आले तर २ हजार ८१० जणांवर विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली होती. शहरात स्थानिक पोलिसांसह वाहतूक पोलिसांनी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त आणि नाकाबंदी ठेवल्यामुळे रात्री उशिरा कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
थर्टी फर्स्ट साजरा करताना मुंबईकरांनी पोलिसांनी दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. मुंबईकरांच्या उत्साहाला कुठेही गालबोट लागू नये म्हणून मुंबई पोलिसांनी शहरात सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी विविध ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन पोलिसांचे मार्गदर्शन केले. यावेळी आठ अतिरिक्त आयुक्त, २९ पोलीस उपायुक्त, ५३ सहाय्यक पोलीस आयुक्त, २१८४ पोलीस अधिकारी, १२ हजार ०४८ पोलीस कर्मचारी बंदोबस्ताकामी तैनात करण्यात आले होते. नवीन वर्षांच्या उत्साहाच्या नादात अनेकांनी या नियमांचे सर्रासपणे उल्लघंन केल्याचे पोलिसांच्या कारवाईतून उघडकीस आले आहे. ३१ डिसेंबरला मोठ्या प्रमाणात अशा घटना घडून अपघात होत असल्याने संपूर्ण शहरात जागोजागी वाहतूक पोलिसांना तैनात करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर बार, पब, हॉटेल मालकांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या होत्या.
३१ डिसेंबरला पोलिसांनी १०७ ठिकाणी विशेष नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. ही मोहीम पहाटेपर्यंत सुरु होती. त्याचबरोबर मद्यप्राशन करुन वाहन चालविणार्या ३३३ मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई केली. तपासणीदरम्यान २ हजार ८९३ जणांवर वाहतूकीच्या मूळ प्रवाहात अडथळा आणणे, १ हजार ९२३ विना हेल्मेट वाहन चालविणे, १ हजार ९७६ प्लाय करण्यास नकार देणे, १ हजार ७३१ जंपिंग सिग्नल, ८६८ वनवेमध्ये प्रवेश करणे, ५८१ एमडीएल कारवाई, ८ स्टॉप लाईनच्या आधी न थांबणे, ४३२ सीटबेल्ट न लावणे, २०० विनागणवेश, १२३ ट्रिपल सीट, १०९ वाहन चालकविताना मोबाईल वापरणे, ४० चुकीच्या बाजूने वाहन चालविणे, २ धोकादायक ड्रायव्हिंग करणे २ आणि ५ हजार ४६७ जणांवर विविध वाहतूक कायदा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे इतरांच्या जिवीतास धोका निर्माण करुन वाहन चालविल्याप्रकरणी १७ हजार ८०० हजार वाहनांवर ई-चलनद्वारे कारवाई करुन त्यांच्याकडून ८९ लाख १९ हजार ७५० रुपयांचा दंड वसुल करणयात आला. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सार्वजनिक ठिकाणासह गर्दीचे ठिकाणे, समुद्रकिनारे आणि विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गेटवे ऑफ इंडिया, मरिनड्राईव्ह, बँडस्टॅण्ड, जुहू चौपाटी या ठिकाणी तसेच पूर्व नियोजित कार्यकमांच्या ठिकाणी पोलिसांनी भेटी दिल्या होत्या.
गेल्या वर्षी मद्यप्राशन करुन वाहन चालविणार्या २२६ जणांवर कारवाई करण्यात आली तर रात्री उशिरापर्यंत ९ हजार २५ वाहनांची तपासणी करण्यात आली होती. त्यात २ हजार ८१० वाहनचालकांवर विविध कलमांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी ११२ ठिकाणी विशेष नाकाबंदीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात मद्यप्राशन करुन वाहन चालविणार्या २२९ मद्यपी चालकांविरुद्ध कारवाई केली. तपासणीदरम्यान विना हेल्मेट वाहन चालविणार्या २ हजार ४१०, विरुद्ध दिशेने वाहन चालविणार्या ३२०, बेदरकारपणे वाहन चालविणार्या ८० वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती.