मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
18 डिसेंबर 2025
मुंबई, – खार येथील महानगर टेलिफोन निगम लिमिटेडजवळील बँकेच्या ऑक्शन जागेच्या खरेदी व्यवहारात एका व्यावसायिकाची सहाजणांच्या टोळीने सुमारे 35 कोटीचा अपहार करुन फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीसह सहाजणाविरुद्ध खार पोलिसांनी कट रचून बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रदीप पद्मनाभ गांगोली, राजीव बॅनर्जी, समीरन देसाई, सुधीर गर्ग, अमरिश सिंग आणि अभय तिवारी अशी या सहाजणांची नावे असून यातील प्रदीप गांगोली हा तक्रारदार व्यावसायिकाचा चुलत बहिणीचा पती आहे. या संपूर्ण कटात तोच मुख्य आरोपी असून त्याने इतर पाचजणांच्या मदतीने ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
के. पांडुरंग कामथ हे मूळचे कर्नाटकच्या उडपीचे रहिवाशी असून ते त्यांच्या पत्नीसोबत शिवल्ली ग्राम, शिवल्ली परिसरात राहतात. उडपी शहरात त्यांच्या मालकीचे ग्रोसरी होलसेलचे दुकान आहे. प्रदीप गांगोली हा त्यांच्या चुलत बहिणीचा पती असून तो मंगलोर शहरात राहतो. डिसेंबर 2012 रोजी त्याचा त्यांना फोन आला होता. यावेळी त्याने खार टेलिफोन एक्सचेंजजवळ एक जागा असून या जागेची विक्री होणार आहे. ही जागा आपण विकत घेऊन नंतर त्याची विक्री करु असे सांगून त्यात त्यांना चांगला फायदा होईल असे सांगितले. या जागेच्या व्यवहारात त्यांना गुंतवणुक करण्याची विनंती केली होती.
हा प्रपोजल आवडल्योन त्यांनी त्यात गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांनी त्याा अर्नेस्ट मनी डिपॉझिट म्हणून 35 लाख रुपये दिले होते. मात्र 2012 ते 2023 या कालावधीत त्यांना संबंधित जागेचे रजिस्ट्रेशन झाले नसल्याचे दिसून आले. यावेळी त्याने या जागेच्या विक्री प्रकरणाचा विषय बँकेसह ईडी विभागात सुरु असल्याचे सांगून या सर्वांना मॅनेज करावे लागणार आहे. त्यासाठी त्यांना आणखीन पैसे गुंतवणुक करण्यास सांगितले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला आणखीन 34 कोटी 91 लाख 19 हजार 904 रुपये पाठविले होते. याच दरम्यान त्याने प्रॉपटी खरेदी व्यवहासंदर्भात बँकेचे कर्मचारी समीरन देसाई, सुधीर गर्ग, अभय तिवारी, शैलेश अहुजा, ईडी अधिकारी मॅथ्यूज यांच्याशी बोलणे सुरु असल्याचे सांगितले.
याबाबत बँकेचे वेळोवेळी येणारे मेल पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला होता. मात्र हा व्यवहार पूर्ण केला नाही. त्यामुळे त्यांनी संबंधित बँक अधिकार्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र बरेच प्रयत्न करुनही त्यांची भेट झाली नाही. त्यामुळे त्यांनी संबंधित बँकेत जाऊन चौकशी सुरु केली होती. यावेळी त्यांना अशा प्रकारच्या कुठल्याही जागेचे त्यांच्या बँकेकडून विक्री होत नसल्याचे समजले. तसेच बँकेतून प्राप्त झालेले मेल त्यांच्या बँकेने त्यांना पाठविलेच नाही असे सांगितले. राजीव बॅनर्जी हे बँकेत कामाला होते,
मात्र 2010 सालीच त्यांनी नोकरी सोडली होती. त्यामुळे प्रदीपने इतर आरोपींच्या मदतीने त्यांची फसवणुक केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. बॅकेचे बोगस मेल आयडी वापरुन मेल पाठवून जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारात 35 कोटी 26 लाख 19 हजार 904 रुपये घेऊन या पैशांचा परस्पर अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी खार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित सहाही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर प्रदीप पद्मनाभ गांगोली, राजीव बॅनर्जी, समीरन देसाई, सुधीर गर्ग, अमरिश सिंग आणि अभय तिवारी यांच्याविरुद्ध पोलिसांनी कट रचून बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून या सर्व आरोपींना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे. चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.