35 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धा ठाणे 2025 चा समारोप
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आशुतोष डुंबरे यांचे विशेष योगदान
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
1 मार्च 2025
ठाणे, (प्रतिनिधी) – ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या 35 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धेचे शनिवारी समारोप करण्यता आला. समारोपाचा हा कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहर पोलीस क्रिडा संकुल येथे अतिशय दिमाखात आणि उत्साहात पार पडला. यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम, पंकज भोयर, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि ठाण्यातील इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, शासकीय अधिकारी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी विशेष परिश्रम घेतले होते. त्यांच्या प्रयत्नाला इतर पोलीस अधिकार्यांनी सहकार्य केल्याने ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडल्याचे बोलले जाते.
22 फेब्रुवारीला ठाण्यात 35 वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धा 2025 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे शनिवारी 1 मार्चला समारोप करण्यात आला. ठाणे शहर पोलीस क्रिडा संकुल येथे समारोपाचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शंभर मीटर धावणे पुरुष आणि महिला गटाच्या खेळाच्या अंतिम फेरीची स्पर्धा घेण्यात आली होती. यावेळी पुरुष गटात प्रशिक्षण संचालनालय संघाचे चैतन्य संतोष मरडे यांनी तर महिला गटात मुंबई शहर संघाच्या गौरी रेवननाथ सूर्यवंशी यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वसाधारण चॅम्पियनशीप पुरस्कार मुंबई शहरच्या महिला आणि पुरुष संघाला मिळाल्याबाबत त्यांचा सत्कार करुन अभिनंदन केले होते.
आपल्या भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस विभागातील खेळाडूंना जास्तीत जास्त अशा स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र पोलीस दल देशातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून ओळखले जाते. संपूर्ण देशात महाराष्ट्र पोलीस दलाची कामगिरी बेंचमार्क म्हणून पाहिली जाते. ही ओळख कायम टिकविण्यासाठी पोलिसांनी अधिक जबाबदारीने पारदर्शकतेने काम करणे आवश्यक आहे असे नमूद केले. जशी खेळात संघ भावना जोपासली जाते तशीच दैनंदिन कामकाजातून ही संघ भावना जोपासायला हवी अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. सन 2036 साली ऑलिंपिक स्पर्धा भारतात होणार आहे. त्यावेळेस पोलीस खेळाडूंचा सहभाग मोठ्या प्रमाणात असावा अशा उपाययोजना महाराष्ट्र पोलिसांनी आतापासून कराव्यात असेही त्यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी सांगितले. महिला खेळाडूंनी आपले कठीण कर्तव्य बजावून खेळातील नाविन्यपूर्ण कौशल्य दाखविल्याने मुख्यमंत्र्यांनी महिला पोलिसांचे विशेष अभिनंदन केले होते.
यावेळी विविध खेळात सांघिक तसेच वैयक्तिक कामगिरी करणार्या खेळाडूंना चषक देऊन गौरविण्यात आले. समारोप कार्यक्रमाच्या शेवटी विविध प्रकारचे सांस्कृतिक तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. त्यात पुण्याच्या एसआरपीएफ बँण्ड पथकाने उत्कृष्ठ साधरीकरण केले. पालघर येथील मुलांनी उत्कृष्ठ असे तारफा नृत्य सादर करुन अनेकांचे मने जिंकली होती. तसेच मुंबई पोलीस बँण्ड पथकाने आणि ठाण्याच्या रुद्रा ढोल ताशा पथकानेही उत्कृष्ठ सादरीकरण करुन उपस्थित खेळाडूंचे मनोरंजन केले होते. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला याीं 35 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस स्पर्धेचा सांगता झाल्याचे घोषित करुन पुढील स्पर्धा 2026 मध्ये मुंबई शहर येथे होणार असल्याचे जाहीर केले. यावेळी या स्पर्धेचा ध्वज विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे हस्तांतरीत केला.
कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केलेल्या प्रत्येक घटकांचे विशेष आभार मानले.