वांद्रे येथील सनी वाईन शॉपमध्ये दोन मॅनेजरकडून डल्ला
14 लाखांच्या दारुसह पैशांच्या चोरीनंतर दोघांचे पलायन
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
31 मे 2025
मुंबई, – वांद्रे येथील एका वाईन शॉपमध्ये काम करणार्या दोन मॅनेजरने चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन्ही मॅनेजरविरुद्ध निर्मलनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश बाबू तोरसले आणि निरजकुमार प्रल्हाद शर्मा अशी या दोघांची नावे आहेत. विविध कंपनीच्या व्हिस्की, बिअर आणि देशी दारुसह पन्नास हजाराची कॅश असा चौदा लाख सोळा हजाराचा मुद्देमाल चोरी केल्याचा या दोघांवर आरोप असून ते दोघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
मनोज आवतराम तलरेजा हे उल्हासनगरच्या कल्याण-मुरबाड रोडचे रहिवाशी रहिवाशी आहेत. त्यांच्या मालकीचे वांद्रे येथील खेरवाडी परिसरात सनी वाईन्स शॉप नावाचे एक दुकान आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ते वाईन शॉप चालवत असून त्यांच्या शॉपमध्ये चार कर्मचारी कामाला आहेत. त्यात प्रकाश तोरसले आणि निरजकुमार यांचा समावेश असून ते दोघेही उल्हासनगरचे रहिवाशी आहेत. वाईन शॉपमध्ये मॅनेजर म्हणून कामाला असून या दोघांनाही 28 हजार आणि 27 हजार रुपये वेतन दिले जाते. शॉपसह मद्यविक्रीचा हिशोब ते दोन्ही मॅनेजरकडून दर दोन ते तीन महिन्यांनी घेत होते.
गेल्या आठवड्यात त्यांना शॉपमध्ये नुकसान होत असल्याचे दिसून आले होते. पूर्वी शॉपचा व्यवसाय चांगला चालत होता, मात्र गेल्या काही दिवसांत त्यांना व्यवसायात नुकसान होऊ लागले होते. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी स्वतहून त्याची शहानिशा सुरु केली होती. गेल्या काही महिन्यांतील स्टॉकची पाहणी केली असता त्यांना दारुचा काही स्टॉक कमी असल्याचे तसेच व्यवहारात मोठ्या प्रमाणात फेरफार होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी प्रकाश तोरसले आणि निरजकुमारकडे विचारणा केली होती.
या दोघांनी उडवाडवीचे उत्तरे देऊन त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांनी त्यांना चांगलाच दम दिला होता. त्यानंतर ते दोघेही कामावर येणे बंद झाले होते. ते दोघेही घरातूनही पळून गेले होते. हा प्रकार समजताच त्यांनी स्टॉकची पुन्हा पाहणी केली होती. त्यात त्यांना गेल्या काही महिन्यांत या दोन्ही आरोपी मॅनेजरने 13 लाख 88 हजार 880 रुपयांच्या विविध कंपनीच्या व्हिस्की, बिअर आणि देशी दारुसह पन्नास हजाराची कॅश असा चौदा लाख सोळा हजाराचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले होते.
1 मार्च ते 24 मे 2025 या कालावधीत प्रकाश तोरसले आणि निरजकुमार शर्मा यांनी ही चोरी केली होती. प्रकाशने निरजकुमारच्या सांगण्यावरुन वाईन शॉपमध्ये ही चोरी केल्याची कबुली दिली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी निर्मलनगर पोलिसांत दोन्ही आरोपी मॅनेजरविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर या दोघांविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. ते दोघेही पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.