38 कोटीच्या फसवणुकीप्रकरणी तीन संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
बुक केलेल्या फ्लॅटचा ताबा न देता आर्थिक फसवणुक केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
3 ऑक्टोंबर 2025
मुंबई, – सुमारे 38 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी एका खाजगी कंपनीच्या तीन संचालकाविरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मयांक जशवंतलाल शहा, जिग्नेश प्रविणचंद्र शहा आणि तुषार रमणिकलाल शहा अशी या तिघांची नावे असून ते तिघेही अल्ट्रा स्पेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून या तिघांची आता संबंधित पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
विजय ठाकूरदास ठक्कर हे विलेपार्ले येथे राहत असून ते व्यवसायाने बिल्डर आहेत. 2014 साली सतरा बिल्डकॉन कंपनीकडून वांद्रे येथील के. सी रोड, रंगशारदाजवळील वांद्रे रिक्लेमेशन परिसरात एका भूखंडावर एका इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात आले होते. याच इमारतीमध्ये मयांक विजय ठक्कर यांनी तीन फ्लॅट बुक केले होते. त्यापैकी 1701 व 1704 या दोन फ्लॅटची मूळ किंमत सतरा तर 1702 फ्लॅटची किंमत 11 कोटी 75 लाख रुपये होती. त्यापैकी त्यांनी दोन फ्लॅटसाठी प्रत्येकी 2 कोटी 21 लाख 86 हजार रुपये तर तिसर्या फ्लॅटसाठी 2 कोटी 91 हजार 56 रुपयांचे पेमेंट केले होते. या पेमेंटनंतर त्यांच्यात सहदुय्यम निबंधक कार्यालयात कायदेशीर नोंदणी करार झाला होता. त्यापैकी दोन फ्लॅट त्यांनी त्यांची मुलगा देव विजय ठक्कर आणि पत्नी तनम विजय ठक्कर तर एक फ्लॅट स्वतच्या नावाने घेतला होता.
या इमारतीचे डिसेंबर 2017 साली बांधकाम पूर्ण होईल आणि नंतर त्यांना फ्लॅटचा ताबा दिला जाईल. काम पूर्ण झाल्यानंतर एका वर्षांत शासनाकडून भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करुन घेतले जाईल, फ्लॅटचा ताबा दिल्यानंतर उर्वरित पेमेंट अदा करण्याचे तसेच डिसेंबर 2017 पर्यंत फ्लॅटचा ताबा न मिळाल्यास फ्लॅटधारकांना अठरा टक्के व्याजदराने मूळ रक्कम दिली जाईल असे करारात नमूद केले होते. डिसेंबर 2017 पर्यंत इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले नाही. त्यामुळे त्यांनी संबंधित बांधकाम कंपनीकडे अठरा टक्के व्याजदराने पैसे परत मिळावे यासाठी पत्र पाठविले होते. या पत्रानंतर सतरा बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेडने त्यांना त्यांच्या प्रोजेक्टमध्ये अशंतचा बदल होऊन त्यांना डिसेंबर 2019 पर्यंत फ्लॅटचा ताबा देण्याचे मान्य केले होते. काही महिन्यानंतर हा प्रोजेक्ट सतराकडून अल्ट्रा स्पेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला सोपविण्यात आला होता. त्यानंतर कंपनीचे संचालक मयांक शहा, जिग्नेश शहा आणि तुषार शहा यांनी विजय ठक्क यांच्याशी आपसांत एक समझौता करार केला होता.
इमारतीचा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर 2020 पासून ज्यांनी फ्लॅट आरक्षित केले होते, त्यांना त्यांच्या फ्लॅटचा ताबा देण्यास सुरुवात झाली होती. मात्र विजय ठक्कर यांच्या तिन्ही फ्लॅटचा ताबा देण्यात आला नाही. त्यामुळे त्यांनी महारेरामध्ये संबंधित तिन्ही संचालकाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर महारेराने तिन्ही संचालकांना उर्वरिक्त रक्कम व्याजासहीत परत करण्यासह तिन्ही फ्लॅटचा ताबा देण्याचे आदेश दिले होते.या आदेशानुसार त्यांना तिन्ही फ्लॅटच्या विक्रीतून आणि त्यावरील व्याज मिळून 30 कोटी 76 लाख 93 हजार 425 येणे बाकी होते. त्याचे सहा पे ऑर्डरने त्यांनी त्यांना पाठविले होते. मात्र विजय ठक्कर यांनी पे ऑर्डर घेण्यास नकार दिला.
तिन्ही फ्लॅटचा ताबा संबंधित संचालकाकडून असून त्यांना अद्याप फ्लॅटचा ताबा मिळाला नसताना त्यांना सोसायटीकडून मेंटेन्स बिल येत आहे. त्यासाठी त्यांनी फ्लॅटच्या विकासकामासाठी आतापर्यंत 7 कोटी 35 लाख 28 हजार 500 रुपये दिले आहेत. त्यामुळे त्यांना मयांक शहा, जिग्नेश शहा आणि तुषार शहा यांच्याकडून एकूण 38 कोटी 12 लाख 21 हजार 925 येणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी त्यांना ही रक्कम न देता त्यांची आर्थिक फसवणुक केली होती.
त्यांनी अल्ट्रा स्पेस प्रायव्हेट लिमिटेडचे तिन्ही संचालक मयांक शहा, जिग्नेश शहा आणि तुषार शहा यांच्याविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या तिघांविरुद्ध वांद्रे पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे या तिन्ही संचालकाची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे.