नोकरीच्या बहाण्याने मानवी तस्करीचा पर्दाफाश

दोन मुख्य आरोपींना अटक व पोलीस कोठडी

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ मार्च २०२४
मुंबई, – कोणताही वैध परवाना नसताना विदेशात चांगल्या पगाराची संधी असल्याची बतावणी करुन मुंबईसह देशभरातील विविध बेरोजगार तरुणांना विदेशात आणून विविध कॉल सेंटरच्या माध्यमातून क्रिस्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीच्या नावाने विदेशी नागरिकांची फसवणुक करणार्‍या एका मानवी तस्करी टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत विदेशात पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन मुख्य आरोपींना बोरिवली येथून प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे व त्यांच्या पथकाने शिताफीने अटक केली. जेरी फिलीप्स जेकब व गॉडफ्री थॉमस अल्वारेस अशी या दोघांची नावे असूून अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. नोकरीच्या बहाण्याने विदेशात पाठवून बेरोजगार तरुणांची फसवणुक करणारी एक आंतरराष्ट्रीय टोळी असून या टोळीने आतापर्यंत अनेक बेरोजगार तरुणांना विदेशात नोकरीसाठी आणून त्यांना तिथे ओलीस ठेवून शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी देऊन खंडणी वसुली केली आहे.

सिद्धार्थ चंद्रशेखर यादव हा ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात राहतो. त्याचे वडिल दुबईत सिनिअर मॅकेनिक तर भाऊ पुण्याच्या एका खाजगी कंपनीत कामाला आहे. तीन वर्षांपूर्वी त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला होता. त्याच्या एका नातेवाईकाने त्याच्यासाठी विलेपार्ले येथील सहार स्टार हॉटेलमध्ये नोकरीसाठी शिफारस केली होती. हॉटेलच्या शेफ जितेंदने ही माहिती रोहितला सांगितली होती. डिसेंबर २०२२ रोजी त्याला रोहितने फोन करुन त्याचा परिचित जेरी जेकब हा विदेशात लोकांना कमिशनवर नोकरी मिळवून देतो असे सांगितले होते. यावेळी त्याने भारतात काम केल्यावर सुरुवातीला १२ हजार तर विदेशात काम केल्यावर ६५ हजार रुपये वेतन मिळेल असे सांगितले. त्यामुळे त्याने विदेशात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावेळी रोहितने त्याला थायलंड येथे एका कॉल सेंटरमध्ये विदेशी नागरिकांना क्रिस्टो करन्सीबाबत माहिती देण्याच्या नोकरीची ऑफर दिली होती. या नोकरीसाठी एजंटला ५० हजार रुपये द्यावे लागत असल्याने त्याने या पैशांची व्यवस्था करुन रोहितला ५० हजार पाठवून दिले होते. त्यानंतर त्याला मुंबई बँकॉंक व बँकॉंक-मुंबई असे दोन विमानाची तिकिट पाठविण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे ३० डिसेंबर २०२२ रोजी तो बँकॉंकला गेला होता. तिथे त्याची पुण्यातील एका तरुणीसह दिल्ली आणि पंजाबहून आलेल्या पाच तरुणांशी ओळख झाली होती. या सर्वांना तिथे नोकरीसाठी आणण्यात आले होते. तिसर्‍या दिवशी प्रत्येकाला दोन आयफोन, दोन लोकल तर एक युएसएचे असे तीन सिमकार्ड देऊन त्यांना त्यांच्या नावाने फेसबुक, इंटाग्राम आणि टिकटॉकवर बोगस आयडी बनविण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांना काही बोगस प्रोफाईल तयार करुन विदेशातील लोकांशी चॅटींग करण्यास सांगण्यात आले होते. चॅटदरम्यान ओळख वाढल्यानंतर त्यांनी त्यांचे व्हॉटअप क्रमांक प्राप्त केले होते. त्यांना क्रिस्टो करन्सीबाबत माहिती दिली जात होती. त्यांना एका ऍपद्वारे गुंतवणुक करण्यास सांगून ती रक्कम कंपनीच्या बँक खात्यात जमा करण्यास प्रवृत्त केले जात होते.

दुसरीकडे कंपनीत क्रिस्टो करन्सीमध्ये गुंतवणुक करणार्‍या ग्राहकांना ऍपमध्ये नफा होत असल्याचे आकडे दाखविले जात होते. मात्र प्रत्यक्षात त्यांना कुठलाही नफा होत नव्हता. अशा प्रकारे तिथे विदेशी नागरिकांची फसवणुक करण्यासाठी भारतीय बेरोजगार तरुणांना नोकरीच्या नावाने बोलाविले जात होते. याच दरम्यान या तरुणांना कंपनीचे कर्मचार्‍यासाठी दिलेले नियम फारच कडक असल्याचे दिसून आले. झोपण्याच्या वेळेस फक्त झोपायचे, काम करताना उठून बसायचे नाही. मागे-पुढे व्हायचे नाही अशा प्रत्येक कारणासाठी दंड केला जात होता. दंडाची रक्कम जास्त असल्याने एक महिना काम करुनही त्यांना पगार दिला नव्हता. याच दरम्यान त्याच्यासह वीसजणांना दुसर्‍या कंपनीत शिफ्ट करण्यात आले होते. तिथे त्यांना विविध कारण सांगून विदेशी नागरिकांची फसवणुक करण्यास प्रवृत्त केले जात होते. विशेष म्हणजे काम करुनही त्यांना दुसर्‍या महिन्यांतही पगार दिला नव्हता. १२ मार्चला त्यांच्या एका सहकार्‍याचा वाढदिवस होता. त्यामुळे सर्वांनी मिळून त्याचा वाढदिवस साजरा केला. त्यात त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन भांडण झाले होते. त्यामुळे कंपनीने सर्वांना दंड केला होता. सतत दंड केला जात असल्याने त्यांनी त्यांच्या पासपोर्टची मागणी करुन त्यांना पुन्हा भारतात जायचे आहे असे सांगितले. यावेळी जेरी जेकबसह इतर दोघांनी त्यांनी केलेले नुकसान भरुन दिल्याशिवाय त्यांना भारतात जाता येणार नाही असे सांगितले. त्यांना जवळपास काही दिवस कोंडून ठेवले होते. याच दरम्यान सिद्धार्थने त्याच्या एका मित्राच्या मदतीने भारतीय दूतावास कार्यालयाचा क्रमांक प्राप्त केला होता. तिथे संपर्क साधून त्याने तिथे चालणार्‍या कामाविषयी माहिती दिली. त्यांना मेलवरुन त्याच्यासह इतर तरुणांची सुटका करण्याची विनंती केली होती. दुसर्‍या दिवशी जेरी, सनी आणि गॉडफ्री तिथे आले आणि त्यांनी त्यांचे सर्व मोबाईल ताब्यात घेऊन त्यांच्या संगणकातील सर्व डाटा डिलीट केला. त्यांना शिवीगाळ करुन बेदम मारहाण तसेच जिवे मारण्याची धमकी दिली होती. यावेळी त्यांनी सिद्धार्थकडून २०० चायनीस युवॉन करन्सी दंड म्हणून घेतले होते. अशाच प्रकारे इतर तरुणांकडून त्यांनी दंडाची रक्कम वसुल केली होती. त्यानंतर काही दिवस त्यांना विविध रुममध्ये बंद करण्यात आले होते. दुसरीकडे भारतीय दूतावास कार्यालयात केलेल्या तक्रारीनंतर तिथे पोलिसांचा छापा पडला होता. सिद्धार्थसह इतर काही भारतीय तरुणांची स्थानिक पोलिसांनी सुटका केली. त्यांची सविस्तर जबानी नोंदवून नंतर त्यांना पुन्हा भारतात पाठविण्यात आले होते. घडलेला प्रकार सिद्धार्थ विलेपार्ले पोलिसांना सांगून तिथे तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर जेरीसह इतर तिघांविरुद्ध पोलिसांनी १२० ब, ३२३,३४२, ४२०, ३७०, ३४६, ३४७, ३८६, ५०६, ५०४, ३४ भादवीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांचा तपास नंतर गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता.

तपास हाती येताच पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस विशाल ठाकूर, सहाय्यक पोलीस आयुक्त महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोजकुमार प्रजापती, मधुकर धुतराज, राहुल प्रभू, संग्राम पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास मोरे, जयेंद्र कानडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिरसाट, बनसोडे, पोलीस हवालदार यादव, किणी, काकडे, सावंत, पोलीस शिपाई रहेरे, सटाले, महिला पोलीस शिपाई गायकवाड यांनी तपास सुरु केला आहे. आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना या गुन्ह्यांतील आरोपी बोरिवली परिसरात लपले असून ते विदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर एसीपी महेश देसाई, प्रभारी पोलीस निरीक्षक लक्ष्मीकांत साळुंखे व त्यांच्या पथकाने बोरिवली येथून जेरी जेकब आणि गॉडफ्री अल्वारेस या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला. पोलीस तपासात ही टोळी नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगार तरुणांना विदेशात आणून त्यांना विविध कॉल सेंटरमध्ये नोकरी देऊन तिथे विदेशी नागरिकांना क्रिस्टो करन्सीच्या नावाने गुंतवणुक करण्यास भाग पाडून त्यांची फसवणुक करण्यास सांगत होते. या टोळीने आतापर्यंत अनेक तरुणांना विदेशात आणून त्यांच्या मदतीने अशा प्रकारे या नागरिकांची फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. विविध दंडाच्या नावाने त्यांच्याकडून खंडणी वसुली करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. सिद्धार्थसह त्याचे इतर सहकारी भारतात परत आले असले तिथे अद्याप अनेक भारतीय तरुणांना ओलीस ठेवण्यात आले आहे. त्यांना जबदस्तीने काम करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या दोघांची चौकशी करुन त्यांनी आतापर्यंत किती तरुणांना विदेशात नोकरीसाठी पाठविले आहेत याची माहिती काढण्याचे काम सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page