कोट्यवधी रुपयांच्या ड्रग्ज तस्करीच्या मुख्य आरोपीस अटक
रेड कॉर्नर नोटीसनंतर मलेशियातून हद्दपारीची कारवाई
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
28 मे 2025
मुंबई, – मलेशियातून आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेट चालविणार्या एका मुख्य आरोपीस छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर नारकोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकार्यांनी अटक केली. नवीन चिचकर असे या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध एनसीबीने रेड कॉर्नर नोटीस बजाविली होती. या नोटीसनंतर त्याला मलेशियातून हद्दपार करुन भारतात पाठविण्यात आले होते.
21 जानेवारीला मुंबईहून ऑस्ट्रेलिया येथे ड्रग्जचा एक पार्सल पाठविण्यात येणार होता. मात्र ते पार्सल ऑस्ट्रेलिया येथे जाण्यापूर्वीच एनसीबीच्या अधिकार्यांनी ते पार्सल ताब्यात घेतले होते. त्यात या अधिकार्यांना दोन कोटीचे दोनशे ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले होते. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत या ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश करुन आरोपीविरुद्ध ठोस कारवाई करण्याचे आदेश एनसीबीला दिले होते. या आदेशानंतर वेगवेगळ्या परिसरातून आठजणांना या अधिकार्यांनी अटक केली होती.
या आरोपींकडून 11.540 किलो कोकेन, 4.9 किलो गांजा आणि 5.5 किलो गांजा गमी आदी ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. या आरोपींच्या चौकशीतून ड्रग्ज तस्करी करणार्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात या अधिकार्यांना यश आले होते. याच चौकशीत नवीन चिचकर याचे नाव समोर आले होते. तोच या टोळीचा म्होरक्या होता. विदेशातून ते संपूर्ण ड्रग्ज रॅकेट चालवत होता. त्याने अनेकदा विदेशातून कार्गोमध्ये ड्रग्ज पार्सल पाठविले होते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी एनसीबीने रेड कॉर्नर नोटीस जारी केले होते.
तो मलेशिया येथे वास्तव्यास असल्याची माहिती प्राप्त होताच मलेशिया सुरक्षा यंत्रणेला देण्यात आली होती. त्यानंतर त्याला मलेशियाने हद्दपार केले होते. त्याला पुन्हा भारतात पाठविण्यात आले होते. मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येताच त्याच्यावर एनसीबीकडून अटकेची कारवाई करण्यात आली होती. त्याच्या थायलंडमधील प्रॉपटी आणि बँक खात्याची माहिती काढण्यात या अधिकार्यांना यश आले असून ही प्रॉपटी लवकरच सील केली जाणार आहे. नवीनच्या अटकेने या टोळीविषयी अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.