राष्ट्रीय महामार्गावर लुटमार करणार्या टोळीचा पर्दाफाश
चार आरोपींना अटक; पाच कोटीचा चोरीचा मुद्देमाल जप्त
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ मार्च २०२४
मुंबई, – गुजरातच्या एका व्यापार्यासह त्याच्या तीन कर्मचार्यांना पोलीस असल्याची बतावणी करुन त्यांच्याकडील पाच कोटी पंधरा लाख रुपयांची कॅश घेऊन पळून गेलेल्या टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत चार आरोपींना वेगवेगळ्या परिसरातून पोलिसंनी अटक केली. मुरगनंदन अभिमन्यू, बाबू मोडा स्वामी, मनीकंडन चलैया आणि बालाप्रभू शनमुगम अशी या चौघांची नावे आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी ४ कोटी ८७ लाख ५० हजार रुपयांची कॅश, दहा लाख रुपयांची एक हुंडाई, तीन लाखांची मारुती वॅगन कार, २ लाख ६५ हजार रुपयांचे मोबाईल फोन असा पाच कोटी तीन लाख पंधरा हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेनंतर या चारही आरोपींना लोकल कोर्टाने गुरुवार २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रीय महामार्गावर घडलेल्या या लुटमारीच्या घटनेने व्यापारी वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
यातील तक्रारदार गुजरातचे व्यापारी आहेत. १७ मार्चला ते त्यांच्या तीन कर्मचार्यासोबत सुरत येथून मुंबईच्या दिशेने त्यांच्या हुंडाई कारमधून येत होते. ही कार रात्री नऊ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जवळ आली असता त्यांच्या कारला एका क्रेटा कारने ओव्हरटेक केले होते. या कारमधून पाचजण उतरले आणि त्यांनी पोलीस असल्याची बतावणी करुन व्यापार्यासह त्यांच्या कर्मचार्यांना बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्यांना कारमध्ये बसवून काही अंतर नेण्यात आले. या सर्वांना रस्त्याच्या कडेला उतरुन त्यांची कार, पाच कोटी पंधरा लाख रुपयांची कॅश आणि मोबाईल घेऊन पळून गेले होते. या घटनेनंतर तक्रारदार व्यापार्याने घडलेला प्रकार मांडवी पोलिसांना सांगून तिथे संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पाचही आरोपीविरुद्ध पोलिसांनी ३९५, ३६३, ४१९, ४२०, १७०, १२० ब, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. राष्ट्रीय महामार्गावर पोलीस असल्याची बतावणी करुन झालेल्या लुटमारीची वरिष्ठ अधिकार्यांनी गंभीर दखल घेत स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्यांना तपासाचे आदेश दिले होते.
या आदेशानंतर पोलीस आयुक्त मधुकर पांडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत टेलर, उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, पोलीस अंमलदार राकेश पवार, सुमीत जाधव, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, तुषार दळवी, अतिश पवार, मनोहर तारडे, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनावणे, सायबर सेलचे सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण यांनी तपास सुरु केला होता. तांत्रिक माहितीसह खबर्याकडून मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी मुरगनंदन, बाबू, मनीकंडन आणि बालाप्रभू या चौघांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.
या चौघांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनीच त्यांच्या इतर सहकार्यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर या चारही आरोपींकडून चोरीच्या कॅशसह इतर मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला होता. यातील मुरनंदन हा माटुंगा, बाबू कांदिवली, मनीकंडन भाईंदर आणि बालाप्रभू हा शीव परिसरात राहतो. त्यांनीच कट रचून राष्ट्रीय महामार्गावर पाळत ठेवून या व्यापार्याच्या कारचा पाठलाग करुन ही लुटमार केली होती. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींचा सहभाग उघडकीस आला असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.