घाटकोपर येथील अपघातात वयोवृद्धासह दोन तरुणांचा मृत्यू
भरवेगात बाईक चालविणे स्वतसह तिघांच्या जिवावर बेतले
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
२६ मार्च २०२४
मुंबई, – घाटकोपर येथील अपघातात एका ६२ वर्षांच्या वयोवृद्धासह दोन तरुणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अहमदी रजा गुलाम मुस्तफा अन्सारी, सुरेश रामा कराटे आणि मुजफर हुसैन गुठेशहा यांचा समावेश आहे. भरवेगात बाईक चालविणे स्वतसह तिघांच्या जिवावर बेतल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी १९ वर्षांचा मृत बाईकस्वार अहमदी अन्सारी याच्याविरुद्ध घाटकोपर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
हा अपघात सोमवारी पहाटे चार वाजता घाटकोपर येथील एलबीएस रोड, शाही हॉटेलसमोरील कुर्लाकर्ड जाणार्या वाहिनीवर झाला. अहमदी आणि मुजफर हे दोघेही १९ वर्षांचे असून कुर्ला येथील हलिमियॉ बेकरीजवळील गैबनशा दर्गा रोड, अशोकनगर हिल क्रमांक तीनमध्ये राहत होते. सोमवारी पहाटे अहमदी आणि मुजफर हे त्यांच्या बाईकवरुन घाटकोपर येथून कुर्ला येथील घरी जात होते. पहाटे चार वाजता ही बाईक शाही हॉटेल येथून कुर्लाच्या दिशेने जात होते. यावेळी भरवेगात बाईक चालविणार्या अहमदीने रस्ता क्रॉस करणार्या सुरेश कराटे या ६२ वर्षांच्या वयोवृद्धाला धडक दिली. यावेळी त्याचे बाईकवरुन नियंत्रण सुटले आणि त्याने डिवायडरला धडक दिली होती. त्यात त्याच्यासह मुजफर हे दोघेही रस्त्याच्या कडेला पडले. त्यामुळे सुरेश यांच्यासह अहमदी आणि मुजफर असे तिघेही गंभीररीत्या जखमी झाले होते. अपघाताची माहिती मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममधून प्राप्त होताच गस्त घालणार्या घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या तिघांनाही पोलिसांनी तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. यावेळी तिघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले. प्राथमिक तपासात या अपघाताला अहमदी अन्सारी हा तरुण जबाबदार असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे युवराज वाघ यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अहमदीविरुद्ध हलगर्जीपणाने बाईक चालवून स्वतसह मित्राचा तसेच पादचार्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.