मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

राहत्या घरातील लोखंडी अँगलला गळफास घेऊन जीवन संपविले

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ मार्च २०२४
मुंबई, – पहिल्या मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने मानसिक नैराश्यातून एका चौदा वर्षांच्या मुलीने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मालाडच्या मालवणी परिसरात उघडकीस आली आहे. घरात कोणीही नसताना लोखंडी अँगलला गळफास घेऊन तिने जीवन संपविले. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून तिच्या पालकांची जबानी नोंदविण्यात आली आहे. या आत्महत्येबाबत त्यांनी कोणावरही संशय अथवा तक्रार केली नाही. त्यामुळे मालवणी पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे. मंगळवारी घडलेल्या या आत्महत्येच्या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.

ही घटना मंगळवारी सायंकाळी मालाड येथील मालवणीतील खारोडी परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या परिसरात मृत चौदा वर्षांची मुलगी तिच्या पालकांसोबत राहत होती. मंगळवारी सायंकाळी तिने तिच्या राहत्या घरातील लोखंडी अँगलला गळफास लावून आत्महत्या केली होती. हा प्रकार तिच्या पालकांसह स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी तिला बेशुद्ध अवस्थेत कांदिवलीतील जनकल्याणनगर, सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. सायंकाळी सव्वासात वाजता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. ही माहिती मिळताच मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी तिच्या पालकांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. या जबानीत या मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी आली होती. या पाळीचा तिला प्रचंड त्रास होत होता. त्यामुळे ती मानसिक तणावात होती. त्यातून आलेल्या नैराश्यातून तिने गळफास लावून आत्महत्या केली असावी अशी शंका त्यांनी त्यांच्या जबानीत व्यक्त केली आहे. याच जबानीत त्यांनी मुलीच्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही किंवा या आत्महत्येबाबत त्यांना कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे मालवणी पोलिसांनी एडीआरची नोंद केली होती. तिचा मृतदेह नंतर शवविच्छेदनासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला होता. रात्री उशिरा शवविच्छेदन झाल्यानंतर तिचा मृतदेह तिच्या पालकांकडे सोपविण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page